You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनू सूद याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर अण्णा हजारे का ट्रेंड होतंय?
मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्यात्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सूद बसेसची व्यवस्था करतोय. त्याच्या या कामाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय.
रुबी शर्मा नावाच्या ट्विटर हँडलवरून सोनू सूदला विचारलं गेलं की, "सोनू सर, आपको नींद नहीं आती क्या?"
दिवसरात्र काम करणाऱ्या सोनू सूदचं कौतुक या ट्वीटमध्ये आहेच. त्याचबरोबर, सोनू सूदला 'मसिहा'म्हटलंय.
या ट्वीटला रिप्लाय देताना सोनू सूद म्हणतो, "एक बार सब घर पहुंच जाएं.. फिर आराम से सोएंगे.."
रात्रंदिवस बहुतांश ट्वीटना रिप्लाय देऊन घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना आशेचा किरण दाखवणाऱ्या सोनू सूदचं राजकारणीच नव्हे तर कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील नामवंतांकडून कौतुक होतंय, माध्यमांनी त्याच्या या कामावर आधारित 'स्पेशल रिपोर्ट्स'ची रीघ लागलीय, शेकडो मीम्सही तयार झालेत.
असं सगळं सुरू असतानाच आता मात्र सोनूकडे काहीजण शंकेच्या चष्म्यातून पाहू लागलेत. असं काय झालं की सोशल मीडियावर काही जण सोनूची तुलना अण्णा हजारेंशी करत आहेत?
तर याची सुरुवात झाली ब्रुस व्हेन (Bruce Vain - @FeministBatman) या अकाऊंटने पोस्ट केलेल्या ट्विटर थ्रेडपासून. या ट्विटर थ्रेडमध्ये या युजरने काही राजकीय आणि सामाजिक धागेदोरे जोडून, सोनू सूदच्या कामाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत.
ब्रुस व्हेन या अकाऊंटवरून तीन-चार गंभीर आक्षेप घेतले गेलेत, जसे की :
1) स्थलांतरितांचं काम सरकारचं आहे. त्यावरून सरकारवर टीकाही होत असताना, भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोनू सूदचं कौतुक करत आहेत.
2) @vishals34171518 हा ट्विटर युजर स्वत: सोनू सूदसोबत बसमध्ये होता. हा युजर स्वत:ला स्थलांतरित मजूर म्हणवतो. मात्र त्याच्या ट्विटर बायोनुसार, तो यूपीच्या प्रयागराजमधील भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.
3) सोनू सूदचा मुंबई लोकलचा जुना पास अरविंद पांडे नामक ट्विटर युजरला कसा आणि कुठे सापडला? अरविंद स्वत:ला 'भाजप भक्त' म्हणवतो.
4) सोनू सूदच्या कोब्रो पोस्ट स्टिंगही उल्लेखही ब्रुस व्हेन ट्विटर हँडलवरून करण्यात आलाय.
2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोब्रा पोस्टनं काही सेलेब्रिटींना 'एक्स्पोज्ड' केल्याचा दावा केला होता. त्यात सोनू सूदही होता. त्यावेळी सोनू सूद मोदी सरकारच्या 'HumFitTohIndiaFit' या अभियानाचा सदिच्छादूतही होता. त्यावेळी सोनू सूदनं त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरून भाजपचा फायदा होईल, असा मजकूर टाकण्याची तयारी दर्शवली होती, असं कोब्रा पोस्टच्या त्या वृत्तात म्हटलं होतं.
त्यावेळी सोनू सूदने एक स्पष्टीकरण दिलं होतं की "अशा प्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या ब्रँड्सकडून आम्हाला येतच असतात. आणि जे दाखवण्यात आलं आहे, ते एडिटिंगमध्ये काटछाट करून चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय."
पण आज 'अण्णा हजारे' का ट्रेंड होतंय?
एकंदरच, या ब्रुस व्हेनचा दावा आहे की येत्या काही काळात सोनू सूद हा भाजपमध्ये प्रवेश करेल. ज्यांना या शंका मूर्खपणाच्या वाटतील त्यांच्यासाठी ब्रुस व्हेनने याच थ्रेडच्या शेवटी 'अण्णा हजारे', असा एक सूचक संदेश देण्यात आला आहे.
ब्रुस व्हेनच्या या तर्कांवर अभिनेता सोनू सूदनं अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. मात्र या ट्वीट थ्रेडनंतर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झालीय.
कुणी हे आरोप खोडून काढलेत, तर कुणी सोनू सूदला 'अण्णा हजारे' म्हणू लागलेत.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय राहणारे RTI कार्यकर्ते साकेत गोखले यांनीही सोनू सूदवर टीका केलीय. त्यांनी सोनू सूद महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटल्याचं ट्वीट रिट्वीट करत महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्य राजकारणाच्या अंगानं म्हटलंय, "महाराष्ट्राचे राज्यपाल देवेंद्र फडणवीसांचा पाठीराखे आहेत आणि हे सर्व महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कमजोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं मला सांगायला हवं की, आपण अण्णा हजार प्रकरणातून काहीच का शिकलो नाही?"
तर पत्रकार राजू परुळेकर यांनीही ट्वीट करून, साकेत गोखले यांच्याशी सहमती दर्शवली आणि 'सोनू सूद म्हणजे कमी अवधीचा अण्णा हजारे आहे', अशी टीका परुळेकरांनी केलीय.
स्तंभलेखक यश मेघवाल यांनीही उत्तर प्रदेश सरकारनं काँग्रेसपुरस्कृत बसेसना कशाप्रकारे परवानगी नाकारली, याची आठवण करून देत म्हटलंय की, "बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दोन हजार बस चालवण्याची इच्छा व्यक्त केली, प्रियंका गांधी यांनी एक हजार बस उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणल्या, तरी यातल्या कुणाला परवानगी दिली गेली नाही. मग सोनू सूदला दोन प्रश्न आहेत - 1) तुमच्या बसचा क्रमांक, विमा मागितला का? 2) एवढ्या सहजतेने यूपी सरकार कसं मानलं?"
असे बरेच प्रश्न सकाळपासून उपस्थित केले जात आहेत. कुणी टीका करतोय, कुणी शंका व्यक्त करतोय, तर कुणी सोनू सूदला 'अण्णा हजारे' म्हणतोय.
मात्र, फक्त आरोपच सुरू आहेत, असे नाही. अनेकजणांनी आतापर्यंत आणि आजही सोनू सूदच्या कामाचं कुठल्याही आडपडद्याविना कौतुकही केलंय.
सिनेसृष्टी, राजकारण, क्रीडाक्षेत्र इत्यादी विविध क्षेत्रातील नामवंतांनी सोशल मीडियावर सोनू सूदचं भरभरून कौतुक केलंय.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)