You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मानसिक आरोग्य: रोबो तुमचं नैराश्य दूर करू शकतो का?
- Author, शुभम किशोर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"हॅलो, तुम्ही कसे आहात?"
"खूप त्रासलोय."
"दिवस खराब गेला वाटतं आज. मी मदत करू शकतो. सांग, काय झालं?"
"काही नाही, ऑफिसचं टेन्शन"
"खूप बिझी होतास का? असं झालं तरी काय?"
वरील चॅट वाचून हा दोन व्यक्तींमधला संवाद आहे, असं वाटेल. मात्र, हा संवाद एक व्यक्ती (माझ्यात) आणि एका कृत्रिम प्रज्ञेच्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) चॅटबॉट यांच्यात झालेल्या संवादातला एक छोटासा भाग आहे.
चॅटबॉटची मदत
मानसिक आरोग्याशी संबंधित मोबाईल अॅपवरील हे चॅटबॉट्स मानसिक तणावातून जाणाऱ्यांशी बोलण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
चिंता (Anxiety) आणि नैराश्य (Depressioon) या मानसिक समस्यांचा सामना करत असलेल्या व्यक्तींचा त्रास कमी करण्यात हे बॉट्स मदत करू शकतात, असा कंपनीचा दावा आहे.
मानसिक आरोग्याशीसंबंधित समस्या असणाऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक कंपन्या अशा अॅपवर काम करत आहेत, जे तणावाच्या वेळी तुमच्याशी बोलू शकतील.
संवाद साधताना चॅटबॉटला कुठल्याही प्रकारच्या मानवी मदतीची गरज पडत नाही. चॅटबॉटने हुबेहूब एखाद्या व्यक्तीप्रमाणे गप्पा माराव्या, असा प्रयत्न असतो.
मेंटल हेल्थ चॅटबॉट समजून घेण्याआधी तो काम कसा करतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे तरी काय?
'चॅटबॉट' या शब्दाचा अर्थ आहे चॅट करणारा बॉट. सोप्या शब्दात सांगायचं तर असा रोबो जो तुमच्याशी बोलू शकतो.
मात्र, आपल्या मनात रोबोची जशी संकल्पना असते तसा हा नाही. हा रोबो दिसत नाही किंवा आपण त्याला हातही लावू शकत नाही.
हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे. मोबाईल अॅपवर तो उपलब्ध होतो.
तुम्ही काय बोलता त्याचा योग्य अर्थ लावून संवाद साधू शकेल, अशा पद्धतीने हा प्रोग्राम केलेला असतो.
कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने तो स्वतःच शिकतो आणि स्वतःमध्ये हव्या त्या सुधारणा करत असतो.
कस्टमर केअर
फूड अॅप किंवा कस्टमर केअरशी संबंधित वेबसाईट्सवर असेच बॉट्स वापरले जातात.
सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बॉट्सच देत असतात. 'इंग्लिश में जानकारी के लिए एक दबाए, हिंदी में जानकारी के लिए दो दबाए…' किंवा 'हमारे ग्राहक सेवा प्रतिनिधी से बात करने के लिए एक दबाए, ऑर्डर की अपडेट जानने के लिए दो दबाए…' यासारख्या ज्या सूचना दिल्या जातात त्या बॉट्स देतात.
बॉट्समुळे कंपन्यांचं काम सुलभ आणि वेगवान झालं आहे.
मात्र, क्लिष्ट किंवा नवीन प्रश्नांची उत्तरं बॉट्सना देता येत नाही. अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ते ट्रेन्ड नसतात.
त्यामुळे मग गुंतागुंतीच्या किंवा तपशीलवार माहितीसाठी किंवा कुठल्याही नवीन प्रश्नासाठी आपल्याला कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला कनेक्ट करून देण्यात येतं.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यावेळी ट्रॅव्हल वेबसाईट्सवर लोक प्रवासासंबंधी अनेक असे प्रश्न विचारत होते ज्यांची उत्तरं बॉट्सकडे नव्हती.
त्यामुळे मग कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हकडे कॉल जायचा. मात्र, त्यांची संख्याही अपुरी होती. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला होता. अनेकांना त्यांच्या तिकिटांचे रिफंड मिळण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागली.
चॅटबॉटकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं नसतील तर मानसिक समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींशी चॅटबॉटने संवाद साधणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रात चॅटबॉट्सचा वापर
मानसिक आरोग्य क्षेत्रात चॅटबॉट्सचा वापर सध्या प्रारंभिक अवस्थेत आहे. हे चॅटबॉट्स डिझाईन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की असे चॅटबॉट्स या क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतात.
बॉट्स लोकांना त्यांचं म्हणणं सहजपणे मांडण्यात मदत करतात, असा दावा केला जातो.
