IPL 2020 : महिलांची ट्वेन्टी-20 स्पर्धा कशी असेल?

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी महिलांची ट्वेन्टी-20 स्पर्धा सुरू होत आहे. कशी असणार आहे ही स्पर्धा?

या स्पर्धेचं औपचारिक नाव काय?

'वुमन्स ट्वेन्टी-20 चॅलेंज' असं या स्पर्धचं नाव आहे. पुरुषांप्रमाणे महिलांची स्वतंत्र आणि मोठ्या स्वरुपाची आयपीएल स्पर्धा सुरू करण्याची मागणी गेली अनेक वर्षं होते आहे. एकदम मोठी स्पर्धा घेण्याऐवजी बीसीसीआयने प्रायोगिक स्वरुपात वुमन्स ट्वेन्टी-20 चॅलेंज ही स्पर्धा सुरू केली.

या स्पर्धेत बहुतांश भारतीय महिला खेळाडू असतात. त्यांच्याबरोबरीने अन्य देशातील प्रमुख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे. पुरुषांची आयपीएल सुरू असतानाच ही स्पर्धा आयोजित केली जाते.

यंदा होणाऱ्या स्पर्धेत कोणत्या देशातील खेळाडू आहेत?

एरव्ही या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या खेळाडूंचं प्राबल्य असतं. परंतु कोरोनामुळे मूळ आयपीएल स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धाही लांबणीवर गेली. 25 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात महिलांची बिग बॅश स्पर्धा होणार असल्यामुळे जगभरातील प्रमुख महिला खेळाडू ऑस्ट्रेलियात आहेत.

यामुळे यंदा बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजच्या खेळाडू दिसतील. यंदा पहिल्यांदाच थायलंडची खेळाडू स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. नट्टकन चान्टम असं तिचं नाव असून, आक्रमक बॅटिंगसाठी ती ओळखली जाते.

याआधी कोणी जेतेपद पटकावलं आहे?

2018 वर्षी सुपरनोव्हाज संघाने ट्रेलब्लेझर्स संघाला नमवत जेतेपदाची कमाई केली होती. गेल्यावर्षी 2019 मध्ये सुपरनोव्हाज संघाने व्हेलोसिटी संघावर विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2018 मध्ये फायनल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर गेल्यावर्षी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झाली होती.

वेळापत्रक कसं असणार आहे?

4 नोव्हेंबर-सुपरनोव्हाज वि. व्हेलोसिटी

5 नोव्हेंबर-व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स

7 नोव्हेंबर-ट्रेलब्लेझर्स वि. सुपरनोव्हाज

9 नोव्हेंबर-फायनल

मॅचेस कुठे आणि किती वाजता असतील?

वुमन्स चॅलेंज स्पर्धेच्या सर्व मॅचेस शारजा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. पहिली मॅच संध्याकाळी साडेसातला, दुसरी दुपारी साडेतीनला, तिसरी रात्री साडेसातला आणि फायनलही रात्री साडेसात वाजता सुरू होईल.

या स्पर्धेसाठी संघ कसे आहेत?

सुपरनोव्हाज-हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, चामरी अट्टापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तान्या भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकिरा सेलमान, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, अयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स-स्मृती मन्धाना (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूनम राऊत, रिचा घोष, दयालन हेमलता, नुझहात परवीन, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झूलन गोस्वामी, सिमरन बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नट्टकन चान्टम, दिआंड्रा डॉटिन, काशवी गौतम

व्हेलोसिटी-मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, शफाली वर्मा, सुशमा वर्मा, एकता बिश्त, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिब्यादर्शिनी, मनाली दक्षिणी, लेइग कॅस्परेक, डॅनी व्हॉट, सुन ल्यूस, जहानारा आलम, मुरली अनघा, मेघना सिंग.

कोरोना नियमावली

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी जारी केलेले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल सर्व महिला खेळाडूंनाही बंधनकारक आहेत. युएईला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मुंबई एकत्र आणण्यात आलं. तिथे त्यांच्या कोव्हिड चाचणी घेण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांवर उपचार सुरू करण्यात आले.

युएईला रवाना झाल्यानंतर सहा दिवस क्वारंटीन आणि पाच कोव्हिड चाचण्या निगेटिव्ह असल्यानंतरच त्यांचा सरावाचा मार्ग मोकळा होईल. स्पर्धेदरम्यान त्यांना बायोबबलमध्येच राहावं लागेल. कुठेही बाहेर जाण्याची अनुमती मिळणार नाही.

भारतासह जगभरातील बहुतांश महिला खेळाडू फेब्रुवारीनंतर खेळलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाचे नियम फॉलो करत मैदानावर खेळायला उतरणं हे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)