भारत-चीन सीमा वाद: चिनी वस्तूंबाबत चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यात किती तथ्य?

चिदंबरम

फोटो स्रोत, AFP

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याने चीनला काहीच फरक पडणार नसल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले.

"आपण अधिकाधिक स्वावलंबी व्हायला हवं. मात्र, जगापासून वेगळं राहू शकत नाहीत. जागतिक पुरवठा साखळीचे आपण कायमच भाग राहिलं पाहिजे आणि चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकायला नको. भारतात चीनचा किती व्यापार आहे? त्यांच्या अर्थव्यस्थेचा अगदी छोटासा भाग. त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकल्यानं त्यांना फारसा फरक पडणार नाही," असं पी. चिदंबरम म्हणाले.

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. अनेकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. मात्र, खरंच अशा बहिष्कारानं चीनचं नुकसान होईल का? याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.

इंग्रजांविरुद्धच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान परदेशी मालावर बहिष्कार आणि परदेशी मालाची होळी हे महत्त्वाचं अस्त्रं ठरलं होतं.

स्वदेशीचा, खादीचा पुरस्कार करणाऱ्या या आंदोलनाच्या धर्तीवर पुन्हा एकदा एक मोहीम सध्या सुरू केलेली आहे.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान सीमेवर झालेल्या झटापटीदरम्यान 20 सैनिक मारले गेल्यानंतर चिनी मालावर आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनांनी पुन्हा एकदा जोर धरलाय.

कोरोना व्हायरस चीनमुळे जगभरात पसरल्याचं सांगत काही दिवसांपूर्वीही असं आवाहन केलं होतं.

सोनम वांगचुक यांनी चिनी वस्तूंसोबतच चिनी मोबाईल अॅप्सवरही बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. सोशल मीडियावर हा संदेश चांगलाच व्हायरल झाला. याला प्रतिसाद देत अनेकांनी टिकटॉकसह इतर अॅप्सही अन-इन्स्टॉल केली.

पण खरंच टिकटॉक किंवा इतर काही अॅप्स अनइन्स्टॉल केल्याने चीनचं नुकसान होईल का?

भारत - चीन आणि टिकटॉक

व्हिडिओ शेअरिंग साईट असणारं टिकटॉक हे अॅप चीनच्या बाईटडान्स कंपनीचं आहे. सगळ्यात मोठं मूल्य असणाऱ्या या 'अनलिस्टेड' टेक्नॉलॉजी स्टार्टअपचं मूल्य 90 ते 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सदरम्यान आहे.

पण आधी टिकटॉकला फटका बसला वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा. जगभरातल्या 'अँटी चायना' भावनांमुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये टिकटॉकच्या डाऊनलोड्समध्ये घट झाल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने एका वृत्तात म्हटलंय. एप्रिल महिन्यामध्ये टिकटॉकच्या डाऊनलोड्समध्ये 34% घट झाली. तर मे महिन्यात 28% घट झाल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलंय.

टिकटॉकच्या निगेटिव्ह पब्लिसिटीमध्ये भर पडली ते युट्यूब आणि टिकटॉकवरच्या कन्टेन्ट क्रिएटर्समधल्या वादाने. टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ असतात असं म्हणत अनेकांनी गुगल प्ले स्टोअरमध्ये टिकटॉकला 1 स्टार रेटिंग दिलं आणि परिणामी टिकटॉकचं रँकिंग घसरलं.

यामध्ये आता चीनच्या सीमेवरच्या कारवायांमुळे टिकटॉक अन-इन्स्टॉल करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरतेय.

टिकटॉक

फोटो स्रोत, TIKTOK

मार्केटिंग आणि ब्रँड्स जाहिरातीसाठी टिकटॉकला प्राधान्य देतात कारण एकट्या भारतात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा जास्त मंथली युजर्स आहेत. जगभरात 2019 वर्षामध्ये टिकटॉक 32.3 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं. यातले 44% डाऊनलोड्स भारतात झाले.

टिकटॉक आणि इतर चिनी अॅप्स काढून टाकण्यासाठी आलेल्या 'रिमूव्ह चायना अॅप्स' या अॅपचीही जोरदार चर्चा झाली. अनेकांनी या अॅपचा वापर करत आपल्या फोनमधली चिनी अॅप्स काढून टाकली. पण काही दिवसांनी या अॅपवर कारवाई करत प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्यात आलं.

टिकटॉकसोबतच बिगो, व्हिगो, कॅमस्कॅनर, हॅलो, शेअर इट, पबजी, युसी ब्राऊजर, ब्युटीप्लस ही अॅप्सदेखील प्रसिद्ध आहेत.

