बायपोलर डिसॉर्डर म्हणजे काय? आत्महत्येचं कारण ठरू शकणारा हा आजार कुणाला होऊ शकतो?

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनिल (बदललेलं नाव) 11-12 वर्षांचे होता तेव्हाची गोष्ट आहे. त्यावेळी कोणत्या तरी कारणामुळे त्याचा आईसोबत वाद झाला होता. रागाच्या भरात त्याने आपल्या आईवरच हात उगारला.

अनिलचं हे वागणं आईसाठी नवं नव्हतं. आधीही अशा प्रकारे तो रागाच्या भरात वस्तू भिरकावणं, लहान भावाला धक्का देऊन पाडणं, चापट मारणं असे प्रकार करायचा.

अशा वेळी अनिल इतका आक्रमक व्हायचा की त्याच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसायचं. शाळेतील इतर मुलांसोबत अनिलचं भांडण, मारामारी यांची तक्रार नेहमीच येत असायची.

त्याचप्रमाणे अनिलच्या स्वभावाचं एक वेगळं रुपही पाहायला मिळायचं. कधी कधी तो एकदम शांत होऊन जायचा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. अनेकवेळा विनाकारण रडत बसायचा. स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचा.

अनिल लहान असल्यामुळे त्याच्या वागण्याकडे आईने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पुढे वयात येत असल्यामुळे असं घडत असेल, असं आईला वाटायचं.

पण नंतर नंतर अनिलचं वागणं विचित्र असल्याची जाणीव आईला व्हायला लागली. त्याच्या स्वभावातील चढ-उतारात एक पॅटर्न दिसू लागला. असं नेहमीच होऊ लागलं होतं.

पण ज्या दिवशी अनिलने चक्क आईवरच हात उचलला तेव्हा पाणी डोक्याच्या वर जात असल्याचं आईला कळालं.

आवेगात अनिल स्वतःचं नुकसान करून घेईल का, याची भीती आईला वाटू लागली. त्यामुळेच याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय आईने घेतला.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनीषा सिंघल यांच्याशी बोलल्यानंतर अनिलला 'बायपोलर डिसऑर्डर' असल्याचं आईला समजलं.

बायपोलर डिसॉर्डर म्हणजे काय?

बायपोलर डिसॉर्डर हा एक मानसिक आजार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डोपामाईन नावाचं संप्रेरक (हार्मोन) आपल्या शरीरात असतं. याच्या असंतुलित प्रमाणामुळे व्यक्तीच्या स्वभावात (मूड) चढ-उतार दिसू लागतात.

बायपोलर डिसॉर्डरने पीडित व्यक्तीला मेनिया किंवा डिप्रेशनचे झटके येतात. म्हणजेच त्यांचा मूडमध्ये अचानक चढ-उतार येतात. (हाय किंवा लो)

बायपोलर वनमध्ये मेनिया म्हणजेच तेजीचे झटके येतात. या स्थितीत व्यक्ती मोठ्यामोठ्या बाता करतो. सतत काम करतो, त्याला बिलकूल झोप लागत नाही. तरीसुद्धा तो थकलेला दिसत नाही. आराम न घेताही तो प्रचंड उत्साही दिसतो.

या डिसॉर्डरने पीडित व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खर्च करतो. कोणताही विचार न करता मोठे निर्णय घेतो. त्याचं मन एक ठिकाणी स्थिर राहत नाही.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पूजाशिवम जेटली याच डिसऑर्डरच्या एका रुग्णाचा उल्लेख करून सांगतात, "बायपोलर डिसॉर्डरने पीडित असलेली एक व्यक्ती उद्योजक कुटुंबातील होती. त्यांनी आपल्या व्यवसायात एकामागून एक अतर्क्य निर्णय घ्यायला सुरुवात केली.

