IPL 2020 : प्रीती झिंटा यांचा किंग्ज इलेव्हन पंजाब योग्य नेतृत्वा अभावी बारगळलेला संघ

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

अभिनेत्री आणि उद्योगपती प्रीती झिंटाची टीम म्हणून प्रसिद्ध असलेली पंजाबची टीम सलग तेराव्या वर्षी रित्या हातानेच आयपीएलमधून परतली.

दरवर्षी नवी विटी-नवा दांडू पद्धत अवलंबणाऱ्या पंजाबची पराभव गाथा क्रिकेटच्या दृष्टीने तसंच व्यवस्थापन, मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासण्यासारखी आहे.

आयपीएल स्पर्धेचं हे तेरावं वर्षं आहे. तेराही हंगाम खेळणाऱ्या संघांची संख्या कमी आहे. चेन्नई, राजस्थान संघांवर बंदीची कारवाई झाल्याने ते दोन वर्षं खेळू शकले नाही. पुणे, कोची, गुजरात हे संघ निर्माण झाले आणि रद्दबातलही झाले. पंजाबचा संघ तेराच्या तेरा हंगाम खेळला आहे. ते दरवर्षी खेळतात मात्र एक तपानंतरही त्यांच्या खात्यात जेतेपद नाही.

बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळानुरुप बदलावं लागतं. तसं केलं नाही कर्मठ राहिलं तर नुकसान होतं. परंतु पंजाबच्या बाबतीत बदलानेच त्यांचा घात केला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या बाबतीत दरवर्षी घाऊक बदल करणारा संघ अशी पंजाबची ओळख झाली आहे. 13 वर्षांत पंजाबने तब्बल 12 कर्णधार केले. याकाळात त्यांनी 9 विविध प्रशिक्षकांवर जबाबदारी सोपवली.

एकीकडे चेन्नईसाठी धोनी, बेंगळुरूसाठी विराट, मुंबईसाठी रोहित हे कर्णधारपदी फिट झालेले असताना पंजाबला नेताच गवसला नाही. युवराज सिंग, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अॅडम गिलख्रिस्ट, डेव्हिड हसी, जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, रवीचंद्रन अश्विन, लोकेश राहुल अशा डझनभर खेळाडूंनी पंजाबचं नेतृत्त्व केलं.

या यादीपैकी जयवर्धने आणि संगकारा जोडगोळीने प्रदीर्घ काळ श्रीलंकेचं नेतृत्व केलं. बॅटिंगमध्ये नवनवी शिखरं गाठत असताना या दोघांनी कर्णधारपदाचा काटेरी मुकूटही सांभाळला.

गिलख्रिस्टकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व रुढार्थाने फार काळ नसलं तरी लीडरशिप गटाचा तो भाग होता. संघातला अनुभवी खेळाडू, सलामीवीर आणि विकेटकीपर म्हणून गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अविभाज्य भाग होता. जॉर्ज बेलीनेही ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं. डेव्हिड हसी जगभरातील ट्वेन्टी-20 लीग खेळतो. त्याच्याकडेही ही जबाबदारी देण्यात आली होती.

विदेशी खेळाडूंनी आयपीएल संघाचं नेतृत्व करणं अनोखं नाही. पण त्यासाठी भारतासाठी खेळणारे खेळाडू, युवा खेळाडू, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन यांच्याशी समन्वय असावा लागतो. भाषेचाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

वर उल्लेखलेल्या मंडळींपैकी बहुतांशजण कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असताना पंजाबचे कर्णधार झाले. पंजाबचे हे कर्णधार तिशीत आले होते. पंजाबचं नेतृत्व आजमावल्यानंतर अनेकांनी निवृत्ती स्वीकारली.

आयपीएल सुरू झालं तेव्हा धोनी-कोहली-रोहित तरुण होते. पंजाबकडे तेव्हा युवराज सिंग होता. युवराज खेळाडू म्हणून अफलातून होता. शैलीदार बॅट्समन, उपयुक्त फिरकीपटू आणि चपळ फिल्डर अशी त्याची ओळख होती.

पण कर्णधार ही सर्वस्वी वेगळी जबाबदारी पडते. टीम इंडियाच्या नेतृत्वासाठी अनुभवी युवराज असतानाही धोनीची निवड झाली होती. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे युवराजने पंजाबचं नेतृत्व केलं. त्याने जिंकून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र संघाची भट्टी जमली नाही.

