सेक्सबाबत लोकांची विचारसरणी बदलत आहे का?

    • Author, ब्रेंडन एंब्रोसीनो
    • Role, बीबीसी फ्युचर

भारतात सेक्स हा असा विषय आहे ज्यामध्ये सगळ्यांना स्वारस्य आहे मात्र त्यावर बोलायचं झालं की लोक संकोचतात.

पुरुष मंडळी सेक्सविषयी आपलं म्हणणं मांडतात पण महिला याविषयावर खुलेपणाने बोलू इच्छित असतील तरी त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं.

सेक्सविषयी बोलणं याबाबत महिलांवर असलेले सामाजिक प्रतिबंध आणि लाज वाटणं यामुळे त्या मौन बाळगून असतात. प्राचीन भारतीय समाज शारीरिक संबंधांसंदर्भात खूपच खुल्या विचारांचा होता.

याचे दाखले आपल्याला खजुराहोच्या मंदिरापासून वात्सायन यांच्या प्रसिद्ध कामसूत्र पर्यंत पाहायला मिळतात. परंतु जसजसा समाज पुढे वाटचाल करत गेला तसतसा आपला देश शारीरिक संबंधांप्रति संकुचित विचारसरणीचा झाला.

पुरुष आणि स्त्री यांच्यातील शरीरसंबंधांतील गोष्टी बंदिस्त, पडद्याआड आणि दबक्या आवाजात बोलल्या जाऊ लागल्या. परंतु आता सेक्सबाबत मोठा बदल घडून येताना दिसत आहे. हा बदल क्रांतिकारी आहे.

प्रयोगशाळेत मुलं जन्माला घालण्याचा ट्रेंड वाढू लागेल

नैसर्गिकदृष्ट्या सेक्सचा अर्थ मूल जन्माला घालणं आणि कुटुंब वाढवणं इथपर्यंतच मर्यादित होता. मात्र आधुनिक विज्ञानाच्या साथीने सेक्सविनाही मूल जन्माला घालता येऊ लागलं आहे. आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब प्रणालीद्वारे हे आता अगदीच शक्य झालं आहे.

जगातली पहिली टेस्ट ट्यूब मुलगी 1978 मध्ये जन्माला आली होती. त्यानंतर आतापर्यंत 80 लाख मुलं अशा पद्धतीने जन्माला आली आहेत. संशोधकांच्या मते, येत्या काळात अशा पद्धतीने मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण वाढू शकतं. लेखक हेन्री टी ग्रीली यांच्या मते 20 ते 40 वयोगटातील निरोगी जोडपी मूल प्रयोगशाळेत जन्माला घालणं पसंत करतील. ते सेक्स मुलं जन्माला घालण्याच्या उद्देशासाठी नव्हे तर शारीरिक आनंदासाठी करतील.

सेक्सविना मुलं जन्माला येत असतील तर मग सेक्सची आवश्यकता काय? सेक्सचं काम पुरुष आणि स्त्रीच्या शारीरिक गरजा पूर्ण करणं. शारीरिक संबंधांतून त्यांचं एकमेकांबरोबरचं नातं दृढ होत जातं. परंतु यात धर्माचा मोठा अडथळा आहे.

प्रत्येक धर्मात शारीरिक संबंधांसंदर्भात अनेक प्रतिबंध, बंदी, नियमावली आहेत. ख्रिश्चन धर्मात असं सांगण्यात आलं आहे की पुरुष-स्त्री यांनी मूल जन्माला घालण्यासाठी सेक्स करावा.

शारीरिक सुख आणि आनंदासाठी सेक्स केला गेला तर ते अनैतिक मानलं जाईल. ... धर्माच्या जुन्या धर्मग्रंथानुसार म्हणजेच सोलोमोन सॅन्ग उत्साहाने सेक्स करण्याला चांगलं म्हटलं गेलं आहे. शारीरिक संबंध केवळ पती पत्नी यांच्यातील नव्हे तर एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांमधील वैयक्तिक बाब असल्याचं म्हटलं गेलं आहे.

