UPSC : अर्ज भरताना हे 6 मुद्दे लक्षात ठेवा

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) तर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. 3 टप्प्यांत होणारी ही परीक्षा देशातील सर्वांत कठीण म्हणून ओळखली जाते. अर्थात भरण्यापासून प्रत्येक टप्प्यावर ही काळजी घेणं अत्यंत अवाश्यक आहे.

कसा कराल अर्ज?

सगळ्यात आधी या संकेतस्थळावरून परीक्षेची जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित वाचा. पहिल्यांदाच बसणार असाल तर परीक्षेचं स्वरूप, वयोमर्यादा, अभ्यासक्रम या सगळ्यांवर एकदा नीट नजर टाका. वैकल्पिक विषय अजूनही ठरला नसेल तर वैकल्पिक विषयाची यादी बघून अभ्यासक्रमाचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घ्यावा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संपूर्ण प्रकिया ऑनलाईन झाली आहे त्यामुळे परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकच मेल आयडी आणि मोबाईल नंबर ठेवा. कारण सगळे महत्त्वाचे मेसेज तिथेच येतील.

पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून ठेवा. सही जशी नेहमी करता तशीच करा. UPSC ला हवा त्या आकारात फोटो काढून ठेवा म्हणजे अपलोड करायला अडचण होणार नाही आणि वेळेवर धावपळ होणार नाही.

हल्ली अनेक विद्यार्थी घरापासून दूर राहून परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे घरचा पत्ता देताना खूप काळजी घ्यावी.

परीक्षेचं माध्यम हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहात हे आधीच ठरवा आणि त्यावर ठाम रहा. कारण एकदा परीक्षेत माध्यम टाकलं की बदलता येणार नाही.

सरतेशेवटी केंद्राची निवड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास झाला आहे, पण केंद्राचा पर्याय चुकीचा टाकला असेल तर वेळेवर प्रचंड गोंधळ होतो.

आधी महाराष्ट्रात मर्यादित केंद्रावर ही परीक्षा व्हायची. आता महाराष्ट्राच्या मुख्य शहरांत ही परीक्षा घेतली जाते त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ही काळजी घ्या

1. रजिस्ट्रेशन नंबर नीट जपून ठेवा.

2. स्वत:चा अर्ज दुसऱ्या कोणालाही भरायला सांगू नका.

3. जात पडताळणी प्रमाणपत्र या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका. नाहीतर नंतर अडचणी वाढतील.

4. एकाच नावाने दुसऱ्यांदा अर्ज करू नका.

5. अमूक तमूक केंद्रातून परीक्षा दिली तरच पास होतो वगैरे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

6. अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)