'सामना'मध्ये संजय राऊतांनी माझ्याबद्दल लिहिलं, ते खरं नव्हतं- सोनू सूद #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं - सोनू सूद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहता असल्याचं सांगितलं आहे. तसंच संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं असंही त्यानं म्हटलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदनं असं मत मांडलं आहे.

"ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही," असं सोनू सूदनं म्हटलं आहे.

सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना सोनू सूदनं म्हटलं, "या संपूर्ण वादाची मला काहीच माहिती नव्हती. लोकांनी मला फोन करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अस्मल शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का, असं त्यांनी विचारलं. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का,असंही विचारलं. यावर मी भेटण्यासाठी सहमती दर्शवली".

"संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं ते खरं नव्हतं. ठाकरेंनाही हे योग्य नसल्याचं माहिती होतं. ते मला फार आधीपासून ओळखतात. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल एक समज निर्माण केला होता आणि लिहिलं होतं," असं सोनू सूदनं सांगितलं आहे.

2. भारतात चायनीज फूडवर बंदी घाला - रामदास आठवले

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू, अशी ताकद भारतीय सैन्यात आहे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

चीन धोकेबाज राष्ट्र आहे. चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घाला, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

लडाख येथील गलवान भागात चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे.

3. आता ग्रामपंचायत उपसरपंचांनाही मानधन - हसन मुश्रीफ

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांसोबत आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होतं.

आता सरपंचांसोबतच उपसरपंचांनाही मानधन सुरू करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये, तर 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये आणि 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

4. भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारत 2021-22 पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च संस्थेचा अस्थायी सदस्य असेल.

193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या 75व्या सत्राचे अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि आर्थिक-सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड केली. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वेची सुरक्षा परिषदेत निवड झाली आहे. कॅनडाला मात्र यामध्ये स्थान मिळालेलं नाही. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

भारत आपल्या कार्यकाळात बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देण्याचं काम करेल, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली आहे.

"192 पैकी 184 मतं भारताच्या बाजूनं पडली. 2021-22 साठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड केल्याबद्दल मला अतिशय आनंदी झाला आहे. आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला. संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे," असं तिरुमूर्ती म्हणाले.

5. सलमान खान, करण जोहर यांच्याविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साली आणि एकता कपूर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर येथील वकील सुधीर कुमार ओझा बिहारमधील मुझफ्फरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. यासंदर्भात ANIशी बोलताना सुधीर यांनी म्हटलं, "सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले."

सुधीर यांनी आठ कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे. त्यामध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)