विराट कोहलीला पॅटर्निटी लिव्ह मिळणार, डे-नाईट टेस्टनंतर भारतात परतणार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पॅटर्निटी लिव्ह मंजूर करण्यात आली आहे.

आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर टीम इंडिया जंबो अशा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर आहे. बाळाच्या जन्मावेळी अनुष्कासोबत असावं यासाठी विराटने पॅटर्निटी लिव्हची मागणी केली होती.

बीसीसीआयने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे अॅडलेड इथं होणाऱ्या डे-नाईट टेस्टनंतर कोहली भारतात परतेल. बीसीसीआयने यासंदर्भात पत्रकाद्वारे माहिती दिली.

टेस्ट मालिकेतल्या उर्वरित तीन टेस्टकरता कोहली उपलब्ध नसेल. कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासंदर्भात औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान रोहित शर्माच्या दुखापतीसंदर्भातही बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. रोहितला वनडे तसंच ट्वेन्टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. टेस्ट मालिकेसाठी तो उपलब्ध असेल. तांत्रिकदृष्ट्या 8 डिसेंबरपर्यंत भारतासाठी खेळण्यास उपलब्ध नसलेला रोहित शर्मा मंगळवारी आयपीएल स्पर्धेची फायनल मात्र खेळणार आहे.

इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांच्या दुखापतीचा आढावा बीसीसीआय मेडिकल टीम घेत असून, योग्यवेळी त्यांचा संघात समावेश करण्यात येईल.

खांद्याच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी टी.नटराजनची संघात निवड करण्यात आली आहे.

वनडे संघात अतिरिक्त विकेटकीपर बॅट्समन म्हणून संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे.

रोहितच्या दुखापतीवरून झालेला वाद

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या मूळ संघात, टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही संघांमध्ये उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचं नाव नसल्याच्या मुद्यावरून बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचाईज मुंबई इंडियन्स यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे.

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. डाव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे तो दोन मॅच खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत कायरेन पोलार्डने मुंबईचं नेतृत्व केलं. मात्र रोहित हा टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाचा अविभाज्य भाग आहे.

मात्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर त्याच्या नावाचा समावेश करता येत नाही असं निवडसमिती अध्यक्ष आणि माजी खेळाडू सुनील जोशी यांनी सांगितलं. रोहितच्या बरोबरीने फास्ट बॉलर इशांत शर्माच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयची मेडिकल टीम आढावा घेत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-20, वनडे आणि टेस्टचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा हा दौरा जानेवारी मध्यापर्यंत चालणार आहे. दौऱ्याचं प्रदीर्घ स्वरुप लक्षात घेता रोहितचं नाव संघात असणं अपेक्षित होतं. तो अंतिम संघाचा भाग कधी होऊ शकेल हे तो दुखापतीतून किती लवकर सावरतो यावरून ठरलं असतं. परंतु निवडसमितीने त्याच्या नावाची घोषणाच केली नव्हती.

ज्याअर्थी निवडसमितीने अडीच महिने चालणाऱ्या दौऱ्यासाठी रोहितची निवड केली नाही याचा अर्थ रोहितची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. याचा दुसरा अर्थ रोहित उर्वरित आयपीएलमध्ये खेळू शकतो का यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र बीसीसीआयने रोहितविना टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर काही तासातच मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडल्सवर रोहित सराव करू लागल्याचे फोटो शेअर करण्यात आले होते.

एकीकडे बीसीसीआय निवडसमिती अडीच महिन्याच्या खंडप्राय दौऱ्यासाठी रोहितचा विचार करत नाही आणि दुसरीकडे अंतिम टप्प्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेत, मुंबई इंडियन्ससाठी 10 नोव्हेंबरपर्यंत रोहित खेळण्यासाठी फिट आहे असं परस्परविरोधी चित्र निर्माण झालं आहे.

काय वैशिष्ट्यं आहेत संघनिवडीची?

  • के.एल.राहुल आणि कुलदीप यादवचं टेस्ट संघात पुनरागमन झालं आहे.
  • कोरोना काळात सावधानतेचा उपाय म्हणून मोठा संघ निवडण्यात आला आहे. या धोरणाचा फायदा होऊन मोहम्मद सिराजला टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे.
  • टेस्ट विशेषज्ञ चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. हे दोघं आणि टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ युएईत दाखल झाले आहेत.
  • मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे सलामीवीराच्या जागेसाठी शर्यतीत असतील.
  • वनडे आणि ट्वेन्टी-20 संघातून विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला डच्चू देण्यात आला आहे.
  • उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचं नाव दुखापतीमुळे सामील करण्यात आलेलं नाही. रोहित नसल्यामुळे वनडे आणि ट्वेन्टी-ट्वेन्टीमध्ये राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. राहुल विकेटकीपरही असणार आहे. अतिरिक्त विकेटकीपर बॅट्समन म्हणून संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
  • आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकरून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीची पहिल्यांदाच टीम इंडियासाठी निवड झाली होती. मात्र खांद्याची दुखापत झाल्याने वरुणला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्याऐवजी फास्ट बॉलर टी.नटराजनची निवड करण्यात आली आहे.
  • सप्टेंबर 2019 नंतर हार्दिक पंड्याचं संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएलमध्ये हार्दिक विशेषज्ञ बॅट्समन म्हणून खेळतो आहे. दुखापतीमुळे त्याने बॉलिंग केलेली नाही. ऑस्ट्रेलियात तो बॉलिंग करणार की नाही याविषयी साशंकता आहे.
  • दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही.
  • कोरोनामुळे क्वारंटीन आणि अन्य नियम कठोर असल्याने बीसीसीआयने चार नेट बॉलर्सना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. कमलेश नागरकोट्टी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल आणि टी. नटराजन संघाबरोबर असतील असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र कमलेश आता संघाबरोबर जाणार नाही.

अशी असेल टीम इंडिया

टेस्ट-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.

वनडे- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, के.एल. राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

ट्वेन्टी-20 विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, के.एल.राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी.नटराजन.

दौऱ्याचा कार्यक्रम

या दौऱ्यात तीन वनडे, तीन ट्वेन्टी-20, चार टेस्ट असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

27 नोव्हेंबर-पहिली वनडे (सिडनी)

29 नोव्हेंबर-दुसरी वनडे (सिडनी)

2 डिसेंबर-तिसरी वनडे (कॅनबेरा)

........................................

4 डिसेंबर -पहिली ट्वेन्टी-20 (कॅनबेरा)

6 डिसेंबर-दुसरी ट्वेन्टी-20 (सिडनी)

8 डिसेंबर- तिसरी ट्वेन्टी-20 (सिडनी)

.........................................

17-21 पहिली टेस्ट, डे नाईट (अॅडलेड)

26-30 दुसरी टेस्ट (मेलबर्न)

7-11 तिसरी टेस्ट (सिडनी)

15-19 चौथी टेस्ट ब्रिस्बेन

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)