ग्रीसचा प्रसिद्ध विचारवंत अॅरिस्टॉटल म्हणतो, "प्रेम म्हणजे कामुक इच्छांवरचं उत्तर आहे. म्हणजे दोघांमध्ये प्रेम असेल तर त्याची परिणती शारीरिक संबंधात होते." त्यांच्या मते सेक्स ही किरकोळ गोष्ट नाही. प्रेम करण्यासाठी तसंच प्रेम मिळवण्यासाठी सेक्स ही अत्यंत आवश्यक आणि जरुरी प्रक्रिया आहे.

अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञ डेव्हिड हालपेरिन यांच्या मते सेक्स फक्त सेक्ससाठी केला जातो. त्यामध्ये कुठल्याही गरजांची पूर्तता वगैरे असं काहीच नसतं.

मनुष्यप्राण्याने सेक्स करायला सुरुवात केली तेव्हा त्याचं स्वरुप शारीरिक गरजेपुरतं मर्यादित असेल. मात्र जेव्हा कुटुंब होऊ लागली, वाढू लागली तेव्हा नाती बळकट करण्यासाठीचं माध्यम म्हणून पाहिलं जाऊ लागलं असावं.

आता समाज पूर्णत: बदलला आहे. आता पैसे देऊनही सेक्स केला जातो. अनेकजण व्यावसायिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी सेक्सचा एखाद्या आयुधाप्रमाणे वापर करतात. अशा परिस्थितीत सेक्स शारीरिक गरज पूर्ण करतो हे नक्कीच आहे मात्र नाती बळकट होणं किंवा एकमेकांविषयीचं प्रेम अधिक गहिरं होणं अशा कोणत्याही गोष्टी नाहीत.

अशावेळी सेक्सचा नेमका अर्थ काय? सेक्स केवळ सेक्ससाठी केला जावा असाच त्याचा अर्थ घ्यावा. अन्य तपशीलात जाऊच नये.

सेक्स आहे तरी काय?

बदलत्या काळानुसार मानवी संबंध बदलत चालले आहेत. शारीरिक संबंधांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि विचारही बदलू लागला आहे.

2015 मध्ये अमेरिकेत सँडियागो विद्यापीठातील प्राध्यापक जीन एम टींग यांनी एका अभ्यासाद्वारे म्हटलं होतं की 1970 ते 2010 पर्यंत अमेरिकेत बहुसंख्य लोकांनी लग्न न करता शारीरिक संबंध ठेवायची गोष्ट मान्य करायला सुरुवात केली होती.

नव्या पिढीच्या मते शारीरिक संबंध, लैंगिक जीवन समाजाच्या नीतीनियमांमध्ये बांधण्यात येऊ नये. टींग यांच्या मते, सेक्शुअल नैतिकता काळसापेक्ष गोष्ट नाही. त्यात बदल होत गेले आहेत, होत आहेत आणि नंतरही होत राहतील. आता हे बदल इतक्या वेगाने होऊ लागलेत की आपण हे बदल स्वीकारण्यासाठी अजून तयार नाही.

शरीरसंबंध केवळ स्त्री आणि पुरुष यांच्यादरम्यानच असतात असं नाही. लेस्बियन आणि गे नातेसंबंधांना अनेक देशांनी मान्यता दिली आहे. असे संबंध म्हणजे मानसिक किंवा शारीरिक विकृती नाही. मात्र धार्मिक आणि सामाजिक मान्यतांनुसार या संबंधांना अनैतिकच मानलं जातं.

धर्माच्या मते, समलिंगी प्राणीही एकमेकांमध्ये शरीरसंबंध ठेवत नाहीत. कारण हे अनैतिक म्हणजेच अनैसर्गिक आहे हे त्यांना ठाऊक असतं. विज्ञानानुसार जपानी मकाक, फ्लोर फ्लाइज, अल्बाट्रॉस पक्षी आणि बोटल नोज डॉल्फिनसह प्राणीपक्ष्यांच्या 500 प्रजातींमध्ये समलिंगी संबंध असतात. मात्र आपण त्याला लेस्बियन, गे, हेट्रोसेक्शुअल असं नाव देत नाही.

