आनंद तेलतुंबडेंचा 70 वा वाढदिवस तुरुंगातच

फोटो स्रोत, Siddhesh Gautam
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी तुरुंगात असणारे आणि ज्यांच्या सुटकेसाठी जगभरातून आवाज उठवला जातोय, असे प्रख्यात भारतीय अभ्यासक आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे वयाची 70 वर्षं पूर्ण करत आहेत. यावर्षीचा त्यांचा वाढदिवस तुरुंगातच पार पडला. गीता पांडे यांचा रिपोर्ट.
"मग ते माझ्यासाठी आले. पण तोवर माझ्यासाठी बोलणारं कुणीच उरलं नव्हतं."
जर्मन लुथरवादी धर्मगुरू, कवी आणि कट्टर नाझीविरोधक मार्टिन निमोलर यांच्या सुप्रसिद्ध कवितेतल्या या ओळी. प्रा. तेलतुंबडे आपल्या भाषणांमध्ये आणि पुस्तकांमध्ये वाईटाचा विरोध करताना मौन बाळगणाऱ्यांवर टीका करताना कायम या ओळींचा उल्लेख करत.
भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात प्रा. तेलतुंबडे यांना अटक झाली आहे. गेल्या 90 दिवसांपासून ते तळोजा कारागृहात आहेत.
गेल्या बुधवारी त्यांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केली. किमान वाढदिवसाच्या दिवशी त्यांना तुरुंगात एकटं वाटायला नको, असा त्यांच्या कुटुंबीयांचा आणि मित्रमंडळीचा प्रयत्न होता. इच्छा होती. म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी शेकडो पत्रं आणि कार्ड तळोजा तुरुंगात आली.
प्रा. तेलतुंबडे यांना पत्र लिहिणारे न्यू जर्सीतल्या विलियम पॅटरसन विद्यापीठात मानववंशशास्त्राचे प्राध्यापक असलेले बालमुरली नटराजन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आनंद एक सन्माननीय बुद्धिवादी आहेत आणि अत्यंत संशयास्पद कारणांवरून त्यांना अटक करण्यात आली आहे."
ते पुढे म्हणाले, "आम्ही कायम त्यांचा विचार करतो, त्यांची पुस्तकं वाचतो, हे त्यांना कळावं, अशी आमची इच्छा आहे."
भारतातल्या प्रख्यात विचारवंतांपैकी एक असलेले प्रा. तेलतुंबडे यांनी 30 पुस्तकांचं लेखन केलं आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी भारतातल्या निष्ठूर जाती व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत.
दलित कुटुंबात जन्मलेले तेलतुंबडे यांनी सुरुवातीला भारतातल्या काही बड्या तेल कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम केलं. त्यानंतर ते शिक्षण क्षेत्राकडे वळले. सध्या प्रतिष्ठित गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधल्या 'बिग डेटा' या कार्यक्रमाचे ते प्रमुख आहेत.
सरकारचे कठोर टीकाकार म्हणून ते ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वर्णन करताना, ते "हिटलर आणि मुसोलिनीपेक्षा जास्त धोकादायक" आणि "पराकोटीचे आत्मपूजक" असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
31 जानेवारी 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या भीमा कोरेगावमध्ये दलितांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जातीय दंगल उसळली होती. ही दंगल भडकवण्यास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्यासह 10 नामवंत मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, कवी आणि वकिलांना अटक करण्यात आली होती.
या सभेला खरंतर यापैकी कुणीही प्रत्यक्ष उपस्थित नव्हतं. मात्र, आदल्या दिवशी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे जातीय दंगल उसळल्याचा आरोप आहे.

14 एप्रिल रोजी कोर्टाच्या आदेशानंतर प्रा. आनंद तेलतुंबडे स्वतःहून NIA पोलिसांसमोर हजर झाले.
या सर्वांना UAPA (Unlawful Activities Prevention Act - बेकायदेशीर कृती प्रतिबंधात्मक कायदा) या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या कायद्याखाली अटक झालेल्यांना जामीन मिळणंही जवळपास अशक्य असतं.
प्रा. तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचाही गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
मात्र, सरकारवर टीका केल्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचं विचारवंत आणि आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
अॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकारासाठी आवाज उठवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनेही भीमा कोरोगाव प्रकरणात अटक झालेल्या विचारवंतांच्या सुटकेसाठी गेल्या काही महिन्यात अनेक पत्रकं लिहिली आहेत. यातल्या एका पत्रकात म्हटलं आहे, "या सर्व कार्यकर्त्यांनी दलित आणि आदिवासींसह भारतातल्या सर्वाधिक पिचलेल्या, उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी अथक काम केलं आहे."
