न्यूझीलंडच्या कोरोनामुक्तीचे 100 दिवस: जगाला हादरवणाऱ्या संसर्गावर कसं मिळवलं नियंत्रण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅना जोन्स
- Role, बीबीसी न्यूज
न्यूझीलंडच्या 'कोरोनामुक्तीला' आज म्हणजे 9 ऑगस्टला 100 दिवस पूर्ण झाले. या गेल्या 100 दिवसात न्यूझीलंडमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही.
न्यूझीलंडमध्ये आता बहुतांश जणांचं दैनंदिन जीवन सुरळीत झालंय. रग्बीचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते, कुठल्याही भीतीविना लोक रस्त्यावर फिरतात, रेस्टॉरंटमध्ये जातात.
मात्र, अर्थात काहीजण काळजीत सुद्धा आहेत. कारण भविष्यात पुन्हा असं संकट आलं, तर आपण तयार आहोत का, हा प्रश्न त्यांना सतावतो.
कोरोनाच्या प्रसारानंतर आजवर न्यूझीलंडमध्ये केवळ 1500 रुग्णच आढळले आणि त्यातील 22 जणांचा मृत्यू झालाय. या सर्व गोष्टींनाही आता 100 दिवस उलटले. कारण गेल्या 100 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडनं कोरोनावर इतकं नियंत्रण कसं मिळवलं? न्यूझीलंडने कोरोनावर मिळवलेल्या यशामागचं रहस्य काय? याचा आढावा बीबीसीनं न्यूझीलंड कोरोनामुक्त झाला, तेव्हा घेतला होता.
न्यूझीलंडने सीमा बंद कधी केल्या?
2 फेब्रुवारीला फिलीपिन्समध्ये एका इसमाचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला. कोव्हिड-19मुळे चीनबाहेर झालेला हा पहिला मृत्यू होता.
तोपर्यंत न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता, पण तरीही दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडने चीनमधून येणाऱ्या वा चीनमार्गे येणाऱ्या परदेशी व्यक्तींच्या येण्यावर बंदी घातली. चीनमधून परत येणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांना देशात दाखल झाल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा नियम करण्यात आला.
हा व्हायरस जसा जगभर पसरू लागला तशी इराणमधून येणाऱ्या विमानप्रवाशांवरही बंदी घालण्यात आली. कारण न्यूझीलंडमधला पहिला रुग्ण इराणशी संबंधित होता. यासोबतच दक्षिण कोरिया, उत्तर इटलीमधून येणाऱ्या आणि लक्षण दिसणाऱ्या सर्वांवरच निर्बंध घालण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर 16 मार्चच्या मध्यरात्रीपासून बाहेरच्या देशातून न्यूझीलंडमध्ये दाखल होणाऱ्या सर्वांवरच - न्यूझीलंडच्या नागरिकांवरही देशात दाखल झाल्यानंतर सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा नियम लावण्यात आला. फक्त पॅसिफिक महासागरातल्या देशातील बेटांवरून येणाऱ्या प्रवाशांना यातून वगळण्यात आलं. कारण याभागात कोरोनाचा प्रादूर्भाव फारसा नव्हता.
हे निर्बंध जगातले सर्वात कठोर निर्बंध असले तरी त्यासाठी आपण माफी मागणार नसल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर काहीच दिवसांत पंतप्रधान आर्डन यांनी देशाची सीमा नागरिक नसलेल्या सर्वांसाठी आणि नागरिकांसाठीही बंद करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला.
"सुरुवातीच्या टप्प्यातच काही हजारांच्या घरात रुग्णसंख्या असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने लोकांची आवक थांबली आणि त्यांना कम्युनिटी ट्रान्समिशनही थांबवता आलं," न्यूझीलंडमधल्या मासी युनिव्हर्सिटीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. मार्टिन बेर्का यांनी बीबीसीला सांगितलं.
लवकर लागू केलेला लॉकडाऊन
कोरोना व्हायरस हा नेहमीच्या फ्लूच्या साथीसाठीच्या उपायांनी आटोक्यात येणार नाही, हे मार्चच्या मध्यापर्यंत लक्षात आल्याचं न्यूझीलंडच्या आघाडीच्या एपिडेमिऑलिजिस्ट्स (साथीच्या रोगांचे तज्ज्ञ) पैकी एक प्राध्यापक मायकल बेकर सांगतात.
