You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : टीव्हीवर जुन्याच मालिका पुन्हापुन्हा, ठप्प असलेलं शूटिंग सुरू होणार तरी कधी?
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात टेलिव्हिजन कलाकार मनमीत ग्रेवालनं आत्महत्या केल्याची बातमी आली…आर्थिक चणचणीमुळे मनमीतनं आत्महत्या केली होती. त्याचे पैसे निर्मात्यांकडे अडकले होते आणि लॉकडाऊनच्या काळात खर्च निभावून नेणं अवघड होत होतं.
या घटनेनंतर अभिनेत्री निया शर्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये आपल्या ओळखीतील अनेक कलाकारांचे पैसे निर्मात्यांकडे अडकले असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सर्वांनाच समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांचा संयम सुटत असल्याचं म्हटलं.
मनमीतची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहेच, पण त्यामुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली अस्वस्थताही समोर आली. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक म्हणजे टेलिव्हिजन इंडस्ट्री. कोरोनामुळे शूटिंग पूर्णपणे बंद आहे, ते कधी सुरू होईल याची निश्चित कल्पना अजूनतरी नाहीये. या परिस्थितीत कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट आणि मनोरंजन विश्वाशी सर्वांसमोरच अनिश्चिततेचं वातावरण आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढायला लागला आणि 19 मार्चपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. अगदी डबल शिफ्टमध्ये काम करून मालिकांचे नवीन एपिसोड तयार करण्यात आले. पण लॉकडाऊन वाढत गेला आणि हे बँक एपिसोड संपले…
आज कोणतंही हिंदी किंवा मराठी चॅनेल लावलं तरी त्यावर सगळ्या जुन्या मालिकाच पुन्हा पहायला मिळतात. पण असं किती दिवस निभावून नेणारं? आजच्या घडीला मनोरंजन ही लोकांची प्राथमिकता नाही हे मान्य केलं, तरी टेलिव्हिजनचा जो वाढलेला पसारा आहे, त्यावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे, हेही नाकारता येणार नाही.
म्हणूनच एकीकडे लांबलेला लॉकडाऊन आणि दुसरीकडे मनोरंजन विश्वाचं केंद्र असलेल्या मुंबईतच कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या यामध्ये या इंडस्ट्रीचं आर्थिक गणित कसं सांभाळायचं, हा प्रश्न घेऊन इंडियन ब्रॉडकास्टर्स फेडरेशननं शुक्रवारी (22 मे) टीव्ही निर्माते आणि ब्रॉडकास्टर्सच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एकता कपूर, एनपी सिंह, पुनीत गोयंका, के. माधवन, जेडी मजेठिया, नितीन वैद्य उपस्थित होते.
या बैठकीच्या चार दिवस आधी मराठी कलाकारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली होती. या बैठकीला आदेश बांदेकर, समीर विद्वांस, केदार शिंदे, सुबोध भावे, रवी जाधव, प्रशांत दामले, अतुल परचुरे, हेमंत ढोमे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, नितीन वैद्य असे मराठी इंडस्ट्रीमधले कलाकार उपस्थित होते.
दोन्ही बैठकींमधला सूर साधारण सारखाच होता…एक म्हणजे शूटिंग सुरू करण्याबाबतच्या शक्यतांचा विचार आणि दुसरं म्हणजे सुरक्षितपणे पोस्ट प्रोडक्शनची कामं सुरू करता येतील का, याचा अंदाज घेणं. आता यापुढे काम लांबत गेलं, तर खरंच तो आर्थिक फटका टेलिव्हिजन इंडस्ट्री सहन करू शकेल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ठप्प झालेलं शूटिंग आणि घसरणारा जाहिरातींचा ओघ असं दुहेरी आव्हान टीव्ही इंडस्ट्रीसमोर आहे.
त्याचबरोबर OTT प्लॅटफॉर्मची स्पर्धा, लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर शूटिंग करून अनेकांनी तयार केलेले व्हीडिओ यामुळे निर्माण झालेल्या पर्यायांमुळे टीव्ही इंडस्ट्री आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. त्यामुळेच टीव्ही इंडस्ट्रीची आर्थिक गणितं, कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून ही इंडस्ट्री कशी सावरणार आणि भविष्यात टीव्हीवरील कन्टेन्टचं चित्र बदलेलं का, या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
टीव्हीमधली आर्थिक उलाढाल नेमकी होते कशी?
