कोरोना लस : BCG लस ठरू शकते फायदेशीर?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी औषध, लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लशींवर संशोधन योग्य पद्धतीने सुरू असलं तरी सर्वसामान्यांसाठी कोव्हिड-19 विरोधी लस पुढील वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, भारतात कोरोना विरोधातील लढाईत एक आशेचा किरण दिसू लागलाय. हा आशेचा किरण आहे BCG ची लस.

सर्वसामान्यांसाठी सहजतेने उपलब्ध असणारी आणि लहान मुलांना दिली जाणारी BCG ची लस कोव्हिड-19 विरोधातील युद्धात उपयुक्त ठरू शकते, असं इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासात आढळून आलं आहे.

कोरोनावर BCG' ची लस उपयुक्त

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने BCG ची लस कोव्हिड-19 विरोधातील लढाईत फायदेशीर ठरू शकते का, यावर अभ्यास केला.

ICMR च्या संशोधनातील निष्कर्ष

  • BCG च्या लशीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • प्रौढ व्यक्तींच्या शरीरातील अॅंटी बॉडी (रोग प्रतिकारशक्ती ) वाढल्याचं निदर्शनास आलं.
  • रोग प्रतिकारक शक्ती वाढत असल्याने कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत मदत

तज्ज्ञांचं काय मत?

BCG लस क्षय रोगाविरोधात म्हणजे टीबी विरोधात वापरली जाते. भारतात लसीकरण मोहिमे अंतर्गत ही लस सर्व लहान मुलांना दिली जाते. जेणेकरून लहान मुलांचा संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो. कोव्हिड-19 विरोधात BCG लशीच्या उपयुक्ततेबाबत ICMR चं संशोधन फार महत्त्वाची भूमिका बजावेल असं कोरोनाविरोधात उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या या संशोधनाबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे सांगतात,

"BCG ची लस भारतात अत्यंत सहजरित्या उपलब्ध होणारी आणि सुरिक्षत लस आहे. ही लस कमी किमतीत उपलब्ध असल्याने सामान्यांना परवडणारी आहे. ICMR च्या माहितीनुसार, ही लस दिल्याने प्रौढ व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढली. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोरोना व्हायरविरोधातील लढाईत रोग प्रतिकारक शक्ती फार महत्त्वाची आहे. ज्यामुळे व्हायरसविरोधात शरीर चांगला मुकाबला करू शकतं."

"भारतात जवळपास 100 टक्के लहान मुलांना BCG ची लस दिली जाते. जेणेकरून त्यांचा टीबी आणि इतर आजारांच्या संसर्गापासून बचाव करता येईल. या लशीचे दुष:परिणाम अजिबात नाहीत. त्यामुळे ICMR चं संशोधन कोव्हिड-19 विरोधातील लढाईत फार महत्त्वाचं आहे," असं डॉ. ललित आनंदे पुढे म्हणाले.

ICMRच्या अभ्यासाबाबत माहिती

ICMR ने या संशोधनासाठी 60 ते 80 वर्षं वयोगटातील स्वयंसेवक निवडले होते. मधूमेह, उच्चरक्तदाब, कोरोनाच्या अॅंटीबॉडी असलेले आणि इतर आजार नसलेल्या स्वयंसेवकांची निवड करण्याती आली होती.

जुलै ते सप्टेंबर महिन्याच चेन्नईमध्ये कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये रहात असलेल्या या स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली

54 स्वयंसेवकांना BCG लशीचा डोस देण्यात आला.

32 स्वयंसेवकांना लस देण्यात आली नाही.

एक महिन्यानंतर त्यांची रक्त तपासणी करण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडनॉम गेब्रियेसीस यांनी लँसेट जर्नलमध्ये एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, "बीसीजी लसीमध्ये अशी क्षमता आहे की, या आजारावर लस विकसित होत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम कमी करणारा उपाय म्हणून याचा उपयोग होऊ शकतो."

"संशोधनात BCG लस प्रौढामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवते हे दिसून आलं आहे. कोव्हिड विरोधात लस उपयुक्त असल्याचं संशोधन आढळून आलं. पण तरी हे संशोधन पुढे सुरू रहाणार आहे," असं ICMR स्पष्ट करण्यात आलं आहे.

BCG लस काय आहे?

BCG लस म्हणजे बॅसिलस केल्मेटे गुरिन. ही लस टीबी म्हणजे क्षय रोगाविरोधात वापरली जाते. टीबी विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लशीचा वापर केला जातो. ही लस लहान मुलांना इंजेक्शनच्या स्वरूपात दिली जाते. बीसीजीची लस 1921 मध्ये पहिल्यांना वापरण्यात आली.

BCG मुळे भारतात कोव्हिड-19 मुळे लहान मुलं दगावण्याचं प्रमाण कमी?

भारतात प्रत्येक लहान मुलाला BCG ची लस दिली जाते. BCG लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असेल, तर लहान मुलांना याचा फायदा झाला असेल का? हा प्रश्न आम्ही तज्ज्ञांना विचारला.

याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबईतील फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. विकास ओस्वाल म्हणतात,

"लहान मुलांना कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी BCG लशीचा फायदा झाला, असं निश्चित म्हणू शकतो. BCG लशीचा फायदा म्हणजे, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लहान मुलांचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे. स्पेन, अमेरिका यांसारख्या देशात लहान मुलांचा मृत्यूदर खूप जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोनापासून बचावासाठी BCG लशीची फार महत्त्वाची भूमिका आहे."

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,

मुंबईत 0 ते 9 वयोगटातील 4425 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 14 कोरोनाग्रस्त मुलांचा मृत्यू झाला.

तर, 10 ते 19 वयोगटातील 9355 मुलांना कोरोनाचा संसर्ग. त्यापैकी 31 मुलं मृत्यूमुखी पडली.

प्रौढांना कसा होतो फायदा?

BCG ची लस लहान मुलांना दिली जाते. ही लस प्रौढांना दिली जात नाही. मग, कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी याचा फायदा कसा होईल? ICMR च्या संशोधनात BCG लशीमुळे शरीरातील memory cells अॅक्टिव्ह झाल्याचं समोर आलं. याचा फायदा काय?

याबाबात बोलताना डॉ. ओस्वाल म्हणतात, "सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, शरीरातील मेमरी सेल्स अॅक्टिव्ह झाल्याने, व्हायरसने शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर या मेमरी सेल्सना माहीत असेल की व्हायरसला प्रतिबंध करायचाय. त्यामुळे व्हायरसचा शरीरात गुणाकार होण्यास प्रतिबंध केला जाईल. प्रौढ व्यक्तींमध्ये मेमरी सेल्स अॅक्टिव्ह झाल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि याचा कोव्हिड विरोधात नक्कीच फायदा होऊ शकेल."

"भारतात कोरोनाविरोधात लस अजूनही आलेली नाही. त्यामुळे आता वेळ आलीये की सरकारने प्रौढ व्यक्तींना ही लस दिली पाहिजे. BCG ची लस दिल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचं ICMR च्या संशोधनात स्पष्ट झालंय. ही लस कोव्हिड-19 विरोधातील युद्धात फार महत्त्वाची ठरणार आहे," असं डॉ. विकास पुढे म्हणाले.

शरद पवारांनी घेतली BCG ची लस

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याताली सिरम इंन्स्टिट्युटमध्ये गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सिरमध्ये 'बीसीजी' लस घेतल्याचं सांगितलं होतं.

"सिरममध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'बीसीजी' लस तयार होते. मी हीच प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतली आहे. मी आणि माझ्या स्टाफने ही लस घेतली आहे," असं पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)