You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचं साम्राज्य खालसा होताना...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना काळात होत असलेल्या आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी यांच्या महतीला ओहोटी लागली आहे.
चेन्नई सुपर किंग्स या तीन शब्दांनी आयपीएल स्पर्धा गाजवली. जेतेपदं, दरवर्षी प्लेऑफ्स गाठून राखलेलं जिंकण्यातलं सातत्य, नव्या ताऱ्यांचा उदय, लोकप्रियता, धोनीची टीम म्हणून ब्रँडव्हॅल्यू अशा सगळ्या आघाड्यांवर चेन्नई सुपर किंग्सने प्रत्येक हंगामात नवनवे मापदंड रचले.
आयपीएल सुरू झालं की धोनी-रैनाच्या इनिंग्ज तसंच चेन्नईने एखाद्या संघाला कसं चिरडलं याच्या कहाण्या रंगू लागत. दीड महिना चालणाऱ्या या महासंग्रामात हॉटेल-स्टेडियम-विमानतळ अशी कसरत करूनही चेन्नईचा संघ प्लेऑफ्स अर्थात बादफेरी गाठत असे.
ही स्पर्धा चेन्नईला जिंकण्यासाठीच होते आहे असं वाटावं इतकं त्यांचा दबदबा होता. व्हिसल पोडू, यलो आर्मी, धोनी या विशेषनामांनी चेन्नई परिसरात आगळंवेगळं स्थान निर्माण केलं. मात्र कोरोना कोरोना काळात होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचं संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर आहे.
कोरोनाचा संसर्ग
आयपीएलचा यंदाचा हंगाम युएईत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक संघाने भारतात कुठे एकत्र यायचं, टेस्ट कुठे होणार, तिथे कधी पोहोचणार, बायो बबल याचं वेळापत्रक बनवलं. चेन्नईचे खेळाडू युएईसाठी रवाना झाले. नियमांनुसार तिथे पोहोचल्यावर कोव्हिड टेस्ट घेण्यात आल्या. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातल्या एकदोन नव्हे 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.
यामध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश होता. कोरोना पॉझिटिव्ह आहे हे स्पष्ट झाल्यावर या 14 जणांना औषधोपचार, पथ्य, आयसोलेशन, विश्रांती हे सगळं फॉलो करणं ओघाने आलं. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नव्हती. दीपक तर काही दिवसांतच कोरोनामुक्त झाला. ऋतुराजला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागला. बाकी कोणत्याही संघातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली नाही. मात्र स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईच्या मोहिमेला कोरोनाने पोखरलं.
रैना-हरभजनची माघार
वैयक्तिक कारणांमुळे अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग युएईला रवाना झाला नाही. काही दिवसांतच हंगामात खेळणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. सुरेश रैना हा चेन्नईच्या बॅटिंगचा आधारस्तंभ. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैना संघाबरोबर युएईत पोहोचला. मात्र काही दिवसातच तो मायदेशी परतला. वैयक्तिक कारणास्तव हंगामात खेळू शकणार नसल्याचं रैनाने स्पष्ट केलं. रैनाच्या माघारीचं नेमकं कारण जाहीर करण्यात आलं नाही.
प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात अनेक तर्क लढवले. चेन्नईचे संघमालक एन.श्रीनिवासन यांच्याशी रैनाचं भांडण, युएईत चांगली रूम मिळण्यावरून नाराजी, संघातील चौदाजण कोरोनाग्रस्त असल्याने भीती, नातेवाईकांची झालेली हत्या अशा अनेक थिअरी मांडण्यात आल्या. धोनी आणि रैनाचं बिनसलं आहे अशीही शक्यता वर्तवण्यात आली. धोनीने, रैनाने यावर काहीही भाष्य केलेलं नाही. चेन्नई संघव्यवस्थापनाने वैयक्तिक कारणास्तव माघार यापलीकडे काहीही सांगितलं नाही.
हंगामादरम्यान चेन्नईने रैना आणि हरभजनशी असलेले करार संपुष्टात आणले. चेन्नई सुपर किंग्सच्या वेबसाईटवरूनही या दोघांची नावं हटवण्यात आली. या गोष्टी लक्षात घेता रैनाच्या माघारीमागचं कारण मीडियात आलेल्या कारणांपेक्षा वेगळं आणि गंभीर आहे हे नक्की. खेळाडूंनी दुखापत किंवा वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यास बदली खेळाडू मिळतो. मात्र चेन्नईने रैना आणि हरभजन यांच्याजागी कोणालाही संघात समाविष्ट केलं नाही.
