IPL 2020: सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यात वातावरण का तापलं?

बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यात सगळ्यात चर्चेत राहिली विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची जुगलबंदी.

बुधवारी बेंगळुरूविरुद्ध मॅचमध्ये सूर्यकुमारने बॉलमध्ये 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन्सची खेळी साकारली. 10 चौकार आणि 3 षटकारांसह सूर्याने फिनिशरची भूमिका निभावत मुंबईला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादव. वय-30. गेले दशकभर रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, इंडिया ए, आयपीएल अशा विविध स्पर्धांमध्ये सातत्याने रन्स करतो आहे. मात्र तिशीतही सूर्यकुमारला टीम इंडियाचे दरवाजे किलकिले झालेले नाहीत.

जंबो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडसमितीने टीम इंडियाची घोषणा केली. वनडे किंवा ट्वेन्टी-20 संघात सूर्यकुमार यादवचं नक्की असेल असं अनेकांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही. टीम इंडियात प्रवेश मिळण्यासाठी सूर्याने अजून काय करायला हवं असा सवाल सोशल मीडियावर अनेकांनी विचारला.

मॅचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्यामध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळायलं. दोघांनीही एकमेकांच्या दिशेने जळते कटाक्ष टाकले. मॅच जिंकून दिल्यानंतर सूर्यकुमारने मैं हू ना (मी आहे, काळजी नको ) असं सूचित केलं.

यंदाच्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला सूर्यकुमारच्या फॉर्मविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, सूर्यकुमार टीम इंडिया कॅपपासून अवघी काही पावलं दूर आहे. तो चांगली बॅटिंग करतो आहे.

रोहितचे शब्द सूर्यकुमार खेळीतून खरे ठरवतो आहे. मात्र टीम इंडियाचा प्रवेश सूर्यकुमारसाठी थोडी नव्हे बरीच पावलं दूर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सूर्यकुमार आणि विराटचा मॅचदरम्यानचा फोटो आणि मॅचनंतरचं सूर्यकुमारचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीसारख्या महान खेळाडूने सूर्यकुमारशी अशा प्रकारे वागायला नको होतं असं सोशल मीडियावर काहींनी म्हटलं आहे. टीम इंडियात खेळण्याची संधी मिळालेली नसताना कोहलीशी पंगा घेण्याचं धैर्य सूर्यकुमारने दाखवलं असं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे.

सूर्यकुमारची टीम इंडियात निवड झाली तर त्याला विराट कोहलीच्याच नेतृत्वात खेळावं लागेल याकडे काही नेटिझन्सनी लक्ष वेधलं आहे.

कट, पूल, ऑफ ड्राईव्ह, इनसाईड आऊट, स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक अशा पोतडीतून एकापेक्षा एक भाते बाहेर काढत सूर्यकुमारने आपली खेळी सजवली.

टायमिंग, शैली, फिटनेस, स्पिन आणि पेस दोन्ही प्रकारच्या बॉलर्सना खेळण्याची तयारी या आघाड्यांवर सूर्यकुमारने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मात्र कोहलीच्या योजनांमध्ये सूर्यकुमारला स्थान असल्याचं दिसून आलं.

भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी सूर्यकुमार यादवने आणखी काय करायला हवं मला समजत नाही. प्रत्येक आयपीएल हंगामात तसंच रणजी करंडक स्पर्धेत तो खोऱ्याने रन्स करतो आहे. वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे नियम. निवडसमितीने सूर्यकुमारची आकडेवारी पाहावी अशी मी विनंती करतो असं ट्वीट हरभजन सिंहने केलं होतं.

सूर्यकुमारची वनडे तसंच ट्वे्न्टी-20 संघात निवड न होणं आश्चर्यकारक आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याप्रकरणी लक्ष घालून नेमकं कशामुळे सूर्यकुमारची निवड झालेली नाही याचा शोध घ्यायला हवा असं मत टीम इंडियाची माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर म्हणाले होते.

"भारतीय संघासाठी अद्याप खेळू शकत नसल्याचं दु:ख सूर्यकुमारच्या मनात खोलवर नक्की असेल. दोन विकेट पडल्यानंतरही सूर्यकुमार ज्या स्ट्राईकरेटने खेळला ते विलक्षण आहे. तो मॅच आणि हंगामागणिक उत्तमोत्तम होत चालला आहे. वैयक्तिक खेळाडू म्हणून सातत्याने चांगलं खेळत राहायला हवं. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्याआधी कोणालाही काहीही मिळत नाही", असं मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार कायरेन पोलार्ड म्हणाला.

"सूर्यनमस्कार. असाच चांगला खेळत राहा. फिट रहा. संयम ठेव", असं ट्वीट टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं.

"बंदे में दम है. लवकरच भारतासाठी खेळेल. सलग तीन आयपीएल हंगाम गाजवतो आहे. सूर्यकुमार यादवची शानदार खेळी आणि मुंबईचा दिमाखदार विजय", असं टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

"सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळावं यासाठी अन्य देशात रवाना झाल्यास आश्चर्य वाटायला नको", असा उपरोधिक टोला स्कॉट स्टायरिस यांनी हाणला आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने 77 मॅचेसमध्ये 44च्या सरासरीने 5326 रन्स केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

2012 मध्ये सूर्यकुमारने आयपीएल पदार्पण केलं. सध्याच्या घडीला सूर्यकुमारने आयपीएल स्पर्धेत 97 मॅचेसमध्ये 1910 रन्स केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 135.84चा आहे. 10 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स आणि आता मुंबई इंडियन्ससाठी खेळताना भरवशाचा मधल्या फळीतला बॅट्समन अशी ओळख सूर्यकुमारने प्रस्थापित केली आहे.

2018 हंगामात सूर्यकुमारने 14 मॅचमध्ये 512, 2019 हंगामात 16 मॅचमध्ये 424 रन्स केल्या आहेत. यंदाच्या हंगामाताही त्याची बॅट तळपते आहे.

टीम इंडियात वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात सूर्यकुमारला कुठे फिट करायचा असा यक्षप्रश्न निवडसमितीपुढेही आहे.

ट्वेन्टी-20 संघातील शिखर धवन, लोकेश राहुल भन्नाट फॉर्मात आहेत. विराट कोहली टीम इंडियाचं रनमशीन आहे. श्रेयस अय्यर, मयांक अगरवाल, मनीष पांडे हेही सातत्याने रन्स करत आहेत. एकहाती मॅच जिंकून देण्याची हार्दिक पंड्याची क्षमता आहे. संजू सॅमसनच्या खेळात सातत्याचा अभाव आहे मात्र त्यालाही नियमित संधी मिळालेल्या नाहीत. या संघात नसला तरी रोहित शर्मा फिट असताना अविभाज्य भाग आहे.

वनडे संघात कोहली, धवन, राहुल, श्रेयस, मनीष, मयांक, हार्दिक यांच्याबरोबरीने शुभमन गिलला स्थान देण्यात आलं आहे. रोहित शर्मा फिट झाल्यास त्यालाही संघात स्थान मिळणं साहजिक आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमारला घ्यायचं कसं असा निवडसमितीपुढेही प्रश्न आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)