भारत-चीन सीमा तणाव: सीमेवर दगड आणि काठ्यांनी का झाला संघर्ष?

फोटो स्रोत, Reuters
- Author, शौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गलवान खोऱ्यात चीनविरोधात झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काठ्या आणि दगडाने संघर्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष का झाला याचा हे विश्लेषण.
"हे अत्यंत वाईट आहे, खूपच वाईट," असं मत सुरक्षा विश्लेषक विपिन नारंग यांनी भारत-चीन सैनिकांमध्ये लडाख येथे सोमवारी रात्री झालेल्या झटापटीविषयी आपलं मत मांडलं.
जगातल्या सर्वांत लांब सीमारेषेवर गेल्या पाच दशकांपासून सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांचा बळी गेला. तर दोन्ही देशांचे सैनिक मारले गेल्याचं भारताचं म्हणणंय.
"एकदा संघर्ष सुरू झाला तर शांतता प्रस्थापित करणं दोन्ही बाजूंसाठी अडचणीचं ठरतं. आता जनतेच्या दबावानुसार निर्णय प्रक्रिया पुढे जाते," असं मॅसॅच्युसेट्स इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संरक्षण अभ्यासाचे प्राध्यापक डॉ. नारंग यांचं म्हणणंय. "या सीमेवरील दबावाची व्याप्तीचं प्रमाण अभूतपूर्व वाढलंय."
तब्बल 3,440 किलोमीटर लांबीची अयोग्य पद्धतीनं आखलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांना संघर्षाचा इतिहास आहे. सीमेवर पेट्रोलिंग करत असताना दोन्हीकडील सैनिकांकडून वरेचेवर कुरबुरी सुरू असतात.
मात्र गेल्या चार दशकांपासून दोन्ही देशांच्या सैनिकांकडून कधीही गोळीबार झालेला नाही. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला तणावानं अचानक हिंसक संघर्षाचं रूप घेतल्यानं अनेकांना धक्का बसलाय.
"हा टोकाचा संघर्ष आहे," द इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाचे सुरक्षा संपादक शशांक जोशी सांगत होते, "गेल्या 45 वर्षांत एकदाही गोळी झाडल्या गेल्या नव्हत्या. आता एका रात्रीत दगडफेक आणि झटापटीमुळे 20 जवानांचा मृत्यू झाला." या घटनेमुळे भारत चीन सीमेवर तणावाची परिस्थिती उद्भवली. दोन्ही देशांमध्ये वादाला सुरू झाली. पण बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या नाहीत.
मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चीनी सैनिकांनी टेंट्स उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला. भारताचे आघाडीचे सुरक्षा विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 स्केअर किमीपर्यंत ताबा घेतला.

फोटो स्रोत, PIB
चीनने आधीच 38,000 स्क्वेअर किमी इतका (जवळपास 14,700 सेक्वअर माईल्स) भारताचा भूभाग ताब्यात घेतल्याचा दावा भारताकडून करण्यात आलाय. 2008 मध्ये पुन्हा कार्यरत झालेल्या उंच ठिकाणावर असलेल्या वायू दलाच्या बेसला जोडणारा काही शेकडो किमी लांब रस्ता भारताकडून बांधण्यात आला. त्यानंतर या घडामोडींना वेग आला.
'काही वर्षातल्या अत्यंत गंभीर संकटांपैकी एक' असं सोमवारी रात्री झालेल्या संघर्षाचं वर्णन करण्यात आलंय. अद्याप या संघर्षाचे तपशील अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाहीत. गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष सीमा रेषेचं उल्लंघन केल्याचा आरोप भारत आणि चीन दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांनी सामरिक आणि राजनैतिक पातळीवर 6 जूनला दोघांच्या वरिष्ठ कमांडर्समध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं भारतानं सांगितलं.
तणाव कमी करण्यावर दोन्ही बाजूंची सहमती झाली. आणि त्यानंतर वरिष्ठ कमांडर्समध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्याचंही भारतीय परराष्ट्र खात्यानं म्हटलंय.