ह्युमन राईट वॉच या संस्थेनेदेखील ही अटक "चुकीची" आणि "राजकीयदृष्टीने प्रेरित" असल्याचं म्हटलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारात हिंदुत्त्ववादी नेत्यांचीही भूमिका असल्याचे आरोप आहेत. सरकार या आरोपांची चौकशी का करत नाही, असा सवाल या संस्थेने विचारला आहे.
मे महिन्यात मानवाधिकारविषयक युरोपीय संसदेच्या उपसमितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांद्वारे "मानवाधिकार कार्यकर्त्यांना धमकावणं आणि त्रास देणं," यावर चिंता व्यक्त केली होती.
इतकंच नाही तर कोरोना विषाणूची साथ बघता अटक करण्यात आलेल्या सर्वांची सुटका करावी, असं आवाहनही या पत्रात करण्यात आलं होतं. अटक करण्यात आलेल्या विचारवंत आणि कार्यकर्त्यांचं वय बघता भारतातल्या गजबजलेल्या कारागृहांमध्ये त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचं कारण या पत्रात देण्यात आलं आहे.
नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी एकदा भारतीयांचं वर्णन करताना त्यांना 'वाद घालणारे' (Argumentative) म्हटलं होतं. याचा संदर्भ देत प्रा. नटराजन म्हणाले होते की 'भारत कल्पनांची (ideas) खाण आहे.' मात्र, गेल्या 8 वर्षांपासून युक्तीवाद, वाद यांची जागा संकुचित होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Siddhesh Gautam
ते म्हणतात, प्रा. तेलतुंबडे गेल्या 30 वर्षांपासून जागतिकीकरण आणि जाती-धर्माचं राजकारण या महत्त्वाच्या विषयावरच्या वादविवादाची रुपरेखा आखत आले आहेत.
प्रा. नटराजन म्हणाले, "He's been calling out caste deniers and Hindu triumphalism. ताकद असणाऱ्यांकडे बोट दाखवण्याची हिम्मत त्यांनी दाखवली. ते त्यांना म्हणत होते - 'तुम्ही काय करत आहात, हे दिसतंच आहे आणि तुमच्या या कृतीने बहुसंख्य भारतीयांची अवस्था दयनीय होत आहे.' आणि यामुळेच त्यांची भीती वाटू लागली होती."
प्रा. तेलतुंबडे यांच्या पत्नी रमा सांगतात की दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांचं नाव आलं त्यावेळी त्यांना धक्काच बसला.
मुंबईत माझ्याशी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमच्याबाबतीत असं काहीतरी घडू शकतं."
"माझे पती गुन्हेगार नाहीत. ते विद्वान आहेत. कृतीशील आहेत. दिवसातले 14-15 तास ते वाचन, लेखन आणि शिकवण्यात घालवतात."
त्या म्हणाल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते गरीब आणि उपेक्षितांची मदत करायचे. उद्देश फक्त हाच की त्यांना फक्त भारत नाही तर उत्कृष्ट भारत बघायचा होता.
"आणि त्यासाठी तुरुंगात जाणं ही खूप मोठी किंमत आहे."

प्रा. आनंद तेलतुंबडे यांना अटक झाल्यापासून त्यांच्या पत्नीला आठवड्यातून दोन मिनिट फोन कॉलवर बोलण्याची परवानगी मिळाली आहे.
माझ्याशी बोलताना रमा तेलतुंबडे म्हणाल्या, "मी त्यांना कायम एकच प्रश्न विचारते, तब्येत कशी आहे आणि तुरुंगातलं जेवण कसं आहे? कारण मला माहिती आहे तिथलं जेवण चांगलं नसतं. त्यांना आमची काळजी वाढवायची नाही. त्यामुळे ते कायम सगळं व्यवस्थित आहे, असंच सांगतात. ते त्यांच्या आई आणि आमच्या मुलींची विचारपूस करतात."
रमा आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात आहेत.
रमा म्हणतात, "स्वतःचे विचार मांडणाऱ्याला अटक होईल, अशा भारताची कल्पना त्यांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) कधीच केली नव्हती. आपण लोकशाही देशात राहतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिला आहे."
मात्र, आजच्या भारतात हा अधिकार संकटात असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर सोशल मीडियावर कथित राष्ट्रवादी ट्रोल्सकडून ट्रोल करण्यात येतं. सरकारचा विरोध करणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अटक होते. मतभेद असणाऱ्यांवर UAPA अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबलं जातं. त्यांना जामीनही मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
2020 च्या सुरुवातीला देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला जोरदार विरोध झाला. हा कायदा मुस्लीमविरोधी असल्याचं म्हणत अनेक विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अशा अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. सरकारसमर्थक न्यूज चॅनल्सने त्यांना 'राष्ट्रद्रोही' ठरवत 'भारत तोडण्याचा त्यांचा प्रयत्न' करत असल्याचे आरोप त्यांच्यावर केले.
