You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिया चक्रवर्ती कोण आहे?
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात त्याचे कुटुंबीय आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती एकमेकांवर रोज नवे आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
14 जून रोजी सुशांतनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. पण रियानं त्याला आत्महत्येसाठी भाग पाडलं असे आरोप करत सुशांतच्या वडिलांनी पटना पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. 'रियानं सुशांतच्या पैशांचा गैरवापर केला, त्याच्यावर अंमली पदार्थांचा प्रयोग आणि त्याला कुटुंबापासून तोडलं' असे आरोपही त्यांनी केले होते.
तर रियानं हे सगळे आरोप साफ फेटाळून लावले असून, सुशांतच्या बहिणींकडून त्याला त्रास होत होता, असा दावा केला होता. आपण मुंबई पोलिसांना आणि ईडीला सर्व आर्थिक व्यवहारांची कागदपत्र दिली असून त्यावरून हे सगळे आरोप खोटे ठरतात असं तिच्या वकिलांनी म्हटलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदशानंतर सीबीआयनं या प्रकरणी तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणातील आर्थिक बाजूंसंदर्भात अंमलबजावणी संचलनालयाचा तपासही सुरू असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी रियाच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावलं आहे, तसंच त्यांना बँक लॉकरच्या चाव्या सोबत आणण्यास सांगितलं आहे.
सुशांतच्या वडिलांचा रियावर खुनाचा आरोप
दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया ही 'खुनी' असल्याचा थेट आरोप केला आहे.
"रिया माझ्या मुलाला बऱ्याच काळापासून विष देत होती. ती खुनी आहे. तपासयंत्रणांनी तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक करायला हवी," असा आरोप के. के. सिंह यांनी केला आहे.
तर रिया चक्रवर्तीनं सुशांतसोबतच्या व्हॉट्स अॅप चॅटचे काही डिटेल्स India Today सोबत शेअर केले असून, त्यात सुशांतनं त्याच्या बहिणविषयी शंका व्यक्त केल्याचा रियाचा दावा आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून तपास
या प्रकरणी अंमली पदार्थांचा काही संबंध नाही ना, याविषयी तपास सुरू आहे. रियाच्या फोनमधील व्हॉट्स अॅप चॅटवरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं नव्यानं तपास सुरू केला आहे, असं वृत्त NDTVनं दिलं आहे
रियानं अंमली पदार्थांची खरेदी आणि वापर केला होता का, याविषयी हा तपास सुरू आहे. त्यामुळं सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) यांच्या पाठोपाठ NCB ही तिसरी संस्थाही या प्रकरणाच्या तपासात उतरली आहे.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मात्र अंमली पदार्थांविषयीचे आरोप फेटाळून लावले आहेत. "रियानं आयुष्यात कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही. ती कधीही रक्त तपासणीसाठी तयार आहे," असं त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
रिया चक्रवर्ती कोण आहे?
रिया चक्रवर्ती हे नाव सध्या चर्चेत आहे. पण अनेक लोकांची पहिली प्रतिक्रिया हीच होती की, रिया चक्रवर्ती हे नाव आम्ही सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच पहिल्यांदा ऐकलं. त्याआधी ती कोण होती, काय करत होती याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती होतं.
रिया चक्रवर्ती पहिल्यांदा स्क्रीनवर दिसली ती 2009 साली MTV च्या 'मिस टीन' या स्पर्धेत. त्यानंतर MTV ची सगळ्यात तरूण व्हीजे (व्हीडिओ जॉकी) बनण्याचा मानही तिला मिळाला.
2012 साली तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिचा पहिला पिक्चर होता 'तुनीगा तुनीगा.' त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाव्दारे पदार्पण केलं.
त्यानंतर तिने 'सोनाली केबल', 'बँकचोर' अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर 'हाफ गर्लफ्रेंड', 'दोबारा' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या.
महेश भट -रिया फोटोचा वाद
मुंबई मिररमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार रिया चक्रवर्ती अनेकदा वादांमध्ये अडकली आहे. पण त्यातला सर्वाधिक चर्चिला गेलेला वाद म्हणजे महेश भटांसोबतचा एक फोटो.
2018 साली 'जलेबी' पिक्चर रिलीज व्हायच्या आधी दिग्दर्शक महेश भट यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला.
या फोटोवरून रिया प्रचंड ट्रोल झाली. अनेकांनी रिया आणि महेश भट यांचं प्रेमप्रकरण असंही म्हटलं. यावर नंतर रियानेच तो फोटो व्टीट करून लिहिलं.
'तू कौन हैं, तेरा नाम हैं क्या, सीता भी यहा बदनाम हुई'
"ट्रोल्स त्यांच्या मनातला चिखल माझ्या अंगावर उडवत आहेत, तो चिखल त्यांच्या आत्म्यातला आहे. जर असंच होणार असेल तर आपण अंधारयुगापासून पुढे आलो असं म्हणायचं तरी का? तुमची विकृत मानसिकता तुम्हालाच लखलाभ."
सुशांत सिंह राजपूतसोबतचं नातं
रिया आणि सुशांत यांची भेट पहिल्यांदा 2012 झाली. त्यावेळेस दोघंही 'यशराज फिल्म्स'बरोबर काम करत होते. सुशांत तेव्हा मनीष शर्मांच्या 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमात काम करत होता, तर रिया आपल्या पहिल्या हिंदी सिनेमाची तयारी करत होती.
पण मागच्या वर्षी नात्याची जाहीर चर्चा सुरू झाली. त्यानंतर ते दोघं अनेकदा सार्वजनिकरित्या सोबत दिसले. एकमेकांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही झळकायला लागले. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाने त्यांचं नातं मान्य केलं आणि हेही मान्य केलं की, ते एकमेकांसोबत राहात होते.
एका सिनेवेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या नव्या रोमँटिक चित्रपटाचं शुटिंग मेमध्ये सुरू होणं अपेक्षित होतं, पण लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकललं गेलं. हे दोघं मुंबईत घर शोधत होते आणि लवकरच लग्न करणार होते, असंही यात म्हटलं आहे.
पण सुशांतच्या वडिलांनी मात्र म्हटलं होतं की, मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही. मला सुशांतची गर्लफ्रेंड म्हणून फक्त अंकिता लोखंडे माहिती होती. रियाला त्यांनी सुशांतच्या अंत्यसंस्कांराच्या वेळीही उपस्थित राहू दिलं नव्हतं, असं म्हटलं जातं.
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने भावनावश होऊन इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की, "तू इथे नाहीस हे माझं मन मानायला तयार नाही. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन, या जगाच्या अंतापर्यंत आणि त्याही नंतर."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)