MPSC : एमपीएससी परीक्षेत व्यापम घोटाळा सुरू आहे का?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील बैठकव्यवस्था सदोष असून यामुळे मास कॉपीला उत्तेजन मिळत आहे," या विद्यार्थ्यांनी उठवलेल्या वावड्या आहेत असं आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हा सगळा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील 'व्यापमं' आहे असा आरोप केला होता तसंच परीक्षा रद्द करण्याचीही मागणी केली होती.

नेमका प्रकार काय आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेच्या एका आठवड्याआधी बैठक क्रमांकासह ओळखपत्र दिली जातात. त्यात बैठक क्रमांक उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे देण्यात येतात. त्यामुळे ओळखीचे उमेदवार एका मागोमाग एक नंबर यावा म्हणून मोबाईल क्रमांक बदलत आहेत. त्यामुळे मास कॉपीचा प्रकार वाढतोय असं विद्यार्थ्यांचा दावा आहे.

या कथित प्रकाराविषयी माहिती जाणून घेण्याविषयी आम्ही ही परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याशी संपर्क साधला. नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने सांगितलं, "गेल्या एक दोन वर्षांपासून अशा पद्धतीने बैठक व्यवस्था आयोगाने राबवायला सुरुवात केली होती. मात्र तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलं नव्हतं. पण एप्रिल 2018 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. या परीक्षेला साधारण दोन लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2300 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. त्यातील 14 उमेदवार असे होते ज्यांचे बैठक क्रमांक एकामागोमाग एक असे होते. त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर एक दोन परीक्षा झाल्या. तेव्हा मुलांना असं लक्षात आलं की एकामागोमाग एक असे मोबाईल नंबर असतील तर बैठक क्रमांक पण तसे येतात. हे प्रमाण वाढत गेलं. मग महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेत या पास झालेल्या जोड्यांचं प्रमाण 3000 झालं होतं. इतकंच काय तर एकाच खोलीतले सात सात मुलं पास झालीत. तेव्हा हा सगळा प्रकार प्रकर्षाने समोर आला. तेव्हा आयोगाने कबूल केलं की आम्ही मोबाईल क्रमांकानुसार बैठक क्रमांक देत आहोत. पण हे प्रकार घडू नये म्हणून आम्ही दक्षता घेत आहोत."

मोबाईल क्रमांक बदलणं हे सुद्धा अतिशय सोपं असतं. जेव्हा उमेदवार परीक्षेसाठी नोंदणी करतात तेव्हा त्यांचं एक प्रोफाईल आयोगाच्या वेबसाईटवर तयार होतं. तिथे मोबाईल नंबर बदलण्यासाठी आयोगाला फक्त एक मेल करावा लागतो. त्यानंतर एका दिवसात क्रमांक बदलून मिळतो. असंही या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

प्रत्यक्ष वर्गात हा प्रकार कसा घडतो?

स्पर्धा परीक्षा ही खरंतर वेळेशीच स्पर्धा असते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परीक्षेसाठी सुरक्षाव्यवस्था कडक असते. परीक्षेच्या वर्गात असणारे पर्यवेक्षक सुद्धा त्याची दक्षता घेताना दिसतात. आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वं पाळणं त्यांना अर्थातच बंधनकारक असतं. प्रश्नपत्रिकेचे A, B, C, D असे संच असतात. प्रत्येकाला वेगळा संच मिळतो. या चारही संचात प्रश्न सारखे असले तरी प्रश्नक्रमांक वेगळा असतो. असं असतानाही एकमेकांना प्रश्न विचारण्याचे हे प्रकार कसे घडतात हा प्रश्न आम्ही या विद्यार्थ्याला विचारला,