हे वर्गीकरण केलं तरी कोणी? सेक्स म्हणजे मूल जन्माला घालण्याची गोष्ट त्या लोकांनी कदाचित ही प्रतवारी केली असावी. सेक्स कशासाठी यामागचं प्रश्नचिन्ह काढून टाकलं तर लोक त्याचा अर्थ खुलेपणाने समजून घेऊ शकतील. सेक्स ही शारीरिक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

शरीरसंबंधाबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला तसं लोकांनी गे आणि लेस्बियन नातेसंबंधांना स्वीकारायला सुरुवात केली आहे.

141 देशांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, 1981 ते 2014 पर्यंत एलजीबीटी समाजाला मान्यता देण्याचं प्रमाण 57 टक्क्यांनी वाढलं आहे. प्रसारमाध्यमं, वैद्यकीय पाठिंबा तसंच मानसशास्त्रीय आधार यांची भूमिका तितकीच मोलाची आहे.

याव्यतिरिक्त पॉर्न पाहण्याचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढलं आहे ते बघता सेक्सची भूक किती आहे याचा अंदाज येतो. पॉर्न बघून काही हाती लागो अथवा न लागो, सेक्सची इच्छा बऱ्याच अंशी शमते.

सेक्सचं स्वरुप पालटणार

जाणकारांच्या मते भविष्यात सेक्स आणखी डिजिटल आणि सिंथेटिक होणार आहे. भविष्यात सेक्सचे नवनवीन प्रकारही समोर येतील.

नैसर्गिक पद्धतीने मूल जन्माला घालण्यात अडचण असलेली जोडपी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब या प्रणालींच्या माध्यमातून मूल जन्माला घालत आहेत. कदाचित भविष्यात सगळी जोडपी या पद्धतीचा उपयोग करू लागतील.

मूल जन्माला घालण्यासाठी पुरुष आणि स्त्रीच्या अंड्यांचं मिलन होणं आवश्यक असतं. परंतु गे आणि लेस्बियन नातांच्या संदर्भात हे शक्य नाही. अशावेळी या नात्यातील लोक मूल जन्माला घालण्याच्या इच्छेसाठी आयव्हीएफ तसंच टेस्ट ट्यूब प्रणालीचा अवलंब करत आहेत. बॉलीवूडमध्ये याची अनेक उदाहरणं आहेत.

कमिटमेंट आणि लग्नाबाबतही आता नवनवीन संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत. आधुनिक शास्त्रामुळे आजारांवर नियंत्रण मिळवून माणसाचं आयुर्मानही वाढलं आहे.

1960 ते 2017 या कालावधीत माणसाचं आयुर्मान 20 वर्षांनी वाढलं आहे. 2040 पर्यंत यामध्ये आणखी चार वर्षांची भर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील जैववैज्ञानिक आणि भविष्यकर्ते स्टीवेन ऑस्टाड यांच्या मते, भविष्यात माणूस दीडशे वर्षही जगू शकतो. इतक्या प्रदीर्घ आयुष्यात एकच सेक्स पार्टनरसह राहणं अवघड होऊ शकतं. अशावेळी त्या काळातली माणसं आयुष्यातील ठराविक टप्प्यांवर सेक्सचे साथीदार बदलू शकतात. याची सुरुवात होऊ लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये याची उदाहरणं दिसू लागली आहेत. घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे.

2013मधील सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील दर दहा जोडप्यांपैकी चार जोडप्यांचं दुसरं, तिसरं लग्न झालेलं असू शकतं. येणाऱ्या काळात कमिटमेंट आणि लग्नजीवनासंबंधी नव्या संकल्पना समोर येऊ शकतात.

निसर्ग आपल्यानुसार माणसाला बदलतो. आता आपल्याला विचारांमध्ये बदल करावा लागेल.

सेक्स आणि सेक्शुअल आवडीनिवडी आता आपल्याला विचार बदलण्याची आवश्यकता आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातले लोक सेक्सकडे आनंद आणि मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहू लागतील. सेक्स म्हणजे मूल जन्माला घालण्यासाठीची प्रक्रिया हा विचार बाजूला पडेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)