पण अशाप्रकारे अॅप्स काढून टाकत चीनचा 'बदला' घेणं शक्य आहे का?

शिवाय आपल्या ज्या मोबाईल फोन्सवर ही सगळी अॅप्स असतात त्यापैकी बहुतेक मोबाईल कंपन्या चीनमधल्या आहेत.

चीनी वस्तू

फोटो स्रोत, Getty Images

वनप्लस, शाओमी, ओपो, विवो हे मोबाईलचे आघाडीचे ब्रँड चीनमधले आहेत.

तर अगदी अॅपलसकट इतर अनेक कंपन्यांच्या मोबाईलचे भाग हे चीनमध्ये बनलेले असतात. अॅपलच्या फोन्सवर 'डिझाईन्ड इन कॅलिफोर्निया, असेंबल्ड इन चायना' असं लिहीलेलं असतं.

मग या अशावेळी चिनी फोन्सचा वापर पूर्णपणे थांबवणं शक्य आहे का?

मोबाईल फोन क्षेत्रामध्ये चिनी बनावटीचे फोन आल्यानंतर फोन्सच्या किंमतींची गणितं बदलली. अद्ययावत तंत्रज्ञान, कॅमेरे असणारे स्मार्टफोन सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्याने सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी मोडीत निघाली आणि याचा परिणाम त्यांच्या बाजारपेठेतल्या हिश्श्यावरही झाला. त्यामुळे सध्याच्या घडीला चीनमध्ये तयार झालेले वा मूळ कंपनी चिनी असणारे, पण भारतात उत्पादन करणारे मोबाईल फोन्स बाजारपेठेतून वगळणं शक्य नाही.

अॅप्सबद्दल बोलायचं झालं तर भारतीय मोबाईल युजर्सची बाजारपेठ ही या कंपन्यांसाठी नक्कीच मोठी आहे, पण ही या कंपन्यांसाठीची एकमेव बाजारपेठ नाही. शिवाय टिकटॉकसारखी अॅप्स वापरणारा बहुसंख्य वर्ग आणि या अॅप्सवर बहिष्कार घालणारा वर्ग वेगळा असल्याने त्याचाही कंपनीवर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटत नाही.

इतर क्षेत्रांचं काय?

चीनने भारतात 6 अब्ज डॉलरच्या आसपास परकीय गुंतवणूक केली आहे. तर पाकिस्तानात तब्बल 30 अब्ज डॉलर्सची त्यांची परकीय गुंतवणूक आहे. मात्र, भारतातून ते अधिकचे फायदे लाटत असल्याचं मानलं जातं.

मुंबईतल्या गेटवे हाऊस या परराष्ट्र विषयक जाणकारांच्या संस्थेने ई-कॉमर्स, फिनटेक, मिडीया/सोशल मीडिया, अॅग्रेगेशन सर्विसेस आणि काही लॉजिस्टिक कंपन्यांचा समावेश असणाऱ्या 75 अशा कंपन्यांची यादी तयार केली आहे ज्यात चीनने गुंतवणूक केली आहे. इतकंच नाही तर गेटवे हाऊसच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतातल्या 30 युनिकॉर्न कंपन्यांपैकी 18 कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक असल्याचं म्हटलं आहे.

मोदी आणि जिनपिंग

फोटो स्रोत, AFP CONTRIBUTOR

भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या अनेक औषधांसाठीचा कच्चा माल म्हणजेच अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट - APIची आयात चीनकडून केली जाते. यामध्ये अगदी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आणि पॅरासिटमॉलचाही समावेश आहे.

भारत आणि चीनमधला द्विपक्षीय व्यापारी करार आणि त्यातलं अर्थकारण याविषयीचा तपशील तुम्ही इथे वाचू शकता.

DNA या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2018-19मध्ये भारताने चीनला 1.17लाख कोटींची निर्यात केली. तर चीनकडून 4.92 लाख कोटींची आयात करण्यात आली. शिवाय भारतातल्या विविध उद्योग क्षेत्रांतल्या चीनच्या वाट्याविषयीचा तपशीलही या लेखात देण्यात आलेला.

यानुसार भारतातल्या स्मार्टफोन क्षेत्रात चिनी उत्पादनांचा वाटा 72% आहे, तर टेलिकॉम इक्विपमेंट क्षेत्रात 25%, टेलिव्हिजन मार्केटमधल्या स्मार्ट टेलिव्हिजन बाजारपेठेत 42-45%, होम अप्लायन्सेस 10-12%, ऑटो कम्पोनंट्स - 26% तर इंटरनेट अॅप्स क्षेत्रात - 66% वाटा आहे.