मोठ्यामोठ्या गोष्टी करू लागले. प्रचंड खर्च करू लागले. त्यांना झोप येणं बंद झालं. ते स्वतःला प्रचंड सामर्थ्यवान समजू लागले होते. यासोबतच त्यांची सेक्स ड्राईव्हसुद्धा वाढली होती.

"या सगळ्या कारणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथंही ते लोकांना नोकरी देण्याबाबत, आपली संपत्ती त्यांच्या नावे करण्याबाबत बोलू लागले."

डॉ. जेटली पुढे सांगतात, "अशा लोकांना वास्तविकतेचं भान राहत नाही. अशी लक्षणं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्याला मेनिया म्हणजेच तेजी असं संबोधलं जातं.

टाईप टू बायपोलर (हायपोमेनिया)

यामद्ये नैराश्याचे झटके येतात. या डिसॉर्डरमध्ये मन निराश राहू लागतं. विनाकारण रडण्याची इच्छा होते. कोणत्याच कामात मन लागत नाही. झोप आली नसली तर तसंच अंथरूणावर पडून राहावं, असं वाटतं. काही वेळा अतिझोप किंवा निद्रानाश अशीही लक्षणं दिसून येतात.

असे रुग्ण सतत मरगळलेल्या अवस्थेत दिसतात. ते इतर लोकांना भेटणं-बोलणं बंद करून टाकतात.

कधी दखल घ्यावी?

साधारणपणे, आपण आपल्या आयुष्यात अशा प्रकारच्या स्वभावातून अनेकवेळा जात असतो. पण दोन-तीन दिवसांत आपण त्यातून बाहेर पडतो. मात्र हीच स्थिती दोन आठवड्यांपर्यंत कायम राहिल्यास त्याला हायपोमेनिया संबोधलं जातं.

डॉ. मनीषा सिंघल यांच्या मते, "वरील लक्षणांचे झटके एकदा जरी आले तरी त्या व्यक्तीला बायपोलर डिसॉर्डरने ग्रासल्याचं कळून येतं."

बायपोलर डिसॉर्डर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतं, पण प्रामुख्याने 20 ते 30 वयोगटात याचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात.

आजकाल, 20 पेक्षा कमी वयाच्या मुलांनासुद्धा 'अर्ली बायपोलर डिसॉर्डर'ने ग्रासल्याचं समोर येत आहे.

दिल्लीच्या सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. रुपाली शिवलकर सांगतात, "हा आजार खूप जुना आहे. पण आता-आता या आजाराची ओळख योग्य प्रकारे होऊ लागली आहे.

लोक याबाबत आता जागृत झाले आहेत. त्यामुळे हा आजार जास्त प्रमाणात समोर येऊ लागला आहे. आजच्या काळात बायपोलर डिसऑर्डर होणं सामान्य आहे. 100 पैकी 3 ते 5 टक्के लोकांमध्ये बायपोलर डिसऑर्डरची लक्षणं दिसू शकतात."

त्या सांगतात, "जर एखाद्या व्यक्तीमध्ये वयाच्या चाळीशीनंतर अशा प्रकारचा डिसॉर्डर दिसून आला. तर त्याचा संबंध मेंदूतील बदलांशी निगडित असू शकतो. याला ऑर्गेनिक मूड डिसऑर्डर म्हटलं जातं. यामध्ये मेंदूच्या संरचनेत काही बदल झाला आहे का, याची तपासणी केली जाते."

बायपोलर आणि आत्महत्येचा विचार

लहान मुलं पौगंडावस्थेत जात असताना हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. यामुळे त्यांच्या मूडमध्येही बदल होऊ लागतात. ते एखाद्या गोष्टीवरून चिडू शकतात. नाराज किंवा रागीट होऊ शकतात. पण अशी स्थिती खूप वेळ राहत नाही.

हे सायक्लोथायमिक डिसॉर्डर अंतर्गत येतं. यामध्ये राग, नाराजी असे स्वभावगुण सौम्य असतात.

