You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाग्रस्त आईचं दूधही बाळासाठी सुरक्षित-WHO
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कोरोना पॉझिटिव्ह मातांनी बाळांना स्तनपान करणं सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
जिनिव्हामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, की जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत संशोधन केलं आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, स्तनपानातून विषाणूचा संसर्ग होण्याच्या धोक्यापेक्षाही स्तनपानातून बाळाला होणारे फायदे जास्त आहेत.
डॉ. ट्रेडोस यांनी म्हटलं, "प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कोव्हिड-19 आजाराचा धोका कमी असल्याचं आपल्याला माहिती आहे. मात्र, इतर अनेक असे आजार आहेत ज्यांचा बालकांना अधिक धोका असतो. स्तनपानामुळे असे आजार होत नाहीत. सध्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जागतिक आरोग्य संघटना हे सांगू शकते की, कोरोना विषाणू संसर्गापेक्षा स्तनपानातून मिळणारे फायदे जास्त आहेत."
ते पुढे म्हणाले, "ज्या मातांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे किंवा ज्यांना लागण झाली आहे, अशा मातांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. आईची प्रकृती गंभीर नसेल तर बाळाला आईपासून दूर ठेवू नये."
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
जागतिक आरोग्य संघटनेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयक सल्लागार डॉ. अंशू बॅनर्जींनी सांगितलं, "आतापर्यंत आम्हाला आईच्या दुधात म्हणजे ब्रेस्टमिल्कमध्ये सक्रीय विषाणू आढळलेला नाही. अनेक केसेसमध्ये या दुधात विषाणूच्या आरएनएचे तुकडे आढळले आहेत. मात्र, सक्रीय विषाणू सापडलेला नाही. त्यामुळे स्तनपानातून आईमुळे बाळाला कोरोनाची लागण होईल, असं सिद्ध होऊ शकलेलं नाही."
आईचं दूधच सर्वोत्तम
अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) यांचं म्हणणं आहे की, नवजात बालकासाठी आईचं दूधच सर्वोत्तम आहार आहे.
आईच्या दुधातून बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, अशी कुठलीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. आतापर्यंत जो काही डेटा मिळाला आहे, त्यानुसार अशाप्रकारे कोरोनाचा संसर्ग होत नाही.
आई कोरोनाग्रस्त असल्यास आपल्यापासून बाळाला या आजाराची लागण होऊ नये, यासाठी आईने वारंवार हात धुवावे आणि चेहऱ्यावर मास्क लावावा, असा सल्लाही सीडीसीने दिला आहे. याच मुद्द्यावर ब्रिटनमधली NHS ही राष्ट्रीय आरोग्य सेवाही जागतिक आरोग्य संघटनेच्या मताशी सहमत आहे.
या संस्थेनुसारही आईच्या दुधातून बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे कुठलेच पुरावे अजूनतरी सापडलेले नाहीत.
मात्र, स्तनपान करताना बाळ आईच्या खूप जवळ असतं. या जवळिकीमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाग्रस्त किंवा संशयित कोरोनाग्रस्त मातांनी बाळाला ब्रेस्टफिड कसं करावं, यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, असंही NHS ने म्हटलं आहे.
भारतातल्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदने (ICMR) कोरोनाग्रस्त मातांनी स्तनपान करण्याआधी हात स्वच्छ धुवावे आणि चेहरा मास्कने योग्यपद्धतीने झाकावा, असं सांगितलेलं आहे.
स्तनपानातून बाळाला कोरोना संक्रमण होत असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही, असं आयसीएमआरनेही म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)