यातले अनके विद्यार्थी अजूनही तुरुंगात आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका होऊ लागल्यानंतर सफूरा झरगर नावाच्या एका गर्भवती विद्यार्थिनीला तब्बल तीन महिन्यांनंतर जामीन देण्यात आला.
प्रा. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई म्हणतात, "लोकांना चुकीच्या आरोपांखाली अटक करून सरकार लोकांच्या स्वातंत्र्याशी खेळत आहेत."
"नक्षलवाद्यांची भरती करून, त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करून नक्षलवाद्यांची मदत करणं आणि त्याबदल्यात पैसा कमावणं, असे मुख्य आरोप प्रा. तेलतुंबडे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत."
मात्र, प्रा. तेलतुंबडे यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यावेळी पोलिसांना शस्त्र किंवा पैसे काहीच सापडलं नाही.
पुराव्यांच्या नावाखाली पोलिसांना आतापर्यंत फक्त चार पत्रं सापडली आहेत. जी त्यांनी पत्रकार परिषदेतही झळकावली होती.
वकील देसाई यांचं म्हणणं आहे की ती पत्र टाईप केलेली होती. त्यावर कुणाचीही स्वाक्षरी नव्हती. इतकंच नाही तर त्यावर कुणाचा पत्ता किंवा ई-मेल आयडीसुद्धा नव्हता.
देसाई यांचा दावा आहे की ती पत्र प्रा. तेलतुंबडे यांनी लिहिलेली नाही आणि त्यांना कुणी पाठवलेलीसुद्धा नाहीत. त्या चारही पत्रांमध्ये केवळ एक गोष्ट समान सापडते ती म्हणजे त्यात आनंद नावाचा उल्लेख आहे आणि आपल्या देशात अनेकांचं नाव आनंद आहे.
वकील देसाई म्हणतात, "ही पत्रं बनावट असल्याची शंका आहे. आणि जरी ही पत्रं खरी असली तरी पत्रात उल्लेख असलेले आनंद हे प्रा. तेलतुंबडेच आहेत, हे कसं सिद्ध करणार? शिवाय कुणी कुणाला काहीही लिहू शकतं. पण तो पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा का? त्यांना पुरावा मानता येणार नाही."
देसाई म्हणतात की कोर्टात हे पुरावे टिकू शकणार नाहीत. मात्र, न्यायालयीन प्रक्रियाच मोठी शिक्षा असते.
"कोर्टात खटला सुरू असताना एखादी व्यक्ती 10 वर्ष तुरुंगातच असेल तर त्या व्यक्तीचं तर आयुष्यच बर्बाद होतं."
प्रा. आनंद तेलतुंबडे जवळपास 3 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी रमा म्हणतात की आमचं फक्त एकच म्हणणं आहे त्यांना जामीन मिळावा आणि कोर्टात लवकरात लवकर खटल्याची सुनावणी सुरू व्हावी जेणेकरून "या प्रकरणातून त्यांचं नाव वगळता येईल."

फोटो स्रोत, Getty Images
अटक करण्याच्या एक दिवस आधी प्रा. तेलतुंबडे यांनी एक खुलं पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी गेली दोन वर्ष त्यांचा कसा छळ सुरू आहे, हे तपशीलवार सांगितलं होतं. आपल्या घरावर कसा छापा टाकण्यात आला, विकीपिडीयावरच्या त्यांच्याविषयीच्या माहितीत छेडछाड करून कसा अवमानकारक मजकूर लिहिण्यात आला आणि त्यांच्या फोनमध्ये कशापद्धतीने इस्राईली स्पायवेअर टाकून त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे सर्व त्यांनी पत्रात सांगितलं होतं.
"माझा भारत उद्ध्वस्त होत असल्याचं बघताना, अशा कठीण क्षणी एका धूसर आशेने मी तुम्हाला लिहितो आहे. तुमच्याशी पुन्हा कधी बोलता येईल, माहिती नाही."
पत्रात ते पुढे लिहितात, "पण मला खात्री आहे की तुमची वेळ येण्याआधी तुम्ही बोलते व्हाल."
प्रा. तेलतुंबडे यांना अटक करून सरकार बुद्धिवादी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रा. नटराजन यांचं म्हणणं आहे.
ते म्हणतात, "पण माझे शब्द लक्षात ठेवा - आनंद यांचा आवाज दाबता येणार नाही. तुम्ही लोकांना अटक करू शकता. त्यांचा छळ करू शकता. त्यांना ठार करू शकता. पण तुम्ही त्यांच्या कल्पनांना हरवू शकत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








