You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC निकाल 2019 : देशात 44 वा क्रमांक मिळवलेल्या आशुतोष कुलकर्णीने कसा केला अभ्यास?
केंद्रीय लोकसेवा आयोग 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, प्रदीप सिंहने अव्वल स्थान पटकावले आहे.
लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर 829 जणांची आयोगाने निवड केली आहे.
युपीएएसीने जाहीर केलेली संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
यापैकी जनरल कॅटेगरीसाठी 304, EWS करता 78, ओबीसी 251, एससी-129 तर एसटी-67 जागांसाठी निवड करण्यात आली आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची खालीलपैकी एका सेवेसाठी निवड करण्यात येईल.
- भारतीय प्रशासकीय सेवा IAS (180)
- भारतीय विदेश सेवा IFS (24)
- भारतीय पोलीस सेवा IPS (150)
- सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ग्रु ए (438)
- सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप बी (135)
प्रदीप सिंगने अव्वल स्थान पटकावलं आहे. जतीन किशोरने दुसरं तर प्रतिभा वर्माने तिसरं स्थान पटकावलं आहे.
दरवर्षीपेक्षा यावेळी निकाल उशिरा लागला आहे. कोरोनामुळे निकालाला उशीर झाला.
महाराष्ट्रातील नेहा भोसले या विद्यार्थिनीने देशात 15 वा क्रमांक पटकावला आहे तर आशुतोष कुलकर्णीने देशात 44 वा क्रमांक पटकावला आहे. बीबीसी मराठीने त्याच्याशी बातचीत केली.
देशात 44 व्या क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या आशुतोषने असा केला अभ्यास
पुण्याच्या आशुतोष कुलकर्णीने यावर्षीच्या परीक्षेत 44 वा क्रमांक मिळवला आहे. 2015 पासून त्याने या परीक्षांची तयारी सुरू केली होती. हा त्याचा चौथा प्रयत्न होता. याआधी त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली होती यावर्षी त्याला यश मिळालं. बीबीसी मराठीने आशुतोषशी संवाद साधला.
तो म्हणाला, "मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून शिक्षण झाल्यावर मी लगेच तयारी सुरू केली. काही वर्षा पुण्यात आणि मग शेवटच्या काळात दिल्लीत होतो. नोकरी आणि शिक्षण सांभाळून मी गेल्या वर्षी परीक्षा दिली होती. ही संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित असल्याने मी नोकरी करून अभ्यास केला."
अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलताना आशुतोष म्हणाला, "माझा ऑप्श्नल इतिहास होता. मर्यादित पुस्तकं वाचणं हा त्यातला पहिला भाग आहे. उगाच सगळंच वाचायला जाऊ नये. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. मी सगळ्या नोट्स कंम्प्युटरवर काढल्या. त्या वेळोवेळी अपडेट केल्या. त्यामुळे वेळेवर गोंधळ झाला नाही. पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचावी लागली नाही.
"त्यामुळे वेळ वाचला आणि अभ्यासावर पकड निर्माण झाली. पूर्व परीक्षा आता दिवसेंदिवस अतर्क्य होत आहे. इतिहास, आर्ट- कल्चर, पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान हे विषयांचा नीट अंदाज बांधता येत नाही. त्यापेक्षा पॉलिटी, अर्थशास्त्र, आणि भूगोल यांचा बऱ्यापैकी अंदाज येतो त्यावर जास्त भर द्यावा असं मला वाटतं. मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त उत्तर लिहिण्याचा आणि योग्य व्यक्तीकडून तपासून घेण्याचा सराव करावा."
आशुतोष ने पहिल्या दोन प्रयत्नात थेट मुलाखतीपर्यंत झेप मारली, तिसऱ्या प्रयत्नात तो पूर्व परीक्षेतच अपयशी ठरला आणि चौथ्या प्रयत्नात 44 वा क्रमांक मिळवला. या काळात अपयश कसं पचवलं या प्रश्नाच्या उत्तरादाखल तो म्हणाला, "एकदा मुलाखतीपर्यंत पोहोचलं की खरं सांगायचं तर घास हातातोंडाशी आलेला असतो. त्यामुळे तो सोडवत नाही. खरी जिद्द तिथूनच येते. इथपर्यंत जर पोहोचतोय म्हणजे ही परीक्षा पास होणं अवघड नाही. यशाची शक्यता बळावते. त्यामुळे प्रयत्न करायला हरकत नाही"
यावर्षी युपीएससीच्या मुलाखतींवर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे अनेकांच्या मुलाखती लांबल्या. आशुतोषची मुलाखतही गेल्या महिन्यात 22 तारखेला झाली. विमानप्रवासाची व्यवस्था आयोगातर्फे करण्यात आली होती. मुलाखत झाल्यानंतरच यावर्षी चांगलं काहीतरी हाती लागणार याची कुणकूण आशुतोषला लागली होती.
नियोजनबद्ध अभ्यासाबरोबरच फक्त दोन प्रयत्न पूर्णवेळ द्या. नंतर परीक्षा पार्ट टाईम द्या असं तो सांगायला विसरत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)