काही हंगामांनंतर पंजाबने युवराजला सोडून दिलं. त्यामुळे त्यांच्याकडे भारतीय कर्णधार उरला नाही आणि त्यांची नेतृत्वासाठी शोधाशोध सुरू झाली. युवराजनंतर प्रदीर्घ काळ त्यांना या जबाबदारीसाठी भारतीय खेळाडू मिळालाच नाही. नेतृत्व विदेशी खेळाडूकडे गेलं. प्रत्येकाने प्रयत्न केले. काही निवृत्त झाले, काहींवर व्यवस्थापनाचा विश्वास नव्हता.

तीन वर्षांपूर्वी फिरकीपटू अश्विनकडे पंजाबने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. संघ म्हणून प्रभाव पाडण्यात अश्विनही कमी पडला. अश्विनने दोन हंगामात नेतृत्व केलं, तिसऱ्या हंगामाआधी त्याला कर्णधारपदावरून आणि संघातूनही डच्चू देण्यात आला.

यंदा उमद्या राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. मात्र राहुलकडे तिहेरी जबाबदाऱ्या होत्या. कर्णधारपद, विकेटकीपिंग आणि ओपनिंग. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिहेरी जबाबदारी समर्थपणे पेलणारे खेळाडू मोजकेच आहेत.

प्रत्येक जबाबदारी आव्हानात्मक आहे. अफलातून फिटनेसमुळे राहुलने बहुतांश मॅचेसमध्ये तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या मात्र एकाच माणसाकडे एवढ्या कामाचा बोजा टाकणं अन्यायकारी ठरतं. तसंच झालं.

कर्णधारांच्या बाबतीत तेच प्रशिक्षकांच्या बाबतीत पंजाबने केलं. टॉम मूडी, मायकेल बेव्हन, अॅडम गिलख्रिस्ट, डॅरेन लेहमन, संजय बांगर, वीरेंद्र सेहवाग, ब्रॅड हॉज, माईक हेसन, अनिल कुंबळे या क्रिकेटविश्वातल्या नावाजलेल्या लोकांनी पंजाबचं प्रशिक्षकपद सांभाळलं.

काहींना हवे तसे खेळाडू मिळाले नाहीत, काहींना खेळाडूंकडून काम करवून घेता आलं नाही. काहींचा कर्णधाराबरोबर समन्वय नव्हता. काहींना खेळाडूंना आधार वाटेल असं वातावरण तयार करता आलं नाही.

आयपीएल ही दीड महिना चालणारी स्पर्धा आहे. विदेशी खेळाडू, भारतासाठी खेळणारे खेळाडू, युवा भारतीय खेळाडू यांची मोट बांधावी लागते. कुठलाच संघ सगळे सामने जिंकत नाही. पराभव पदरी पडतोच.

पण बाकीचे संघ चुकांतून शिकतात. झालेल्या चुका पुन्हा करणं टाळतात. खेळपट्टी, मैदानाचा आकार, प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे यांचाही सखोल अभ्यास करावा लागतो.

कर्णधार, प्रशिक्षक आणि खेळाडू दोन्ही सतत बदलत असल्याने पंजाबला दरवर्षी नव्याने मांडणी करावी लागते. आधीच्या चांगल्या गोष्टी पुसल्या जातात आणि कटू आठवणी मानगुटीवर बसतात.

हंगामात सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला परपल कॅपने गौरवण्यात येतं.

2008 मध्ये पंजाबकडून खेळलेल्या शॉन मार्शला ऑरेंज कॅप मिळाली होती. कदाचित यंदा राहुलला ऑरेंज कॅप मिळेल. मात्र जेतेपदापासून दूर राहावं लागल्याने राहुलसाठी या कॅपचं महत्त्व कमी होईल. 2018 वर्षी पंजाबच्या अँड्यू टायला परपल कॅपने सन्मानित करण्यात आलं होतं.

हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम दोनदा पंजाबतर्फे खेळलेल्या मॅक्सवेलच्या नावावर आहे. 2014 मध्ये मॅक्सवेलला मोस्ट व्हॅल्यूएबल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उगवता खेळाडू पुरस्कारासाठी पंजाबतर्फे खेळलेल्या मनदीप सिंगची 2012मध्ये तर अक्षर पटेलची 2014 मध्ये निवड करण्यात आली होती.