प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग

भारतात वापरात असणाऱ्या अनेक वस्तू, यंत्रं, उत्पादनं, सेवा ही थेट चीनकडून येतातच. पण त्यासोबत अनेक बाबतींमध्ये अप्रत्यक्ष आयातही होते. उदाहरणार्थ भारत अमेरिकन कंपनीकडून आयात करत असलेल्या एखाद्या उत्पादनात त्या कंपनीने चीनच्या कंपनीनने तयार करून पुरवलेले सुटे भाग वापरले असतील, तर हा वापर कसा टाळणार?

उदाहरणार्थ - आयफोन तयार करणारी अॅपल कंपनी अमेरिकन आहे. या फोनचं डिझायनिंग कॅलिफोर्नियात होतं. पण सुटे भाग चीनमध्ये बनतात आणि फोनही तिथेच असेंबल होतो.

'बॉयकॉट चायना' आवाहन

चीनसोबत सीमेवर झालेल्या झटापटीदरम्यान 20 भारतीय जवान मारले गेल्यानंतर कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज म्हणजेच CII ने बहिष्कार घालण्यासाठीच्या 500 उत्पादनांची यादी जाहीर केलीय. या वस्तूंवर बहिष्कार घालावा असं आवाहन CII ने ट्रेडर्सना केलंय.

तर चिनी कंपन्यांसोबतच्या डील्स आणि चीनमध्ये तयार करण्यात येणारी उपकरणं 'बॅन' करावीत असं दूरसंचार मंत्रालयाने BSNL, MTNL आणि खासगी कंपन्यांना सांगितलंय.

चिनी कंपन्यांची सरकारी कंत्राटं रद्द करण्यात यावीत अशी मागणी स्वदेशी जागरण मंचानेही केली होतं.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग

फोटो स्रोत, Getty Images

या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'बॉयकॉट चायना' विषयी बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी CNBC TV -18 ला मुलाखत दिली.

चीनशिवाय उद्योग करण्याचा विचारही आपण करू शकतो का, यावर ते म्हणाले, "गेल्यावर्षी बजाजने थेट चीनकडून साधारण 600 कोटींच्या सुट्या भागांची आयात केली. आमच्या एकूण मटेरियल कॉस्टच्या हे प्रमाण 3 -4% आहे. आमचे काही प्रमुख सप्लायर्सही चीनकडून माल मागवतात. एकंदर आम्ही सुमारे 1000 कोटींची आयात चीनकडून करतो.

"गेल्या अनेक काळापासून आम्ही ही आयात करतो. यामध्ये मोटरसायकलमध्ये वापरल्या जाणाऱ्या अलॉय व्हील्सचं प्रमाण जास्त आहे. हे सप्लायर्स आमचे मित्र आहेत. त्यांनी गेली 15 वर्षं आम्हाला हे सुटे भाग पुरवताना त्यात भरपूर वेळ, पैसा आणि श्रमाची गुंतवणूक केली आहे. मग आता अचानक त्यांच्यासोबतचं नातं तोडायचं का? कंपनी किंवा देश म्हणून हे योग्य आहे का? चीनकडून आम्ही सुटे भाग घेतो कारण ते जास्त सोयीचं आहे.

देशातूनच भाग घेताना जमीन, मजुरी, नियम, वाहतूक, वीजपुरवठा याच्या अडचणी येतात. यातुलनेत चीनकडून उत्पादनं आयात करणं सोपं असतं.

आम्ही जरी चीनकडून 1000 कोटींचा माल आयात करताना दिसत असलो तरी आमची वर्षाची निर्यात 15,000 कोटींची आहे. या इम्पोर्टमुळे आम्ही 'कॉम्पिटिटिव्ह' ठरतो. शिवाय जेव्हा तुम्ही एक ग्लोबल कंपनी असता तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही जगभर फक्त विक्री करायची, असा होत नाही. याचा अर्थ असाही होतो की तुम्ही जगाभरातून गोष्टी 'सोर्स' कराल."

तज्ज्ञ म्हणतात...

भारताचीही चीनला गरज असल्याचं काही जाणकारांना वाटतं. दिल्लीतल्या सोसायटी फॉर पॉलिसी रिसर्च अँड एम्पॉवरमेंटच्या डॉ. मेहजबीन बानू यांच्या मते चीन भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

त्या म्हणतात, "चीनकडून होणाऱ्या आयातीवर आपण अवलंबून आहोत, यात दुमत नाही. त्याचप्रमाणे, भारतीय बाजाराची प्रचंड क्षमता बघता चीन भारतासारख्या मोठ्या मार्केटपासून दूर राहू शकत नाही."

कोरोना
लाईन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)