रैनाच्या जागेसाठी इंग्लंडचा डेव्हिड मलान, हनुमा विहारी, मनोज तिवारी, युसुफ पठाण, चेतेश्वर पुजारा यांची नाव चर्चेत होती. मात्र इतका महत्त्वाचा खेळाडूच्या जागी चेन्नईने कोणालाही न घेणं कोड्यात टाकणारं होतं.
सतत बदल
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ही जोडगोळी चेन्नईसाठी सुपरहिट मानली जाते. अनौपचारिक पद्धतीने कामाची आखणी यासाठी हे दोघे ओळखले जातात. आतापर्यंतच्या अनुभवानुसार चेन्नई पहिल्या एकदोन मॅचमध्ये संघ पक्का करतात. हाच संघ स्पर्धेत शेवटपर्यंत खेळताना दिसतो. एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसेल किंवा लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकत नसेल तरीही धोनी-फ्लेमिंग त्या खेळाडूला डच्चू द्यायचे नाहीत.
संघातलं स्थान सुरक्षित असल्याने खेळाडू मुक्तपणे खेळू शकतात हा त्यामागचा विचार होता. एखाद्या मॅचमध्ये चांगली कामगिरी झाली नाही तर काढून टाकण्याचं भय मनात नसतं. पण यंदा चेन्नईला त्यांची माणसं मिळालीच नाहीत. वी आर अनचेंड हे धोनीचं टॉसवेळचं आवडतं वाक्य यंदा पूर्णत: फिरलं. चेन्नईने प्रत्येक मॅचला संघात बदल केले. त्यांची प्लेइंग इलेव्हन आतापर्यंत पक्की झाली नाही. बारा हंगामात जी गोष्ट चेन्नईच्या यशाचं गमक होतं, ते यंदा मात्र मोडकळीस आलं.
अख्खी टीम आऊट ऑफ फॉर्म
चेन्नई सुपर किंग्स एखाद्या कुटुंबासारखी आहे. धोनी-फ्लेमिंग या कुटुंबाचे पालक आहेत अशी संरचना आहे. चेन्नईचा सपोर्ट स्टाफही बहुतांश कायम आहे. धोनी-रैना संघातले स्टार खेळाडू असले तरी चेन्नईमध्ये मॅचविनर खेळाडूंची कमतरता कधीच नव्हती. आधीच्या हंगामांमध्ये माईक हसी, मुरली विजय, रवीचंद्रन अश्विन, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस असं कोणी ना कोणी उभं राहिलं आहे. मात्र यंदा चेन्नईची अख्खी टीम आऊट ऑफ फॉर्म आहे.
चेन्नईला सगळ्यात अडचण उभी राहिली ती म्हणजे बॅटिंगची. बाकी संघातले बॅट्समन मोठ्या खेळी करत असताना चेन्नईचे बॅट्समन फ्लॉप ठरत गेले. दुर्देव असं की चेन्नईची बॅटिंग गाळात रुतत होती आणि त्यांच्याकडे राखीव खेळाडूंमध्ये एकापेक्षा एक बॉलर होते. बॅट्समन हवा होता पण तो शेवटपर्यंत मिळाला नाही. पदार्पणात 33 रन्सची खेळी करणाऱ्या जगदीशनला लगेचच डच्चू देण्यात आला मात्र 8 मॅचेसमध्ये 62 रन्स करणाऱ्या केदार जाधवला पसंती देण्यात आली.
हाफ फिट खेळाडू
ट्वेन्टी-20 हा वेगवान फॉरमॅट आहे. बाकी संघांनी युवा ऊर्जेला प्राधान्य देत संघनिवड केली. चेन्नईची टीम तशीही डॅडीज आर्मी म्हणून ओळखली जाते. वय काहीही असलं तरी फिट असणं आवश्यक आहे. चेन्नईच्या बाबतीत तीच गोष्ट जाणवली नाही. शेन वॉटसनची सार्वकालीन महान ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये गणना होते. 2008 आयपीएल हंगामात वॉटसन मॅन ऑफ द सीरिज होता. चाळिशीकडे झुकलेल्या वॉटसनला कारकीर्दीत असंख्य दुखापतींनी सातत्याने त्रास दिला.