पंजाबच्या बॅट्समननी मिळून आयपीएल स्पर्धेत 11 शतकं झळकावली आहेत तर दिमित्री मॅस्करेन्हस आणि अंकित राजपूत यांनी पंजाबसाठी खेळताना डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली आहे.

यंदाची पंजाबची कामगिरी पाहिली तर त्यांनी 14 मॅच खेळल्या. त्यापैकी 6 सहा जिंकल्या तर 8 गमावल्या. ही कामगिरी वाईट म्हणता येणार नाही. त्यांची पहिली मॅच टाय झाली पण सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. मॅचमध्ये त्यांची एक रन अंपायर्सनी शॉर्ट रन म्हणून घोषित केली.

शारजाच्या छोट्या मैदानावर त्यांनी 223 रन्सचा डोंगर उभारला पण त्याचा बचाव त्यांना करता आला नाही. ही मॅच राजस्थानने अविश्सनीय पद्धतीने जिंकली. कोलकाताविरुद्ध ते जिंकता जिंकता हरले. हरण्याचं अंतर होतं दोन रन्स.

बेभरवशीपणा हा स्थायीभाव असलेल्या ग्लेन मॅक्सवेलसाठी पंजाबने लिलावात तब्बल 10.75 कोटी रुपये खर्च केले. सूर गवसला तर तडाखेबंद बॅटिंग करणारा मॅक्सवेल पंजाबला गरजेचा होता.

उत्कृष्ट फिल्डर, उपयुक्त फिरकीपटू आणि बॅटिंग करेल म्हणून मॅक्सवेल ताफ्यात होता. परंतु मॅक्सवेलने पंजाबची सपशेल निराशा केली. पंजाबने मॅक्सवेलला 13 सामने खेळवलं. अतरंगी पॉवरहिटिंगसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे षटकारांची लयलूट अशा स्पर्धेत मॅक्सवेलला एकही षटकार लगावता आला नाही.

41वर्षीय ख्रिस गेल पहिल्या सत्रात खेळलाच नाही. घणाघाती बॅटिंग हा गेलच्या बॅटिंगचा आत्मा आहे. परंतु वाढतं वय, दुखापती यामुळे गेलच्या वावराला मर्यादा आहेत.

प्रचंड ताकद, विलक्षण टायमिंग आणि कोणत्याही बॉलरचा पालापाचोळा करण्याचा आत्मविश्वास गेलकडे आहे मात्र त्याच्या तंत्रात उणिवाही आहेत. हुशार संघ गेलला टिपू शकतात. गेलने यंदा पंजाबला विजयपथावर आणलं. मात्र मोक्याच्या मॅचमध्ये गेल अपयशी ठरला.

लिलावावेळीच तज्ज्ञांनी पंजाबने बॉलिंगकडे लक्ष दिलं नसल्याची टीका केली होती. मोहम्मद शमी या हुकमी एक्काच्या जोडीला बॉलर्सची फौज असती तर पंजाबचं नशीब पालटलं असतं. तरुणतुर्क अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र बॉलिंग युनिट असं प्रस्थापितच झालं नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तसंच इंडिया ए संघासाठी खेळताना चांगलं खेळणारा इशान पोरेल हा गुणी फास्ट बॉलर पंजाबकडे होता, पण इशानला एकाही मॅचमध्ये संधी देण्यात आली नाही.

सातत्याने चांगलं खेळण्याच्या बरोबरीने आयपीएल स्पर्धेत नशिबाचीही साथ लागते. पंजाबच्या भाळी नशिबाची साथ नाही. तेराव्या वर्षीही रित्या हाताने परतताना पंजाबला 2021 हंगामात काय बदल करता येतील याचे वेध लागले असतील.

पंजाबचे आतापर्यंतचे कर्णधार

  • युवराज सिंग
  • कुमार संगकारा
  • महेला जयवर्धने
  • अॅडम गिलख्रिस्ट
  • डेव्हिड हसी
  • जॉर्ज बेली
  • वीरेंद्र सेहवाग
  • डेव्हिड मिलर
  • मुरली विजय
  • ग्लेन मॅक्सवेल
  • रवीचंद्रन अश्विन
  • के.एल. राहुल

पंजाबचे आतापर्यंतचे हेड कोच

  • टॉम मूडी
  • मायकेल बेव्हन
  • अॅडम गिलख्रिस्ट
  • डॅरेन लेहमन
  • संजय बांगर
  • वीरेंद्र सेहवाग
  • ब्रॅड हॉज
  • माईक हेसन
  • अनिल कुंबळे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)