You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीची मागणी निषेधार्ह – अनिल देशमुख
गेल्या 24 तासात विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवरील महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.
1. सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशीची राजकीय मागणी निषेधार्ह - अनिल देशमुख
"अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेतच. या प्रकरणाची योग्य चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत व अतिशय बारकाईने तपास करत आहेत. तरीदेखील राजकीय फायद्यासाठी या गुन्ह्याचा तपास CBI ला द्यावा अशी मागणी होतेय. त्याचा मी तीव्र निषेध करतो!," असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी रात्री केलं.
सुशांतच्या मृत्यूच्या दीड महिन्यांनंतरही त्याच्या कथित आत्महत्येची कारणं स्पष्ट होत नाही आहेत. उलट सोशल मीडिया तसंच राष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याच्या मृत्यूसाठी बरीच कटकारस्थानं झाल्याच्या अनेक बातम्या फिरत आहेत.
सध्या सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून, बिहार पोलीस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
आणखी एका वृत्तानुसार बिहार पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अभिनेत्री आणि सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्या घरापर्यंत तीन किलोमीटर चालत जावं लागलं होतं.
दरम्यान, गृहमंत्री यांनी ट्वीट करून स्पष्ट केलं आहे की "जरी बिहारमध्ये पाटणा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला तरी CrPC चॅप्टर 12 व 13 अंतर्गत घटना जिथे घडली त्या कार्यक्षेत्रातील पोलीस तपास करतात व त्याच न्यायकक्षेतच हा खटला चालवला जातो."
2. 'राम मंदिरासाठी राजीव गांधींचं योगदान मोदींपेक्षा जास्त'
अयोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिर भूमिपूजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची मांदियाळी या निमित्ताने अयोध्येत दाखल होणार आहे. अशात भाजपचेच खासदार असेलेल सुब्रहमण्यम स्वामी यांनी त्यांच्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीवर एका चर्चेदरम्यान त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला या राम मंदिराच्या मोठ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही, पण आणखी कुणी जायला हवं होतं, तिथे उपस्थित राहायला हवं होतं?
तेव्हा ते म्हणाले की असे अनेक नेते आहेत ज्यांनी तिथे उपस्थित राहायला हवं होतं, पण ते राहू शकत नाही. "राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणं सरकारच्यावतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळं हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे."
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
"याउलट मला वाटतं राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अशोक सिंघल यांच्यासारख्या लोकांना आज तिथे राहायला हवं होतं," असं ते म्हणाले.
"माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती," असंही ते यावेळी म्हणाले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
3. मोदींनीच भारतात करोना आणला - प्रकाश आंबेडकर
कोरोना व्हायरसचा संसर्ग देशभरात पसरलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
"परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची गरज असताना मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भारतात घेऊन आले. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठं?" असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी आढळला, त्यानंतर जानेवारी 30 रोजी भारतात पहिला रुग्ण आढळला होता.
आणि फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमस्ते ट्रंप' हा मोठा कार्यक्रम गुजरातच्या अहमदाबादेत आयोजित केला होता. त्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, "परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची, त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला."
आजवर भारतात 17 लाख हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4. अमित शाहांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे राज्यपालसुद्धा कोरोनाग्रस्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
तसंच तामिळ नाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हेही कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने या बातम्या दिल्या आहेत.
रविवारी संध्याकाळी अमित शाह यांनी स्वत:च ट्वीटरवरून माहिती दिली की त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची एक टीम मेदांता हॉस्पिटलला भेट देऊन शाह यांच्यावर होणाऱ्या उपचारांबद्दल माहिती घेऊ शकते, असं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल रानी वरुण यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय शोक घोषित करण्यात आला आहे.
युपीच्याच अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर सोहळ्याला आता अमित शाह उपस्थित राहू शकणार नाहीत.
5. सुजय विखे-पाटील संतापले - '...तर मी राजीनामा देतो!'
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला काही सूचना दिल्या असता, त्या ऐकल्या जात नाहीत. त्यापेक्षा मी राजीनामा देतो, असा संताप नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अहमदनगरला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 18 कोटी रुपये दिले. मात्र यातील चार कोटी रुपये आरोग्य सेवक भरतीसाठी देण्यात आले होते. यासंदर्भातली माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे विचारली असता, त्यांनी देण्यास नकार दिला, अशी तक्रार विखे-पाटिलांनी व्यक्त केली.
"खासदाराला केंद्राच्या निधीसंदर्भात माहिती दिली जात नसेल तर खासदार असून काय उपयोग? मी राजीनामाच देतो. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी निवडणुका लढवाव्यात," असंही ते म्हणाले.
विकासवर्धिनी संस्थेतर्फे कोरोनामुक्त नगर अभियानाअंतर्गत खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत घेतली, अशी बातमी सकाळने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)