दुखापतीमुळे महत्त्वाच्या मालिकांमध्ये तो खेळू शकला नाही. पण जेवढं खेळू शकला त्यामध्ये त्याने जीव ओतून खेळ केला. दुखापतीचं लक्षात घेऊन वॉटसन बॉलिंग करत नाही. यंदा तर वॉटसनला फिल्डिंगमध्येही लपवावं लागेल अशी परिस्थिती होती. तो पूर्ण खाली वाकू शकत नाही, तो उलटा धावू शकत नाही, तो डाईव्ह मारू शकत नाही, तो कुठल्याही बाजूला फार स्ट्रेच करू शकत नाही, तो 30 यार्डबाहेर फिल्डिंग करू शकत नाही, तो दोन किंवा तीन रन घेऊ शकेलच याची शाश्वती नाही-इतक्या मर्यादा आलेल्या खेळाडूला घेऊन खेळताना कर्णधारासमोरचे पर्यायही कमी होतात.
कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून येतानाच ड्वेन ब्राव्हो दुखापत घेऊन आला होता. सुरुवातीच्या मॅचेस तो खेळलाच नाही. मात्र खेळू लागल्यानंतरही तो जुना ब्राव्हो दिसलाच नाही. त्याने बॅटिंग करणं जवळपास टाळलंच. ब्राव्होचा अनुभव चेन्नईसाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे परंतु तो शंभर टक्के फिट नसेल तर मग का खेळावं?
बेसिक्सचे वांदे
कॅचेस टाकणं, रनआऊट हुकणं, स्टंप्सच्या इथे बॅकअपला कोणीही नसताना पल्लेदार थ्रो करून ओव्हरथ्रोचे रन देणं, वाईड-नोबॉल टाकणं, एकाच्या जागी दोन-दोनाच्या जागी तीन रन्स घेऊ देणं अशा मूलभूत गोष्टींमध्ये चेन्नईचे खेळाडू घोटीव असतात.
वर्षानुवर्षे त्यांच्या यशात या गोष्टींचा वाटा मोलाचा होता. मात्र यंदा त्यांनी या कशावरही लक्ष दिलं नाही. दिल्लीविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी शिखर धवनचे तीन कॅच टाकले.
धोनीची बॅट रुसली
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रो मुळे धोनी रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्या क्षणानंतर धोनी जणू अज्ञातवासात गेल्यासारखं झालं.
लष्करासाठी काम केल्यानंतर धोनी रांचीतल्या त्याच्या फार्महाऊसवर असल्याचं समजत होतं. कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये तो दिसला नाही. टीम इंडियाच्या निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं त्याने सांगितलं होतं. ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये तो खेळेल असं चित्र होतं मात्र कोरोनामुळे हा वर्ल्डकप लांबणीवर गेला.
स्वातंत्र्यदिनी धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला. आयपीएलच्या निमित्ताने धोनी मैदानात उतरला मात्र जवळपास सव्वा वर्षानंतर. कोणत्याही स्पर्धात्मक, व्यावसायिक क्रिकेटपासून तो दूर होता. या प्रदीर्घ दूर असण्याचा परिणाम त्याच्या बॅटिंगमध्ये जाणवला.
एरव्ही 30 बॉल 60, 70 बॉल 110 रन्सची आव्हानं धोनी लीलया पेलत असे. परंतु यंदाच्या हंगामात ठेवणीतला धोनी दिसलाच नाही. शारजाच्या छोट्या ग्राऊंडवर तो चौकार-षटकारांची लयलूट करेल असं चित्र होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. एकेरी-दुहेरी घेत डावाची सुरुवात आणि मग गिअर बदलणं हे धोनीच्या डावाचं स्वरुप असतं. मात्र यंदा धोनी टॉप गिअरमध्ये गेलाच नाही. तो संघर्ष करत राहिला. नवखे बॉलर त्याला आऊट करू लागले. धोनी नॉटआऊट राहूनही चेन्नई मॅच गमवू लागलं.
वर गेलेली प्रत्येक गोष्ट कधीही ना कधी खाली येते हा नियम चेन्नईला लागू होतो आहे. देदिप्यमान कामगिरी असणाऱ्या चेन्नईला आता कात टाकून नव्याने उभं राहावं लागणार आहे. धोनी आणि फ्लेमिंगच्या बोलण्यातूनही त्यांनी प्लेऑफची आशा सोडून दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)