त्यावर उत्तर देताना हा विद्यार्थी म्हणाला, "हे सगळं प्रकरण फक्त एखादा प्रश्न विचारण्यापुरता मर्यादित नाही. ज्या लोकांनी ठरवून हे प्रकार केले आहेत ते लोक अगदी विषय सुद्धा बदलून घेतात. म्हणजे एखादा उमेदवार एका विषयाचा अभ्यास करणार, तर दुसरा उमेदवार दुसरा एखादा अभ्यास करणार असं ठरलेलं असतं. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी ज्या उमेदवाराने ज्या विषयाचा अभ्यास केला आहे त्याचे प्रश्न सोडवतो. बाकीचा पेपर सोडवून झाले की मग उत्तरं विचारायचे आणि आपण ज्या विषयाचा अभ्यास केला त्या प्रश्नांचे उत्तर सांगायचे अशी ही पद्धत असते. परीक्षेत वेळ तसा कमी नसतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पर्यवेक्षक हजेरीच्या कागदावर सही करणं वगैरे औपचारिकता पूर्ण करत असतो तेव्हाही थोडा वेळ मिळतो. तेव्हा हे सगळे प्रकार घडतात."

राज्यसेवा पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान आणि CSAT (Civil Services Aptitude Test) असे दोन पेपर असतात. त्यापैकी CSAT ही बुद्धीकल चाचणी असते तिथेही काही भाग एकाने सोडवायचा, काही भाग दुसऱ्याने सांगायचा असे प्रकार घडतात. या दोन पेपरच्या मध्ये दोन तासांचा ब्रेक असतो. तेवढ्या वेळात पुढे मागे बसलेल्या उमेदवाराची ओळख करून घेऊन हा एक्सचेंजचा प्रकार चालतो असा दावा या विद्यार्थ्याने केला आहे.

या बैठकव्यवस्थेची पद्धत बदलून द्या अशी मागणी उमेदवारांनी आयोगाकडे केली होती मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

"आम्ही मुख्यमंत्र्यांनाही मेल केलेत, मात्र तिथूनही काहीही प्रतिसाद मिळालेला नाही." असंही या उमेदवाराने सांगितलं.

आयोगाचं काय म्हणणं आहे?

या आरोपांविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव सुनील अवतारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत.

ते म्हणाले, "मुळात संचच वेगळे असल्यामुळे हे गैरप्रकार होऊ शकत नाही. या सगळ्या विद्यार्थ्यांनी उठवलेल्या आवया आहेत. बैठक व्यवस्था ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येक परीक्षेसाठी ती पद्धत वेगवेगळी असते. अर्जाच्या अंतिम स्वीकृतीच्या दिनांकानंतर ती बदलत असते. या पद्धती गुप्त असतात. तरीही आम्ही जास्त प्रमाणात दक्षता घेत आहोत. गेल्या चार वर्षांपासून मोबाईल क्रमांकानुसार बैठक व्यवस्था राबवण्याची पद्धत अस्तित्वात आहे. आरोपांवर आम्ही कारवाई केली आहे मात्र आम्हांलाही काही बाबतीत गुप्तता बाळगावी लागते त्यामुळे त्या आम्ही सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांनी केलेले आरोप मोघम आहेत. एखाद्या रोल नंबरविषयी ठाम माहिती असेल तर सांगा असं आम्ही अनेकदा सांगितलं. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या मेल्सला प्रतिसाद दिला नाही या आरोपात तथ्य नाही. "

महाराष्ट्र लोकसेवा आयोदगानं यासंदर्भात एक पत्रकही प्रसिद्ध केलं आहे. सलगपणे अर्ज भरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक एकापाठोपाठ येऊ नयेत, यासाठी प्रत्येक परीक्षेच्या वेळी स्वतंत्र कार्यपद्धती अवलंबण्यात येते. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर ही कार्यवाही केली जात असल्यानं त्यात पूर्वनियोजनाचा काहीच संबंध येत नाही, असे आयोगानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे परीक्षेच्या वेळी उमेदवाराला देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेला विशिष्ट संच क्रमांक असतो. सलग बैठक क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना एकाच संच क्रमांकाची प्रश्नपत्रिका दिली जात नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. याशिवाय परीक्षकांच्या पथकाकडून कडक पर्यवेक्षणही केलं जात असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)