किशोरवयात असं होणं स्वाभाविक आहे, त्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. पण एखाद्या मुलामध्ये बायपोलर डिसॉर्डर असल्यास तो 'क्लासिकल मेनिया' किंवा 'डिप्रेशन'च्या स्थितीत येतो.

यामध्ये जास्त काळ निराश राहणं, राग येणं, आक्रमकता, निद्रानाश, अफाट खर्च करणं किंवा लैंगिक गोष्टींकडे आकर्षित होणं, यांचा समावेश आहे.

अशी लक्षणं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास बायपोलर डिसॉर्डर असण्याची शक्यता असते.

नुकतेच बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. सुशांतलासुद्धा बायपोलर डिसॉर्डरनेच ग्रासल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये होत्या.

डॉ. पूजाशिवम जेटली सांगतात, "मेनिया किंवा नैराश्य या प्रकरणांमध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात. या स्थितीत वास्तविकतेचं भान राहत नाही. त्यामुळे आपण काहीसुद्धा करू शकतो, असं रुग्णाला वाटू लागतं. त्यांची विचारक्षमता नष्ट झालेली असते."

जेटली यांच्या मते, "असे रुग्ण कोणतंही टोकाचं पाऊल उचलू शकतात. बायपोलर डिप्रेशनमध्ये आत्महत्येची शक्यता सर्वाधिक असते. अशी व्यक्ती आत्महत्येबाबत बोलत असल्यास तो एक धोक्याचा इशारा समजावा. अशा व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याची गरज असते."

बायपोलर डिसॉर्डरवर उपचार शक्य

बायपोलर डिसॉर्डरचे रुग्ण आत्महत्येचा विचार येत असल्यामुळे उपचारासाठी येतात, ते त्या गोष्टीबाबत सजग असतात, असं डॉ. शिवलकर यांना वाटतं.

त्या सांगतात, "बायपोलर आयुष्यभर राहणारा आजार आहे. थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आजार हे सगळे 'नॉन कम्युनिकेबल डिसीज' आहेत. या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. यांच्यासोबत आपण सामान्य जीवन जगू शकतो, पण हे आजार पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकत नाहीत.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सिंघल यांच्या मते, "मानसिक आजार आनुवंशिकसुद्धा असू शकतात. तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा मानसिक आजार असल्यास भविष्यात मुलांमध्येही याची लक्षणं दिसण्याची शक्यता असते."

मानसिक आजारांमध्ये बायपोलर डिसॉर्डर हा एक आजार आहे. हा आजार नियंत्रणात येऊन रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. भविष्यात पुन्हा या आजाराने डोकं वर काढल्यास तत्काळ डॉक्टरांचे उपचार सुरू करावेत."

या आजारावरील उपचारासाठी मूड स्टेबिलायझर किंवा मेंदूतील ग्रंथींमध्ये (मेंब्रेन) स्टेबलायझरचा वापर केला जातो. याच्या मदतीने मेंदूतील डोपामाईनचं प्रमाण संतुलित राखलं जातं. आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असं डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांच्या मते, बायपोलर डिसऑर्डरच्या रुग्णांना एखाद्या रचनात्मक (क्रिएटिव्ह) कामात सहभागी करून घेतल्यास त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतं.

अशा रुग्णांना जास्त देखभाल आणि प्रेमाची वागणूक देण्याची आवश्यकता असते. मेनियामध्ये अनेकवेळा लोक चुकीचे निर्णय घेतात. पण नंतर त्यांना या निर्णयाचा पश्चाताप होतो.

अशा स्थितीत त्यांना शांततेत आणि प्रेमाने समजावून सांगण्याची गरज असते. त्यांचं डोकं शांत राहिल, त्यांच्या मेंदूला जास्त ताण देऊ नये, याची आपण काळजी घ्यावी लागते. अशा रुग्णांनी लोकांमध्ये मिळून मिसळून राहावं, यासाठी प्रोत्साहित करायला हवं.

सूचना : औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)