टेलिव्हिजनचे आर्थिक व्यवहार हे पूर्णपणे जाहिरातींवर अवलंबून (add subsidized) असतात. मालिकांचा कन्टेन्ट आणि जाहिराती यांचं गणित असतं. म्हणजे अर्ध्या तासाच्या मालिकेत अमुक मिनिटांच्या जाहिराती. जाहिरातदार स्पॉट बाइंग करतात आणि चॅनेलकडे पैसा येतो. चॅनेलकडून तो प्रॉडक्शन हाऊसेसना दिला जातो.
यामध्ये चॅनेलकडून निर्मात्यांना एक विशिष्ट बजेट आखून दिलं जातं आणि त्यानुसार मालिकांची निर्मिती होते. त्या बजेटमध्येच कलाकार, तंत्रज्ञ, मदतनीस असा सगळ्यांचा खर्च समाविष्ट असतो. एका अर्थानं ही उतरंड आहे. ज्यामध्ये सगळ्यांत वरच्या स्तरावर असतो जाहिरातदार आणि सर्वांत खालच्या स्तरात कलाकार, तंत्रज्ञ....पैसा वरुन खालपर्यंत झिरपत येतो.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
आता कोरोनाच्या या काळात मुळात मोठमोठ्या जाहिरातदारांकडे येणारा पैशाचा ओघ आटतोय. कारण लोकांची क्रयशक्ती कमी झालीये, जीवनावश्यक वस्तू खरेदीवरच लोकांचा भर आहे. त्यामुळे चॅनेलकडे येणारा पैसाही कमी झालाय आणि आपसूकच प्रोग्रॅमिंगला मिळणाराही...एकूण हा सगळा व्यवहार बाजारपेठेतल्या मागणी-पुरवठ्याशी जोडलेला आहे. लॉकडाऊनमुळे मागणी-पुरवठ्याचं गणितच विस्कळीत झाल्याने या व्यवहाराला फटका बसला आहे.
मुंबईतला कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जूनपर्यंत शूटिंग सुरू होणं शक्य नाहीये. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षातली पहिली तिमाही (एप्रिल-मे-जून) हातातून गेली आहे. जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हा कालावधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा असतो. कारण आपल्याकडे साधारण सप्टेंबरपासून सण-समारांभांना सुरुवात होते. त्याच्या काही काळ आधी मार्केटमध्ये उत्साह असतो. पण कोरोनाचा प्रादूर्भाव असाच सुरू राहिला तर मात्र टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जाहिरातींमधून येणाऱ्या महसुलात 50 ते 55 टक्क्यांची घट होणार?
FICCI च्या अहवालानुसार 2019 मधली टीव्ही इंडस्ट्रीमधली आर्थिक उलाढाल ही 78 हजार कोटी रुपयांची होती. त्यापैकी 32 हजार कोटी रुपयांचा महसूल हा जाहिरातीमधून आला होता आणि 46,800 कोटींचा महसूल सबस्क्रिप्शनमधून मिळाला होता.
पण यावेळी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहित जाहिरातीमधून मिळणाऱ्या महसुलात 50 ते 55 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. टीव्हीला जाहिरातीतून मिळणारा महसूल साधारणपणे 3750 कोटी ते 4125 कोटींच्या आसपास असेल. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये टीव्ही इंडस्ट्रीला जाहिरातीमधून 7500 कोटींचा महसूल मिळाला होता.