जानेवारी महिन्यापासून वुहानमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने काय साध्य झालं याविषयी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक अहवाल सादर केला होता आणि यावरूनच आपल्याकडे साथीची सुरुवात होत असतानाच सगळे महत्त्वाचे उपाय वापरत रोगाचा संपूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न करायला हवा, हे लक्षात आल्याचं प्राध्यापक बेकर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"सगळ्या गोष्टींची नेहमीप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खात्री करून घेण्याऐवजी आम्ही म्हटलं की, जे काही पुरावे दिसतायत त्यानुसार चीनमध्ये हे बऱ्यापैकी प्रभावी ठरलं आहे."
झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीसाठी लोकांना सज्ज करण्यासाठी मार्च महिनाअखेरीस न्यूझीलंडने एक 'फोर स्टेज अलार्म सिस्टीम' सुरू केली. जंगलात वणवा लागल्यावर जसे अॅलर्ट देण्यात येतात त्याच धर्तीवर यामध्ये तेव्हाचे धोके आणि त्यानुसार आवश्यक असे सोशल डिस्टंन्सिंगचे उपाय सांगण्यात आले.
धोका दुसऱ्या पातळीवर असताना ही पद्धत सुरू झाली पण 25 मार्चपर्यंत हा धोका वाढून चौथ्या पातळीवर गेला होता. यानंतर मग देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सर्वांना आपल्या घरी, आपल्या 'बबल'मध्येच राहण्याचे आदेश देण्यात आले.
त्यावेळी न्यूझीलंडमधली रुग्णसंख्या होती 102 आणि देशात कोव्हिड-19 मुळे एकही मृत्यू तोपर्यंत झाला नव्हता. याच काळात जेव्हा युकेने लॉकडाऊन केला तेव्हा त्यांच्याकडे 6,500 पेक्षा जास्त केसेस होत्या आणि 330 पेक्षा जास्त मृत्यू झाले होते.
युके सरकारने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत, पण देशात दाखल होणाऱ्यांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याची सक्ती जूनमध्ये सुरू केली. जुलैमध्ये या नियमांत बदल करून काही देशांतून येणाऱ्या लोकांना सवलत देण्यात आली.
आपण 'योग्य वेळी वैज्ञानिक सल्ल्यानुसार योग्य पावलं उचलली' असं युके सरकारने म्हटलंय. शिवाय देशाच्या सीमा बंद करण्याने आधीच सुरू झालेल्या कम्युनिटी ट्रान्समिशनवर फारसा परिणाम झाला नसता, असंही युके सरकारने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
"ब्रिटीशांसारखं केलं - फार काळ वाट पाहिली, फार काळ सगळं काही खुलं ठेवलं, तर मग प्रकरण वाढणार आणि त्याचं मोठ्या अडचणीत रूपांतर होणार. हे आर्थिक आणि वैद्यकीय दृष्ट्या खर्चिक असतं," प्रा. बेर्का सांगतात.
"इतर देशांपेक्षा आमच्यावर आर्थिक परिणाम काहीसा जास्त झाला. पण त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट म्हणजे आता आम्ही कोरोना मुक्त आणि निरोगी आहोत."
प्रभावी संवाद
न्यूझीलंडमधल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केल्याचं प्रा. बेर्का सांगतात.
कोरोनाच्या केसेस सर्वाधिक असतानाच्या काळात - 'पीक'दरम्यानही न्यूझीलंडमध्ये रोज फक्त 89 रुग्ण आढळत होते.
"घरी जा आणि सहा आठवडे जास्तीत जास्त काळ तिथेच रहा असं म्हणत, ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केली नाही अशा करण्यासाठी त्यांनी खरंच लोकांच्या मनाला आणि बुद्धीला साद घातली."
लॉकडाऊनचा हा काळ जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यासाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरण्यात आला. आता न्यूझीलंडमध्ये एका दिवसात 10,000 चाचण्या केल्या जाऊ शकतात आणि एखादी केस नक्की झाल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसर्स कामाला लागतात. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना खबरदारीचा इशारा देत विलगीकरणात जाण्यास सांगण्यात येतं.

फोटो स्रोत, Getty Images
तातडीने पावलं उचलल्याबद्दल WHO ने न्यूझीलंडचं कौतुक करत त्यांचा दाखला इतर देशांना दिलाय. पण न्यूझीलंड सरकारने उचललेल्या पावलांवर टीकाही झाली.
सुरुवातीला दिसणारं राजकीय ऐक्य नंतर कमी होऊ लागलं. तेव्हा विरोधीपक्ष नेते असणाऱ्या सायमन ब्रिजेस यांनी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं म्हटलं होतं."घराबाहेर पडल्याने जेवढं नुकसान होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त लॉकडाऊनमध्ये राहिल्याने होईल."
