कोरोना महाराष्ट्र: कोव्हिडच्या रुग्णांना नेमकी कोणती औषधं दिली जात आहेत?

    • Author, मयंक भागवत
    • Role, मुक्त पत्रकार

जगभरात कोरोनाच्या संसर्ग सुरुवात होऊन 8 महिने उलटून गेलेत पण अजून कोणतंही ठोस औषध किंवा लस सापडलेली नाही. पण असं असतानाही जगभरात लाखो कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे होऊन घरी गेलेत.

मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर कोरोनावर अजूनही औषध नाही, तर मग रुग्ण बरे कसे होतात? कोरोनाच्या रुग्णांवर नेमके काय उपचार केले जातायत? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही थेट कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीच बोललो.

कोरोनाच्या उपचाराबद्दल गेल्या काही महिन्यांत अनेक औषधांची नावं समोर आली आणि म्हणूनच उपचाराबद्दल बोलताना पहिल्यांदा समजून घेऊया की कोणकोणती औषधं सध्या कोरोनाच्या उपचारादरम्यान वापरली जातायत.

रेमडेसिव्हिर हे त्यातलंच एक नाव. आता महाराष्ट्र शासनानेही रेमडेसिव्हिरचे 10 हजार डोस मागवले आहेत.

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं, “रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार व्हावे यासाठी सरकारने रेमडेसिव्हीर औषधाचे 10 हजार डोस घेण्याचा निर्णय घेतलाय. हे अँटीव्हायरल औषध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सार्समध्ये या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. महाराष्ट्रात हे औषध क्रिटिकल रुग्णांना देण्यात येणार आहे.”

10 हजार डोसेससाठी 12 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचं आणि तो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंडाच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

जगभरातील डॉक्टर सध्या कोरोनाविरोधातील लढाईत रेमडेसिव्हिरचा वापर करतायत. काही दिवसांपूर्वी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये एका संशोधनातून असं समोर आलं होतं की, रेमडेसिव्हिर देण्यात आलेले रुग्ण इतरांच्या तुलनेत 11 दिवसांत बरे झाले.

टास्क फोर्सच्या गाईडलाइन्सनुसार उपचार

राज्यातल्या उपचारांबद्दल बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं की, “राज्यातले 80 टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत, रुग्णांचा रिकव्हरी रेट 43 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या रुग्णांवर आयसीएमआरच्या गाईडलाइन्स आणि महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या टास्क-फोर्स ने केलेल्या सूचनांप्रमाणे उपचार केले जात आहेत.”

मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी सांगतात, “आम्ही सरकारकडे मागणी करतोय. रेमडेसिव्हिर औषधाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. या औषधाचे रिझल्ट खूप चांगले आहेत. क्लिनिकल ट्रायलमध्ये रुग्णाच्या शरीरात व्हायरल लोड कमी झाल्याचं निदर्शनास आलंय, तर इन्फेक्टिव्हिटी कमी झाल्याचंही समोर आलंय. हे औषध भारतात तयार होवू लागलं तर लाखो लोकांना याचा फायदा होईल."

अॅंटिव्हायरल-अॅंटिबायोटिक्सचा वापर

रेमडेसिव्हिर काही एकच औषध नाहीये. कोरोनाची लक्षणं बरी करणाऱ्या अॅंटिव्हायरल आणि अॅंटिबायोटिक औषधांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातायत. मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी यांनी कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या औषधांबाबत सांगितलं की,

  • जर घसा दुखत असेल तर अॅझिथ्रोमायसिन
  • ताप असेल तर पॅरासिटमॉल
  • रुग्णांच्या वजनाप्रमाणे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचे डोस दिले जातायत.

हे सगळं खूप तांत्रिक वाटत असेल, पण हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की, आपल्याला किमान या औषधांच्या नावांची ओळख व्हावी.

कोव्हिडची नेमकी ट्रीटमेंट काय?

पहिल्या दिवशी दोन वेळा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन- 400 Mg च्या गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर 200 Mg दोन वेळा अशा 4 ते 9 दिवसांपर्यंत या गोळ्या दिल्या जातात.

त्याचबरोबर ऑसेल्टामिव्हिर हे औषध दिवसाला दोन वेळा दिलं जातं. असे पाच दिवस हे औषध घ्यावं लागतं. आयव्हरमॅक्टिन 12 Mg हे औषध दिवसातून दोन वेळा असे 2 दिवस दिलं जातं आणि डॉक्सिसायक्लिन 100 Mg दिवसातून दोन वेळा असे 5 दिवस दिलं जातं.

लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोणते उपचार?

महाराष्ट्रात जवळपास 80% रुग्ण असे आहेत ज्यांच्यात कोरोनाची बाधा झाल्याचं एकही लक्षण दिसत नाही. पण मग जर लक्षणच दिसत नसेल तर मग त्यांच्यावर उपाचर तर कसे करणार?

याबाबत बोलताना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार करणारे डॉ. दीपक मुंढे यांनी सांगितलं, “ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत त्यांना कोणतंही औषध देण्यात येत नाही. व्हिटॅमीन- सी आणि झिंकच्या गोळ्या देऊन रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली तर, रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.अत्यंत सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर लक्षणं पाहून उपचार केले जातात. घसा दुखत असेल तरत्यावर औषध आणि ताप असेल तर ताप कमी करण्यासाठीच्या गोळ्या दिल्या जातात."

सौम्य लक्षणं असलेल्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे पाच दिवसांचा डोस दिला जातो. शरीरात ऑक्सिजनची मात्रा किती आहे हे जाणून घेण्यासाठी ऑक्सिमीटरने त्यांची तपासणी केली जाते.

