You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: निकोलस पूरन; ज्याचं कौतुक करताना सचिन तेंडुलकर देखील थकत नाही
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी यंदाच्या हंगामात दोनदा निकोलस पूरनचं कौतुक केलं. पूरनच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.
पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. 20 वर्षांचा तरणाबांड बॅलमन इथल्या मुलगा नॅशनल क्रिकेट अकादमीतून सराव आटोपून बाहेर पडला. कॅरेबियन बेटांवरल्या त्रिनिदाद अँड टोबॅगो बेटांवरल्या युवा प्रतिभाशाली क्रिकेटपटूंमध्ये त्याचं नाव घेतलं जात होतं. सराव संपवून गाडी काढून तो घराच्या दिशेने निघाला.
नियतीच्या मनात काहीतरी भयंकर सुरू होतं. घराजवळच त्या मुलाच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या गाडीचा वेगही फार नव्हता. काही कळायच्या आत तो गाडीबाहेर फेकला गेला. सुदैवाने जीव वाचला पण पायांवर संक्रांत ओढवली.
स्थानिकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याच्या डाव्या पायाला आणि नडगीला जबर मार बसला होता. अपघातानंतर तो बेशुद्धच पडला. समजू लागल्यावर त्याला नेमकं काय झालं हेही धड आठवेना. पाय हलवता येत नव्हते.
काम क्रिकेट खेळण्याचं, पाय तर हवेतच. पण त्याचे पाय नाजूक स्थितीत होते. त्याने डॉक्टरांना पहिला प्रश्न हाच विचारला-मला पुन्हा क्रिकेट खेळता येईल ना? त्याच्या पायांची अवस्था बघता डॉक्टरांनाही ठोस काही सांगणं अवघड होतं. काही तासात त्याच्या पायांवर पहिली शस्त्रक्रिया झाली.
दीड आठवड्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया झाली. हॉस्पिटलच्या बेडवर पाय मोडलेल्या स्थितीतला त्याचा फोटो काळजाला घर पाडणारा होता. त्या दोन शस्त्रक्रियांनी पायांना बसलेला मार कमी झाला आणि भविष्यात त्यांना असलेला धोका कमी झाला.
खेळता येऊ शकेल पण पुरेशी काळजी घेऊनच असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. उमेदीच्या काळातलं दीड वर्ष हाताला आधार घेऊन वॉकरने चालण्यात गेलं. पण सळसळत्या ऊर्जेच्या त्या मुलाने दीड वर्षात पुनरागमन केलं.
तो खेळायला उतरला. त्याची अवस्था पाहिलेले चकित झाले. नियमित औषधोपचार, फिजिओथेरपी, व्यायाम, मानसिक कणखरता, घरच्यांचा पाठिंबा या बळावर तो मुलगा दीड वर्षात क्रिकेटच्या मैदानावर परतला. त्याचं नाव होतं-निकोलस पूरन
यंदाच्या आयपीएलमध्ये दर काही दिवसांनी निकोलस पूरन नाव चर्चेत येतं. सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीचे व्हीडिओ झळकू लागतात. व्हीडिओ ट्रेंड होऊ लागतात. त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होतो. काही तासांपूर्वी साक्षात सचिन तेंडुलकरला निकोलसचा खेळ आवडला. त्यांनी तसं ट्वीटही केलं.
निकोलस पूरनचे पॉवरपॅक्ड फटके पाहिले. अतिशय खणखणीत फटके लगावणारा बॅट्समन आहे हा. फटके लगावताना त्याची बॅकलिफ्ट पाहून मला जेपी ड्युमिनीची आठवण येते असं सचिनने म्हटलं आहे.
निकोलसने किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळताना दिल्लीविरुद्ध 53 रन्सची आक्रमक इनिंग्ज खेळली होती. पूरनच्या या खेळीच्या बळावरच पंजाबने विजयाची हॅट्ट्रिक साधली होती.
त्याआधीही सचिन यांनी निकोलसचं भरभरून कौतुक केलं होतं.
क्रिकेटच्या मैदानावरचा मी पाहिलेला बेस्ट सेव्ह आहे. निव्वळ अद्भुत आणि अशक्य अशा शब्दात सचिन यांनी पूरनला शाबासकी दिली होती.
निकोलसची हवाई भरारी
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या निकोलस पूरनने हवेत झेप घेऊन अडवलेला बॉल क्रिकेटरसिकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहील. शारजाच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांची मॅच सुरू होती. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालचं शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली.
जोस बटलर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक उंच फटका लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत उडी मारत सुंदर कसरत करत तो षटकार अडवला.
ज्या पद्धतीने पूरनने हवेत उडी घेतली आणि बरीच सेकंद तो हवेतच होता. एक षटकारासाठी पूरनने सर्वस्व दिलं.
सोशल मीडियावर पूरनवर कौतुकाचा वर्षाव झाला. पूरनची डाईव्हवर आधारित अनेक मीम्सही तयार झाले.
आयपीएल प्रवास
2017 मध्ये मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये खर्चून निकोलसला ताफ्यात सामील केलं.
दोन वर्षांनंतर मुंबईने त्याला रिलीज केलं. किंग्ज इलेव्हन पंजाबने 4.2 कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केलं.
आक्रमक शैलीदार बॅट्समन आणि आवश्यकता असेल तर विकेटकीपिंग ही पूरनची गुणवैशिष्ट्यं.
अफलातून कॅचेस आणि सेव्ह यामुळे पूरन मैदानात असणं संघासाठी फायद्याचं ठरतं. यंदाच्या हंगामात पूरनने दोन अर्धशतकांसह दडपणाच्या क्षणी उपयुक्त खेळी करत संघाला तारलं आहे. कर्णधार राहुलवरील जबाबदारी कमी करण्यासाठी पूरनने एका मॅचमध्ये विकेटकीपिंगही केली.
वेस्ट इंडिजसाठी
पूरनने 25 वनडेत वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व करताना 49.0च्या सरासरीने 932 रन्स केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक रन्स पूरनच्या नावावर होत्या. पूरनने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळीही साकारली होती.
21 ट्वेन्टी-20 लढतीत वेस्ट इंडिजसाठी खेळताना पूरनचा स्ट्राईक रेट 124.73चा आहे.
जगभरातील ट्वेन्टी-20 स्पर्धा
पूरन पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघासाठी खेळतो. बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत सिल्हेट सिक्सर्स संघासाठी खेळतो. 2018-19 हंगामात सर्वाधिक रन्सचा विक्रम पूरनच्या नावावर आहे.
कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत पूरन बार्बाडोस ट्रायडंट्स, गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघासाठी खेळला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)