लॉकडाऊनचा जसा आर्थिक परिणाम व्हायला लागला, तसं अनेकांनी लॉकडाऊनच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केल्याचं प्रा. बेर्का सांगतात.
लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी शेकडो लोकांवर कारवाई केली, पण यासोबतच या धोरणांना लोकांचा मोठा पाठिंबाही मिळाला. 80% पेक्षा जास्त लोकांनी सरकारने उचललेल्या या पावलांना पाठिंबा दिल्याचं एका पाहणीत आढळून आलंय.
रोगाचा देशातून नायनाट झाला, पण हे टिकवता येईल का?
देशामध्ये गेल्या 17 दिवसांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन नसून सगळे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यांनी 8 जूनला जाहीर केलं. "आतापुरता आपण न्यूझीलंडमधून व्हायरसचा संसर्ग थांबवला असल्याची आम्हाला खात्री आहे."
लॉकडाऊन उठवण्यात आला आणि आय़ुष्य जवळपास नॉर्मल झालं, पण सोशल डिस्टंसिंग कायम राहिलं. देशाच्या सीमा परदेशी नागरिकांसाठी अजूनही बंद होत्या आणि त्या कधी खुल्या होतील याविषयी काहीही माहिती देण्यात आली नाही.
युकेमधून घरी परतलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आणि सीमा खुला असल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो, हे पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आठवड्याभरातच सिद्ध झालं.
या दोन्ही महिलांना क्वारंटाईन कालावधीच्या आधीच चाचणी न करता सोडण्यात आलं होतं आणि आजारी पडण्यापूर्वी त्यांनी देशात मोठा प्रवास केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अशा अनेक लोकांना क्वारंटाईन काळ पूर्ण होण्याआधीच योग्य चाचण्या न करता सोडून देण्यात आल्याचं नंतर उघडकीला आलं. हे यंत्रणेचं सपशेल अपयश होतं आणि यामुळे सरकारची धावपळ उडाल्याचं प्रा. बेर्का सांगतात.
या निष्काळजीपणामुळे रुग्णसंख्या अचानक वाढली नसली तरी यामुळे लोकांमध्ये संताप उमटला आणि 2 जुलैला आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी राजीनामा दिला. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत स्वतःच्या कुटुंबाला बीचवर नेल्यामुळे यापूर्वीच त्यांची पदावनती करण्यात आली होती.
एखाद्या लहान आणि दुर्गम देशासाठी आपल्या सीमा पूर्णपणे बंद करणं हे आर्थिकदृष्ट्या महाग ठरतं. सध्या देण्यात येत असलेल्या सबसिडीज फार काळ ठेवता येणार नाहीत आणि न्यूझीलंडला परत परदेशी पर्यटक आणि कामगारांची गरज भासेल.
जगापासून असे किती काळ आपण संबंध तोडून राहू शकतो याबाबत आता न्यूझीलंडने विचार करण्याची वेळ आली असल्याचं माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्यासह अनेकांनी बोलून दाखवलंय.
न्यूझीलंड आकाराने लहान असल्याने हे शक्य झालं का?
न्यूझीलंडची कमी लोकसंख्या आणि त्यांचं इतर देशांपासून दूर असणं याचा या प्रयत्नांत नक्कीच फायदा झाला. पण हे या यशामागचं एकमेव कारण नसल्याचं प्रा. बेर्का सांगतात.
"सक्षम सरकार आणि यंत्रणा असणाऱ्या कोणत्याही देशात ही धोरणं काम करतील," ते सांगतात. व्हिएतनाम, तैवान आणि चीनचं उदाहरण ते देतात.
"युके आणि त्यासोबतच युरोप आणि उत्तर अमेरिकेचा विचार करून मी चकित होतो. कारण नेहमी या देशांकडे आम्ही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचं चांगलं उदाहरण म्हणून पाहतो," ते म्हणतात.
या देशांऐवजी आशियातल्या तैवानसारख्या लहान देशांनी या रोगावर मात करण्यात चांगलं यश मिळवत नवीन वस्तुपाठ घातले.
"लांबून या सगळ्याकडे पाहताना असं का व्हावं हे कोडं आहे, कारण युकेकडे मोठं वैज्ञानिक ज्ञान आणि आरोग्य व्यवस्था आहे. त्यांनी पुराव्यांचा अभ्यास करत न्यूझीलंडसारखा पॅटर्न तयार केलेला नाही."
आपली धोरणं ही विज्ञानावर आधारित असल्याचं म्हणत युके सरकारने याआधी आपल्या कोरोना व्हायरससाठीच्या धोरणांची पाठराखण केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