6 मिनिटांची ‘वॉक टेस्ट’ म्हणजे चालण्याची चाचणी घेतली जाते. आणि त्यानंतरही जर रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं जातं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाचा QT interval जास्त असेल तर अॅझिथ्रोमायसिन आणि हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येत नाही. QT Interval हा आपल्या हृदयाच्या काही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मोजत असतो. अशा परिस्थितीत अनेक रुग्णालयात संशोधनासाठी डॉक्सिसायक्लिन 5 दिवस आणि आयव्हरमॅक्टिन 3 दिवस असा डोस दिला जातोय. तर, काही रुग्णालयं कंपॅशनेट ग्राउंडवर फॅविपिराव्हिर किंवा रेमडेसिव्हिर सारखी औषधं रुग्णांना देतात.

ही अँटीव्हायरल औषधं इतर रोगांवर गुणकारी असल्याचं पूर्वी सिद्ध झालं होतं. कोव्हिडच्या काही केसेसमध्ये त्यांच्यामुळे रुग्णांना आराम मिळाल्याचंही दिसून आलंय. पण अजूनही ती कोव्हिडचा इलाज आहेत असं सिद्ध झालेलं नाही. जगभरात अशा वेगवेगळ्या औषधांचे रुग्णांवर प्रयोग सुरू आहेत.

खरं तर कोरोनामधये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मृत्यूचा धोकाच नाही. राज्य सरकारने नेमलेल्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशींच्या मते राज्यातील कोरोनाच्या मृत्यूमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, मधुमेह आणि हृदयविकारानं आजारी असलेल्यांचा समावेश आहे. पण लक्षणं नसलेल्या आणि इतर कोणताही आजार नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना शक्य असल्यास होम क्वॉरंटाईन राहण्याची शिफारस करण्यात येते.

इतर आजार असलेल्यांवर काय उपचार?

को-मॉर्बिडिटी असणाऱ्या म्हणजे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार यांच्यासारख्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या कोव्हिड रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यांच्या शरीरात व्हायरल लोड मोठ्या प्रमाणावर असतो. अशा रुग्णांवर उपचारांसाठी अँटी रेट्रोव्हायरल औषधं वापरण्यात येतायत.

डॉ. गौतम भन्साळी यांच्या माहितीनुसार, एचआयव्ही रुग्णांना देण्यात येणारं लुपिनाव्हिर, ब्रॉड स्पेक्ट्रम अॅंटी-बायोटीक आणि टॅमी-फ्लू अशा कॉम्बिनेशचा वापर उपचारांसाठी केला जातो.

गरोदर महिला आणि लहान मुलांवर उपचार

इतर आजार असलेल्यांप्रमाणेच गरोदर महिला आणि लहान मुलांसाठीही वेगळी उपचार पद्धती आहे. कोव्हिडची लागण झालेल्या गरोदर महिलांवर कशा प्रकारचे उपचार केले जातात याबद्दल मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड म्हणतात, “कोरोनाग्रस्त गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना हाय-प्रोटीन डाएट दिलं जातं. व्हिटॅमिन-सी, झिंक आणि व्हिटॅमिन-डी ची औषधं दिली जातात. जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल."

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आत्तापर्यंत 275 कोरोनाबाधित गरोदर महिलांची प्रसूती करण्यात आलीये. या महिलांनी 278 बाळांना जन्म दिलाय.

नवजात मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय उपचार केले जातात याबाबत आम्ही नायर रुग्णालयाच्या नवजात अर्भक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुक्ष्मा मलिक यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित गरोदर महिलेपासून जन्माला येणाऱ्या मुलाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही. पण, जन्मानंतर इतर काही कारणांमुळे 11 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या मुलांवर योग्य उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलाय.

“लहान बाळं आणि कोरोनाबाधित मुलांवर त्यांना दिसून येणाऱ्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डायरिया अशी लक्षणं दिसू शकतात. त्याप्रमाणे त्यांना औषधं दिली जातात. तापासाठी पॅरासिटमॉल किंवा अँटीबायोटिकच्या माध्यमातून उपचार केले जातात. तर, न्यूमोनियासारखी लक्षणं दिसून आल्यास टॅमी-फ्लू आणि इतर अॅंटी बायोटिक्सच्या माध्यमातून उपचार होतात,” असं डॉ. मलिक यांनी सांगितलं.

कोरोनाग्रस्त कॅन्सर रुग्णांवरचे उपचार

अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. काही रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.

नानावटी रुग्णालयाचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आशिष जोशींनी सांगितलं, की उपलब्ध माहितीनुसार कॅन्सर आणि कोरोनामुळे जगभरात 13 टक्के रुग्णांचा मृत्यू झालाय.

“कॅन्सरग्रस्त रुग्णांना तीन भागात विभागलं जातं. पूर्णत: बरे झालेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना रुग्णालयात फॉलो-अपसाठी शक्यतो कमीत-कमी येण्यासाठी सांगितलं जातं. एखाद्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल आणि किमोथेरपी सुरू असेल तर, किमोथेरपी कोरोना बरा होईपर्यंत पुढे ढकलली जाते. कॅन्सरग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे खास लक्ष दिलं जातं,” असं डॉ. जोशी म्हणाले.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर वेगवेगळे देश वेगवेगळे उपचार करून पाहतायत. हे सगळे उपचार लक्षणांवर आधारित आहेत. अजूनतरी कोरोना व्हायरसवर रामबाण असा इलाज सापडलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सातत्याने खबरदारी घ्यायला आणि मुळात संसर्ग होऊच नये यासाठी प्रयत्न करायला सांगतायत. त्यामुळे खबरदारीचे उपाय करणं ही आपली जबाबदारी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)