You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स रोबो बनवणाऱ्या कंपन्यांचा दावा, 'गर्लफ्रेंड नाही तर घाबरू नका आम्ही तुमच्यासाठी ती निर्माण करू'
- Author, पल्लब घोष
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांच्या आवडीप्रमाणे सेक्स रोबो तयार करून देण्याचं आश्वासन काही कंपन्या देत आहेत. हे रोबो तुमच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन तुमच्याशी संबंध ठेवतील असा दावा या कंपन्यांकडून केला जातो. त्यांच्या जाहिरातांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या कमी नाहीये.
या रोबोंमुळे ज्या लोकांना गर्लफ्रेंड किंवा पार्टनर नाही त्यांचा एकटेपणा दूर होऊ शकतो असं म्हटलं जातं पण या अशा रोबोंमुळे नुकसान देखील होऊ शकतं अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेसहित (Artificial intelligence) उपलब्ध असलेल्या सेक्स रोबोच्या वापरामुळे व्यक्ती आणि समाजाला मानसिक तसंच नैतिक धोका वाढत चालल्याचं अमेरिकेतील संशोधकांनी म्हटलं आहे.
याप्रकारच्या तंत्रज्ञानाचा निरीक्षणापासून बचाव होत आहे, कारण चौकशी संस्थांना यापद्धतीचा तपास करण्याची लाज वाटते, असं संशोधक म्हणतात.
यापद्धतीच्या रोबोच्या अनियंत्रित वापरावर निर्बंध आणावेत, असं शास्त्रज्ञांना वाटतं. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या डॉ. क्रिस्टीन हेंड्रेन यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की "यामुळे होणारं नुकसान खूप अधिक आहे" काही रोबोट्सचं प्रोग्रामिंग तर निषेध करणं, बलात्काराचा सीन निर्माण करणं या पद्धतीनं केलेलं असतं."
तर काही रोबो लहान मुलांसारखे दिसतात. यापद्धतीचा रोबो विकसित करणाऱ्या एका जपानमधील व्यक्तीनं कबुलीजबाब दिलाय की, "माझ्या मनात लहान मुलांविषयी येणाऱ्या इच्छांवर निर्बंध आणण्याचं काम हा रोबो करतोय."
अशा प्रवृत्तींना चालना देणारे रोबो समाजात असणं हे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक करू शकतं असं शास्त्रज्ञांना वाटतं. अशा रोबोंना मान्यता देणं म्हणजे अशा कृत्यांना अप्रत्यक्षरीत्या चालना दिल्या सारखं ठरू शकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक बैठकीत डॉ. हेंड्रेन बोलत होते, "अनेक सेक्स रोबोची जाहिरात ऑनलाईन केली जाते. अमेरिकेतील रियलरोबोटिक्स या कंपनीनं आपल्या हार्मनी रोबोटची जाहिरात करणार व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी या रोबोटची किंमत सहा ते साडे सात लाख रुपये असल्याचं सांगितलं आहे."
ही एक मनुष्याच्या आकाराची बाहुली आहे. जी डोळे मिचकावू शकते, तसंच ओठांची हालचाल करून बोलूही शकते.
स्कॉटिश भाषेत ती म्हणते, "जर तुम्ही योग्य ती पावले उचलली तर परमोच्च आनंदाची अनुभूती तुम्हाला होईल."
या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट मॅकमुलेन स्पष्ट करतात, "या बाहुलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, जी तिला तिच्या मालकाशी संबंध विकसित करण्यासाठी मदत करते. ती तुमच्याबदद्लची माहिती, तुमच्या आवडीनिवडी आणि अनुभव या गोष्टी लक्षात ठेवते."
कॅथलीन रिचर्डसन या डी मॉन्टफोर्ट विद्यापीठात एथिक्स अँड कल्चर ऑफ रोबोट्स हा विषय शिकवतात. त्यांच्या मते या पद्धतीच्या जाहिरातींवर बंदी आणायला हवी.
त्या म्हणतात, "तुम्हाला मित्र नाही, तुम्हाला लाईफ पार्टनर नाही, काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी रोबोट गर्लफ्रेंड निर्माण करू, असं या कंपन्या सांगत आहेत. "
"गर्लफ्रेंडसोबत असलेले संबंध जिव्हाळा, आकर्षण आणि परस्पर संबंधांवर आधारित असतात. या गोष्टी अशा मशीनद्वारे मिळवता येत नाही, " त्या पुढे सांगतात.
यापद्धतीच्या उपकरणांच्या उदयावर नियंत्रण आणण्यासाठी दबाव गट तयार करणं गरजेचं असल्याचं रिचर्डसन सांगतात.
रोबोट मानवी संबंधांना पर्याय बनू शकतात, अशा प्रकारचा दावा खोडून काढण्यासाठी लैंगिक तज्ज्ञांची एक टीम कार्यरत आहे.
आपली वाटचाल अशा भविष्याकडे होत आहे का, जिथं एक लैंगिक वस्तू म्हणूनच महिलेकडे पाहिलं जाईल, असाही प्रश्नही त्या उपस्थित करतात.
"एखाद्या व्यक्तीला त्यांच्या नातेसंबंधांमध्ये अडचण जाणवली, तर तो ती इतरांना बोलून दाखवू शकतो. पण, मग तुमच्या आयुष्यात एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्ही रोबोटला सोबत बाळगू शकता, या कल्पनेचं सार्वत्रीकरण करणं योग्य नाही," असंही त्या पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)