मानसिक तक्रारींचा सामना करणाऱ्या बऱ्याच जणांची अडचण अशी असते की ते आपल्याला काय त्रास होतोय, हे कुणालाही सहज सांगू शकत नाहीत. समोरची व्यक्ती आपल्याविषयी काहीतरी भलतंच मत बनवेल, अशी भीती त्यांना वाटते.
मात्र, यंत्राबाबत ही अडचण येत नाही. तुम्ही त्यांच्याशी काहीही बोलू शकता. यंत्र तुमच्याविषयी मत तयार करत नाहीत.
हे बॉट्स अशाप्रकारे डिझाईन केलेले असतात की त्यांच्याशी बोलताना एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलल्यासारखं वाटतं. असं वाटतं ती व्यक्ती तुमचं म्हणणं नीट ऐकून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत आहे.
वायसा नावाच्या एका कंपनीनेही एक चॅटबॉट तयार केला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून जगभरातल्या 17 लाख लोकांना मदत केल्याचा कंपनीचा दावा आहे.
वायसाच्या सहसंस्थापक जो अग्रवाल म्हणतात, "लोकं चॅटबॉट्सशी मोकळेपणाने बोलतात. कारण लोकांच्या मनात कायम ही भीती असते की एखाद्या व्यक्तीला आपण आपल्याला होणारा त्रास सांगितला तर ती काय विचार करेल. त्यांना वाटेल की एवढी छोटीशी बाब तुला हँडल करता येत नाही. प्रत्येकालाच अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, तुलाच का नाही करता येत. मात्र, चॅटबॉट्सबाबत अशी अडचण येत नाही. चॅटबॉट्ससमोर सगळे सर्वच मनमोकळेपणाने बोलतात."
त्या पुढे म्हणतात, "रुग्णाला एवढं कम्फर्टेबल करायला स्पेशलिस्टनासुद्धा 2 ते 3 सेशन्स लागतात. खरं सांगायचं तर चॅटबॉटशी बोलताना आपली डायरी लिहीत असल्यासारखंच वाटतं. फरक एवढाच की ती डायरी तुमच्याशी बोलते. तुम्हाला सल्ले देते. अशावेळी तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःशीच बोलत आहात. त्यामुळे इतर लोक काय म्हणतील, ही भीती उरतच नाही."
माणसांना समजत नाही, यंत्राला कसं समजणार?
दिल्लीत राहणारे संदीप अरोरा यांनीही नैराश्य अनुभवलं आहे. मानसिक आरोग्यसाठी चॅटबॉट्सची संकल्पना त्यांना फारशी रुचली नाही.
त्यांच्या मते मानसिक आजारांशी संबंधित समस्या बरेचदा सामान्य माणसांनाही कळत नाहीत. प्रत्येकाचा मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करतो. या समस्येला सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने समजून घेण्याची गरज असते आणि हे काम केवळ एक थेरपिस्ट किंवा डॉक्टरच करू शकतात.
बीबीसीशी बोलताना संदीप अरोरा म्हणतात, "माझ्या डोक्यात हा विचार कायम असेल की मी एका यंत्राशी बोलतोय, व्यक्तीशी नाही. इमरजेंसी असेल उदाहरणार्थ माझ्या मनात असे काही विचार सुरू आहेत की मी त्यातून बाहेरच पडू शकत नाहीय आणि मी आता माझी नस कापणार आहे, अशावेळी मी चॅटबॉटमध्ये काय लिहिणार. याऐवजी एखाद्या व्यक्तीशी बोलताना ती तुमच्या मनातली अस्वस्थता बाहेर काढेल. तुमच्याशी भांडून, नाराज होऊन, प्रेमाने समजावून, इकडल्या-तिकडल्या गप्पा मारून तुमच्या मनातलं काढून घेईल. पण, चॅटबॉटमध्ये मी हे कधीही लिहिणार नाही की मला जीव द्यावासा वाटतोय."
दिल्लीत राहणाऱ्या रश्मी यांनीही एका बॉटशी गप्पा मारल्या आहेत.
त्या म्हणतात, "सुरुवातीला मला सगळं चांगलं वाटलं. पण, काही वेळाने असं वाटलं की मला काय म्हणायचं आहे, ते त्याला कळत नाहीय. त्याला कळत नव्हतं तेव्हा तो तेच-तेच प्रश्न विचारत होता."
"थोडीफार अँक्झाईटी असणाऱ्यांसाठी हे ठिक आहे. पण, जे क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर बरेचदा फोन उचलणंही अवघड असतं. त्यामुळे अशी एखादी व्यक्ती फोन उचलून त्यातलं एखादं अॅप्लिकेशन उघडून चॅट करेल, हे कदाचित शक्य नाही."
