रशिया कोरोना लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी किती काळ लागेल?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसवर प्रभावी लस शोधून काढल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने म्हटलं आहे की कोरोना लसीवरील ह्युमन ट्रायल यशस्वी झाली आहे.

आता पुढे काय होईल आणि ही लस कधीपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. एकदा क्लिनिकल ट्रायल झाली तरी लस सर्वांसाठी उपलब्ध होईपर्यंत एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

रशियाने शोधलेल्या लसीचं व्यावसायिक स्तरावर उत्पादन कधी सुरू होणार ही माहिती रशियाने गुलदस्त्यातच ठेवली आहे.

स्वयंसेवकांवर कोव्हिड-19 च्या लसीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं असल्याचा दावा रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने केला आहे.

रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने दावा केल्यानंतर ही लस सर्वसामान्यांसाठी किती दिवसात उपलब्ध होईल याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

रशियामध्ये काय घडलं?

रशियाची वृत्तसंस्था तास बरोबर बोलत असताना विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक यांनी म्हटलं आहे की 'ही लस प्रभावी आहे.'

त्यांनी सांगितलं "संशोधन पूर्ण झालं असून ही लस सुरक्षित आहे असंही आढळलं आहे. स्वयंसेवकांना 15 आणि 20 जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे."

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलजीचे संचालक वादिम तरासोव यांनी जगातली पहिली कोरोना लस क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी झाली आहे, अशी माहिती रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने दिली आहे.

या विद्यापीठाने 18 जून रोजी 'गेमली इन्स्टीट्यूट ऑफ एपिडेमियॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी'द्वारा तयार करण्यात आलेल्या या लशीची चाचणी सुरू केली होती.

सेकनॉफ विद्यापीठाचे आणखी एक वरिष्ठ अधिकारी अलेक्झांडर लुकाशेव यांच्या माहितीनुसार, लोकांसाठी ही लस सुरक्षित आहे की नाही हे पाहणं हा मूळ उद्देश होता. चाचणी यशस्वी झाली आहे आणि ती सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. आता लस उत्पादनासाठी काय काय तयारी करायची ते ठरवलं जात आहे.

लस सर्वसामान्यांना कधी उपलब्ध होईल?

रशियाने लस सुरक्षित असल्याचा दावा केला आहे पण ही त्यांनी यासंदर्भातील पूर्ण डेटा अद्याप जाहीर केला नाही. जेव्हा रशिया पूर्ण डेटा जाहीर करेल तेव्हाच आपण अंदाज लावू शकतो की ही लस सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी किती वेळ लागेल असं मत परभणीचे डीएसएम कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिवा आयथॉल यांनी मांडलं आहे.

कोणत्याही लसीची निर्मिती करण्यासाठी तीन फेजेस असतात. पहिल्या फेजमध्ये लसीची चाचणी एका टीमवर घेतली जाते. म्हणजे सात-आठ जण ते 20 जण. रशियाने ही पहिली फेज पूर्ण केली आहे. दुसऱ्या फेजमध्ये 100 हून अधिक जणांवर चाचणी घ्यावी लागते आणि तिसऱ्या फेजमध्ये विविध वंशाच्या, वयाच्या, लिंगाच्या हजारो जणांवर चाचणी घ्यावी लागते. ती पूर्ण झाल्यावरच त्याच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात करता येते.

पायाभूत सुविधा असणे

जर असं म्हटलं की ही लस या तिन्ही फेजमध्ये पूर्णपणे उत्तीर्ण झाली तर पुढे तिची व्यावसायिक स्तरावर निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे तितक्या पायाभूत सुविधा आहेत का? याचा विचार करावा लागेल. आपण पीपीई किट आणि मास्कचं फास्ट ट्रॅकिंग केलं म्हणजे लवकर पायाभूत सुविधा उभ्या करून त्यांच्या निर्मितीला सुरुवात केली. तशीच लसीची निर्मिती करावी लागेल, असं आयथॉल सांगतात.

मार्केटसाठी लस तयार झाल्यावर त्याचं वितरण आणि योग्य लोकांपर्यंत पोहचवणं हे देखील आव्हान असतं. त्यात काळाबाजाराला रोखण्याची समस्या देखील त्या त्या देशातील सरकारांसमोर असते.

कोरोना व्हायरस हा अतिशय तीव्र गतीने बदलणारा (म्युटेशन) व्हायरस आहे त्यामुळे रशियाने नेमका कोणत्या स्ट्रेनची लस बनवली हे देखील इतर संशोधकांनी तपासून पाहावं लागणार आहे.

इबोलाची लस येण्यासाठी 5 वर्षांच्या कालावधी लागला होता. इबोला व्हायरस जलद गतीने म्युटेट होणारा नव्हता पण कोरोना व्हायरस म्युटेट होतो. त्यामुळे हे देखील लक्षात घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यावर रशियाने लस शोधली असं गृहीत धरलं तरी ती प्रत्यक्षात लोकापर्यंत पोहचण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो असं डॉ. आयथॉल सांगतात.

भारत बायोटेकची लस कधीपर्यंत येणार?

भारतीय कंपनी भारत बायोटेकला ह्युमन ट्रायल्ससाठी परवानगी मिळाली आहे. भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत यासाठी करार केला आहे. क्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा विचार आहे.

भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोनाविरोधी लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ.बलराम भार्गव यांनी 2 जुलैला देशातील या 12 संस्थांना पत्र लिहून 7 जुलैपर्यंत या ट्रायलसाठी सर्व आवश्यक परवानगी घेवून नोंदणी करण्याची सूचना केली आहे.

देशातील 12 संस्थांना लिहीलेल्या पत्रात आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ.बलराम भार्गव म्हणतात, आयसीएमआरने भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोनाविरोधातील लसीच्या फास्ट-ट्रॅक ट्रायलसाठी भारत बायोटेक या कंपनीशी करार केलाय. ही संपूर्णत: भारताने विकसीत केलेली लस आहे. कोव्हिड-19 व्हायरसचा स्टेन वेगळा करून याच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे.

जगभरात लसीची कुठे तयारी सुरू आहे?

अमेरिकेतील सिएटल येथील कैसर पर्मनंट रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाची लस तयार करण्यात आली आहे. या लशीचं नाव mRNA-1273 असं आहे. पण ही लस लोकांना कोरोनापासून वाचवेल की नाही, हे तपासण्यात येतंय. आजच बातमी आली आहे की या लशीची चाचणी 4 माणसांवर करण्यात आली आहे.

ही लस खरंच परिणामकारक आहे की नाही हे कळण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

जेव्हा लस तयार करतात तेव्हा मृत किंवा दुर्बल व्हायरस वापरतात. उदाहरणार्थ पोलिओ होऊ नये म्हणजे जी लस देतात त्यात पोलिओचेच दुर्बल व्हायरस असतात.

पण कोविडची mRNA-1273 ही लस कोरोना व्हायरसपासून बनवलेली नाहीये. तर या व्हायरसचा जेनेटिक कोड कॉपी करून त्यातला छोटसा भाग प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आणि त्यापासून ही लस बनवली आहे.

या प्रकाराला प्लग अॅंड प्ले असं म्हणतात, असं बीबीसीचे आरोग्य प्रतिनिधी जेम्स गॅल्लघर सांगतात.

या लशीतले व्हायरस अर्धवट आणि दुर्बल आहेत, त्यामुळे ते काही धोकायदायक नाहीत. पण ते शरीरात गेले की आपलं शरीर या व्हायरसविरोधात लढण्याची तयारी करतं. त्यामुळे जेव्हा खऱ्या कोरोना व्हायरसचा हल्ला होईल, तेव्हा आपल्या शरीराची तयारी पूर्ण झाली असेल आणि आपण हल्ला आरामात परतवून लावू.

या लशीची चाचणी ज्या रुग्णांवर होत आहे त्यांची स्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. 28 दिवसानंतर पुन्हा त्या रुग्णांवर या लशीची चाचणी केली जाईल.

अजून वाट पाहावी लागणार...

ब्रिटनमधल्या इंपीरियल कॉलेजच्या साथीच्या रोगांच्या विभागातही कोरोना विषाणूच्या लशीवर काम सुरू आहे. या विभागाचे प्रा. प्राध्यापक रॉबिन शटॉक सांगतात, "आधी लस तयार करायची म्हटलं तर त्यावर संशोधन करून, चाचणी घेऊन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देईपर्यंत 10 वर्षांहून अधिक काळ लागायचा. पण सध्या आम्ही ज्या तंत्रज्ञानावर काम करतोय ते तंत्रज्ञान आपला वेळ वाचवणारं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत त्यानुसार ही लस काही महिन्यांत तयार होऊ शकते."

पण कितीही लवकर म्हटलं तरी सर्व प्रक्रियेतून मंजूर झालेली लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होण्यासाठी किमान 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं संशोधक सांगतात.

लस तयार झाली तर...

आणि लस बाजारात आली तरी पुढे समस्या येऊ शकतात, असं मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक शिवा आयथॉल सांगतात, "औषधं शोधल्यानंतर सर्वांत मोठं आव्हान असतं की ते लोकांपर्यंत कसं पोहचावयाचं. हे आव्हान राजकीय आणि आर्थिक स्तरावर असतं. समजा आपल्या देशात 130 कोटी लोक आहेत त्यांच्यापर्यंत औषध कसं पोहोचवणार हे देखील पाहणं गरजेचं ठरतं.

"त्यात लोकांना ज्ञान किती आहे हे तपासावं लागतं. लोकांचा विरोध होतो लोकांची समजूत काढावी लागते. लोकांमध्ये भीती असल्यामुळे याला वेळ लागणारच पण वर्षानुवर्षं आपण अशा व्हायरसचा मुकाबला करत आलो आहोत. तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण या व्हायरसचाही आपण प्रतिकार करू," डॉ. आयथॉल सांगतात.

अनेक ठिकाणी प्रयोग, चाचण्या

नेचर या आरोग्यविषयक नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चीनमध्ये 80 हून अधिक क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या देखरेखीखाली हे प्रयोग सुरू आहेत. भारतातही कोरोना व्हायरस पेशंटच्या शरीरातून काढून प्रयोगशाळेत अभ्यास सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 11 आणि 12 फेब्रुवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. कोरोना व्हायरसवरच्या संशोधनाला चालना मिळावी यासाठी जगातील प्रमुख शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची बैठक घेतली.

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ब्लू प्रिंट तयार केली आहे. पण हे सगळं व्हायला वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. हात धुवा आणि लोकांना भेटणं टाळा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)