चीननं जैसे थे परिस्थितीचं एकतर्फी उल्लंघन केल्यामुळे दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेल्याचं भारतानं सांगितलंय. तर दुसरीकडे भारतीय. सैनिकांनीच दोनदा सीमेचं उल्लंघन केलं असून चीनच्या सैनिकांवर हल्ला केल्याचा दावा चीननं केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमधील सध्याचा संघर्ष अतिशय गंभीर असून 2017 ला डोकलाममधून या संघर्षाला सुरूवात झाली असून तो पुढे सुरू राहण्याची शक्यता असल्याचं, डिप्लोमॅट मॅगेझिनचे वरिष्ठ संपादक अंकित पांडा यांनी सांगितलंय.
भारत-चीन आणि भूतानच्या संयुक्त सीमेवर चीननं 2017 मध्ये रस्त्याचं काम सुरू केल्यामुळे 73 दिवस संघर्ष चालला होता.
"आतापर्यंतचा अनुभव पाहता यावेळी चीनचं वागणं फारच वेगळ्या पद्धतीचं आहे," असं माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीन संबंधांचे अभ्यासक शिवशंकर मेनन यांनी सांगितलं.
"जे काही आपण पाहिलं, ते म्हणजे अनेक घडामोडी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीननं अनेक भूभागांवर मिळवलेला ताबा. जो यापूर्वी त्यांनी कधीही मिळवलेला नव्हता. आणि हीच मोठी चिंतेची बाब आहे. कारण यापूर्वी चीन असा कधी वागला नव्हता," मेमन यांनी करण थापर यांना द वायरसाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
चीननं उचलेल्या पावलाचे अन्वयार्थ
लडाखमध्ये सीमारेषेलगत पायाभूत सुविधांच्या उभारणीचा भारताचा डावपेच चीनच्या जिव्हारी लागला. कोरोनाच्या संकटामुळे भारतीय लष्करानं मार्चमध्ये केलेल्या दिरंगाईमुळे चीनला नामी संधी मिळाली. "मात्र केवळ हे एकच कारण असू शकत नाही," असंही जोशींनी नमूद केलंय.
"हे रस्त्याबाबतच आहे का? की कलम 370 रद्द केल्यामुळे आहे का? ही व्यापक आक्रमकता आहे का? आपल्याला माहीत नाही," असं नारंग यांनी सांगितलं. "पण हे तणावपूर्ण आहे आणि हे अजून संपलेलं नाही."
देशांतर्गत आर्थिक अडचणींमुळे चीननं प्रखर राष्ट्रवादाचं धोरण अवंलबलं असल्याचं चीनमध्ये राजदूत म्हणून काम पाहिलेल्या मेनन यांचं म्हणणंय. "पित सागरात चीनच्या वागण्यातून तुम्हाला हे दिसतं. तैवानबाबतचं धोरण, हाँगकाँगला विश्वासात न घेता कायद्याला मंजुरी, भारतीय सीमारेषेवरील आक्रमकता आणि ऑस्ट्रेलियासोबचे टेरीफ युद्धातूनही हे दिसून येतं."
सीमारेषेवरील संघर्षाच्या ठिकाणाहून सैनिक हटवण्यात आल्याचं भारतानं मंगळवारी संध्याकाळी सांगितलं. सुरूवातीच्या वृत्तांनुसार दोन्ही देशांनी आपापल्या औपचारिक लष्कराच्या माध्यमातून संवाद साधत तणाव वाढणार नाही याची खबरदारी घेतली. "सध्याच्या परिस्थितीत भारताकडे असलेल्या मर्यादित शस्त्रांचा पर्याय ही भारतासाठी चांगली बातमी ठरली," असं पांडांचं म्हणणंय.
सोमवारी रात्री झालेल्या झटापटीचे व्यापक आणि दीर्घकालीन राजनैतिक परिणाम होतील असं जोशी यांनी सांगितलंय.
गेल्या 10 वर्षांपासून भारत-चीनमधील थोडा तणाव असला तरी संबंध मात्र स्थिर होते, असंही त्यांनी सांगितलं. 1998 ते 2012 पर्यंत भारत आणि चीनमधील द्वीपक्षीय व्यापारी संबंध 67 पटीनं वृद्धींगत झाले आणि चीन हा भारताचा सर्वात मोठ्या व्यापारी भागिदारांपैकी एक बनला. मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थ्यांनी चीनमधल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी कवायतीही झाल्या.
"2018 मधील वुहान परिषदेतले प्रेमाचे संबंध वाहून गेले असून आता दोन्ही देश नव्या अविश्वासाच्या आणि विरोधाच्या पर्वात दाखल झाले आहेत," असं जोशींचं म्हणणंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