कंपन्यांचंही म्हणणं आहे की चॅटबॉट्स डॉक्टर्सची जागा घेऊ शकत नाहीत.
आत्महत्या किंवा लैंगिक छळाची प्रकरणं
एक चॅटबॉट केवळ त्याच गोष्टी समजू शकतो ज्यासाठी त्याला ट्रेन करण्यात आलं आहे. मानसिक आजारांची अडचण अशी असते की त्यांचा कुठलाच ठरलेला पॅटर्न नसतो. प्रत्येकाचा मेंदू वेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होत असतो.
अनेकदा मनस्थिती अशी होते की आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात आणि लोक आत्महत्या करतातसुद्धा. अशा परिस्थितीत चॅटबॉटचा उपयोग होत नाही.
2018 साली बीबीसीचे पत्रकार जॉफ व्हाईट यांना असं लक्षात आलं की काही चॅटबॉट्सना लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या कळलीच नाही.
वायसा कंपनीचा चॅटबॉटही या चाचणीत फेल झाला. वायसाच्या जो अग्रवाल सांगतात, "त्यानंतर आम्ही अनेक बदल केले. अशा कुठल्याही प्रकरणात वायसा एक हेल्पलाईन देते."
आत्महत्येसारख्या विषयावरही अनेक चॅटबॉट्स हेल्पलाईन क्रमांक देतात. त्यावर फोन करून मदत मिळवता येते.
चॅटबॉट्स खरंच उपयोगी आहेत का?
बऱ्याच जाणकारांचं म्हणणं आहे की चॅटबॉटच्या संयमित वापराचे फायदे होतात.
कृत्रिम प्रज्ञेशी संबधित कंपनी इंटिग्रेशन विझार्ड्सचे सीईओ कुणाल किसलय म्हणतात, "गुंतागुंतीच्या आजारांसाठी हे डिझाईन केलेले नाहीत. मात्र, मानसिक तणावाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा चॅटबॉट्सवर बोलणं, अधिक सुलभ आहे."
"हे चॅटबॉट्स लोकांना इंगेज करतात. त्यांच्याशी सकारात्मक गप्पा मारतात."
दिल्लीत राहणाऱ्या सायकोलॉजिस्ट शिखा खांदपूर म्हणतात की चॅटबॉट लोकांच्या मनातला संकोच दूर करू शकतात आणि गरजेच्या वेळी ते उपलब्ध असतात.
त्या म्हणतात, "बरेचदा असं होतं की मानसिक समस्येचा सामना करणाऱ्या व्यक्तीला त्या वेळी कुणीच मिळत नाही ज्यावेळी त्याला त्याची सर्वात जास्त गरज असते. चॅटबॉट्स अशा व्यक्तींना त्यांचं म्हणणं त्याचवेळी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतं."
मानसोपचारतज्ज्ञ पूजाशिवम जेटली यांचं म्हणणं आहे की याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. त्या म्हणतात, "बरेचदा आमच्याकडे येणाऱ्यांना आपल्या समस्या सांगायला संकोच वाटतो. चॅटबॉट्स हा संकोच कमी करू शकतात. त्यामुळे या अॅपवर चॅट करून आपल्याला बरं वाटतंय, असं वाटू शकतं. मात्र, अनेकदा या छोट्याशा दिलाश्याकडे बघताना मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकतं."
तंत्रज्ञानात सतत बदल होत आहे. अनेक नव्या कंपन्या मेंटल हेल्थ चॅटबॉटवर नवनवीन प्रयोग करत आहेत. अशा परिस्थितीत मेंटल हेल्थ चॅटबॉट्स जिवंत व्यक्तीचा जागा घेऊ शकतील का?
याचं उत्तर देताना जेटली म्हणतात, "मानसिक आरोग्य किंवा उपचारांविषयी सांगायचं तर लोकांशी बोलणं आणि त्यांना आश्वासक स्पर्श याने फार फरक पडतो. चॅटबॉट सुरुवात असू शकते. असिस्टंट म्हणून उपयुक्त ठरू शकतात. मात्र, माणसाची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत."
चॅटबॉट चांगले की वाईट, यावर अनेक संशोधनं सुरू आहेत. लोकांची यावर वेगवेगळी मतं आहेत. मात्र, तुम्ही एखादं चॅटबॉट किंवा आरोग्याशी संबंधित आर्टिफिशिअल इंटेलिजंस मेडिकल अॅप वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे बॉट्स कुठल्याही मेडिकल संस्थेने प्रमाणित केलेले नसतात. त्यामुळे हे चॅटबॉट जी माहिती देतात ती प्रत्येकवेळी शास्त्रीयदृष्ट्या योग्यच असेल, याची खात्री नसते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)