पाहा व्हीडिओ : 'MPSC करणारा विद्यार्थी अधिकारी झाला नाही तरी कणखर होतोच'

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी MPSC मधून मानसिकदृष्ट्या एवढा कणखर झालो की, MPSC देणारा जीवनात काहीच करणार नाही, असं होणार नाही," हे शब्द आहेत पुण्यातल्या MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या समाधान किरवले यांचे.

सदाशिव पेठेतल्या पुना हॉस्पिटलजवळ एका अतिशय जीर्ण झालेल्या एक मजली इमारतीत समाधान राहतात. या इमारतीत साधारण 5-6 खोल्या आहेत. प्रत्येक खोली 10 बाय 10 ची. या प्रत्येक खोलीमध्ये फक्त MPSC करणारे विद्यार्थी राहतात. हे सर्व जण मराठवाड्यातल्या खेड्यांतून डोळ्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन आले आहेत.

समाधान एक साधा सरळ, पण महत्त्वाकांक्षी तरुण. त्यांच्याबरोबर बोलत असताना त्यांची सुरू असलेली धडपड आणि यशापयशाच्या खेळातून स्वतःला सावरत ध्येय गाठण्याची त्यांची जिद्द दिसून येते.

समाधान यांनी 12 वी पर्यंतचं शिक्षण बीडमध्येच केलं. तेव्हा त्यांचं शिक्षणात खूप लक्ष नव्हतं. मग ते MPSC कडे कसे वळलो?

"मी नववीमध्ये होतो तेव्हा माझा मोठा भाऊ MPSC ची परीक्षा देऊन तहसीलदार झाला. तेव्हापर्यंत तहसीलदार काय असतं मला माहिती नव्हतं. मग हळूहळू ती क्रेझ बघून, दादाला मिळणारी प्रतिष्ठा बघून कुठेतरी असं वाटू लागलं की, आपणही या क्षेत्रात यायला पाहिजे."

सुरुवातीचे दिवस

मग MPSCची तयारी करायला समाधान यांनी पुणे गाठलं. मात्र पुण्यातले सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी थोडे कठीण होते.

"सुरुवातीला दीड महिना खोलीच मिळाली नाही. तेव्हा मग मी कात्रजला मामाच्या मुलाकडे राहायचो. तिथून ये-जा करायचो. क्लास झाला की मग एक-दोन तास रूम शोधण्यासाठी जायचे. खोल्या मिळायच्या मात्र ते दलाली मागायचे. माझ्याजवळ पैसा जास्त नसल्याने ते नको वाटायचं. मग एका मित्रानं मला ही खोली दाखवली. तेव्हा मी इथं आलो. आमच्या या हॉस्टेलमध्ये सात खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत MPSC करणारीच मुलं आहेत. ही सर्व मराठवाड्यातीलच आहेत. इथे प्रत्येक खोलीला 1800 रुपये भाडं आहे. माझ्या या 10 बाय 10 च्या खोलीत मी आणि अजून एक जण राहतो."

समाधान 2012 पासून पुण्यात राहत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. परिश्रम करून, अभ्यास करूनसुध्दा यशानं त्याला दोन-चार मार्कांनी हुलकावणी दिल्याचे ते सांगतात.

परंतु 2014 मध्ये त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि ते PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना कॉल लेटर आलं मात्र त्यांनी ही संधी सोडली.

"माझी 2014 ची प्रिलिमनरी टेस्ट दोन मार्कांनी हुकली. तेव्हा मी खूप निराश झालो. त्यानंतर मी 2014 मध्येच आलेल्या PSI (पोलीस उपनिरीक्षक) (वर्ग २) च्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केलं."

"PSI ची पूर्व, मुख्य आणि शारीरिक, अशा तिन्ही परीक्षा मी पास झालो. 20 मे 2015 ला माझी निवड झाली होती. मात्र तेव्हा माझ्या मनात विचार येऊ लागला की, आपण इथे UPSC करण्यासाठी आलो होतो. मात्र इंग्रजी येत नसल्यानं आपण MPSC वर लक्ष केंद्रीत करून वर्ग 1 च्या परीक्षांकडे वळलो. मग आता क्लास 2 ची नोकरी का करायची? आपल्यात क्षमता आहेत. माझे अगदी जवळचे मित्र क्लास 1 पोस्टसाठी सिलेक्ट झालेत. मग आपण का नाही होणार? PSI जर स्वीकारलं तर एक वर्ष संपूर्ण ट्रेनिंगसाठी जाईल. तिथं कसलाच अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे मी ती संधी सोडली."

अमर्याद खर्च आणि काळजीसुद्धा

समाधान यांना फक्त अभ्यासाचीच काळजी नाही. त्यांना खर्चावरही लक्ष द्यावं लागतं. आपल्या अनेक आवडी-निवडींना मुरड घालत ते परीक्षांची तयारी करत आहेत.

"कधी कधी रस्त्यानं जाताना एखादं टी-शर्ट आवडतं. पण आता जर ते घेतलं तर महिन्याचा हिशोब बिघडेल, असं म्हणत मी मनाला समजावतो. सकाळी नाश्त्याला साबुदाणा खिचडी, उपमा, शिरा, असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र मी दररोज पोहे खातो. कारण पोहे 10 रुपयांत मिळतात," असं समाधान सांगतात.

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या बाहेर राहण्या-खाण्याच्या खर्चात आणखी एक भर असते ती म्हणजे परीक्षा फॉर्मची फी. ही फी 300 ते 500 रुपयांपर्यंत असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे जवळपास 4 ते 5 हजार रुपये दरवर्षी खर्च होतात.

खर्चाचा तपशील देताना समाधान सांगतात, "MPSCच्या एका फॉर्मची मागील दोन वर्षांपासून किंमत आहे 523 रुपये. एका वर्षात साधारणतः 12 परीक्षा होतात. 500 रुपये जरी धरलं तर 4,000 ते 6,000 रुपये नुसते फॉर्म भरण्यासाठी जातात."

"तसंच दररोजचा खर्च पाहता साधारणतः 70-80 रुपये एका दिवसाला खर्च होतात. आणि भाडं वगैरे धरून सरासरी 8000 ते 9000 रुपये महिन्याला खर्च होतात. 2012 पासून जवळपास पाच-सहा लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात क्लासेसचा खर्च वेगळा. मी दोन-तीन क्लासेस केले. त्याचा खर्च धरून सात-साडेसात लाखांपर्यंत खर्च झाला असेल."

परीक्षा म्हटलं तर यश अपयश आलंच. मात्र MPSC देणारा मुलगा हा या तपश्चर्येतून एवढा कणखर होतो की, तो कसल्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो, असा समाधान यांचा विश्वास आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)