मुंबई लोकलची गर्दी टाळण्यासाठी अॅप तयार करणार - विजय वडेट्टीवार

रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अॅप तयार केलं जातंय, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या अॅपमधून तिकीटं बुक करता येतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.

"रेल्वेसाठी एकाच वेळेत गर्दी होणार नाही यासाठी खासगी ऑफिसच्या लोकांना वेगवेगळ्या वेळांमध्ये लोकलमधून प्रवास करता येईल आणि लेडीज स्पेशल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात अॅपचं काम पूर्ण करू," असंही विजय वडेट्टीवार

मुंबई लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा, राज्याचं केंद्राला पत्र

गेले सात महिने कोरोनामुळे बंद असलेली मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू करा असं पत्र महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला लिहीलं आहे.

अनलॉकनंतर राज्यसरकारने लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू केली होती. राज्य सरकारच्या विनंतीबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतलेला नाही.

पण, सामान्यांना पूर्वीसारखा मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार नाही. काही विशिष्ट वेळेमध्येच सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.

"मुंबईच्या लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी सुरू कराव्यात या विनंतीचं पत्र आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवलं आहे. लोकल कशा पद्धतीनं चालवण्यात याव्यात याबाबतही आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे. अजून त्याचं त्यावर काही उत्तर आलेलं नाही," असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

राज्य सरकारच्या पत्रानुसार,

तिकीट आणि पास असणाऱ्यांसाठी सकाळी पहिल्या लोकलपासून सकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा

सकाळी 8.30 ते 10.30 या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलचा वापर करता येईल.

सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा.

संध्याकाळी 5 वाजल्यापासून 7.30 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवासी प्रवास करू शकणार.

रात्री 8 वाजल्यानंतर पुन्हा सर्वसामान्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार.

राज्य सरकारने यासाठी रेल्वेकडे जास्ती गाड्या सोडण्याची विनंती केली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी हे पत्र पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना लिहीलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)