लॉकडाऊनमुळे लोकांचं प्राधान्य हे जीवनावश्यक वस्तूंना असल्याने अनेक कंपन्यांनी आपलं मार्केटिंगचं बजेट कमी केलं आहे. त्यामुळे सामन्य परिस्थितीत जेवढ्या जाहिराती मिळतात त्याच्या केवळ 20 टक्के जाहिरातीच सध्या मिळत आहेत. भविष्यात ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते, अशी भीती स्टार आणि डिस्ने इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
जाहिरातीतून मिळणाऱ्या महसुलामध्ये साधारणपणे किती घट होऊ शकते, याची अंदाज व्यक्त होत असतानाच टेलिव्हिजन इंडस्ट्रीला आतापर्यंत झालेल्या नुकसानाची नेमकी आकडेवारी सध्या तरी सांगता येणार नाही, असं झी मराठी-झी युवाचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. प्रत्येक चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसच्या आर्थिक व्यवहारावर ही आकडेवारी अवलंबून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
लॉकडाऊनमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीला बसलेल्या आर्थिक फटक्याबद्दल बोलताना निलेश मयेकर यांनी म्हटलं, की जी जगाची, देशाची परिस्थिती आहे तीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीचीही आहे. प्रत्येकच क्षेत्राला आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीसुद्धा याला अपवाद नाहीये. मात्र शूटिंग सुरू झाल्यावर या नुकसानातून टेलिव्हिजन इंडस्ट्री हळूहळू या संकटातून बाहेर पडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाचं संकट संपल्यानंतरही नाटक आणि चित्रपट उद्योगाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल, असं मयेकरांनी म्हटलं. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे काही काळ थिएटर आणि नाट्यगृहात जाऊन चित्रपट-नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होईल. हा धोका टेलिव्हिजन इंडस्ट्रीला नसल्याचं मत मयेकर यांनी व्यक्त केलं.
मोबाईल हा भविष्यातला पर्याय?
लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटी आपापल्या मोबाईलवर व्हीडिओ शूट करत आहेत. कोरोना, लॉकडाऊनबद्दलचे असे व्हीडिओ वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाले. डिजिटलवरून हा ट्रेंड टीव्हीवरही आला. सोनी मराठीनं कलाकारांनी आपापल्या घरात राहून शूट केलेली 'आठशे खिडक्या नऊशे दारं' ही नवी मालिकाच सोनी मराठी चॅनेलनं सुरू केली. लेखक दिग्दर्शक आणि 'आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले यांच्याशी आम्ही लॉकडाऊनच्या काळातल्या या नवीन प्रयोगाविषयी संवाद साधला.
"लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार हे घरच्या घरी व्हीडिओ बनवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हीडिओ पोस्ट करत आहेत. मात्र यातून केवळ तुम्ही लोकांशी कनेक्टेड राहता. याचं कोणतंही ठोस असं मनी मॉडेल नाहीये. पण कलाकारांच्या अशा प्रयत्नांना जर थोडं कलात्मक आणि ऑर्गनाज्इड रुप दिलं तर…असा कन्टेन्ट टेलिव्हिजन फ्रेंडली स्वरुपात सादर केला तर असा विचार करून आम्ही 'आठशे खिडक्या नउशे दारं' ही मालिका बनवली.
"सध्याच्या घडीला प्रॉडक्शन पूर्णपणे थांबलं आहे. अशावेळी या प्रयत्नातून अगदी पूर्ण नाही, पण 40 टक्के पैसे जरी मिळाले तरी आताच्या काळात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण प्रत्येकाच्या गरजा आता बेसिक आहेत. त्यामुळे या प्रयोगाच्या माध्यमातून टिकून राहू," असं श्रीरंग गोडबोले यांनी म्हटलं.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीला बसलेला फटका पाहता शूटिंगच्या बजेटमध्ये कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशावेळी आर्थिकदृष्ट्या परवडणारा म्हणून हाच ट्रेंड कायम राहिल का, या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीरंग गोडबोले यांनी म्हटलं, "मोठी घरं, भरजरी साड्या-मेकअप, दागदागिने घालणारी स्त्री पात्रं, नाटकीयता असा सिनेमाच्या जवळ जाणारा टेलिव्हिजन कन्टेन्ट पाहायची आपल्याला सवय होती.
"यात भविष्यात नक्कीच बदल होईल. आता स्मॉल बजेट, वास्तवाच्या जवळ जाणारा कन्टेन्ट निर्माण करण्यावर भर राहिल. कोरोनाचं संकट टळलं तरी परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही, हे नक्की आहे. मालिकांचे बजेट जवळपास 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं खर्चात कपात करून सादरीकरण केलं जाईल. अर्थात, यामधली एक सकारात्मक बाजू म्हणजे क्रिएटिव्हीटीला अधिक चालना मिळेल. उत्तम कथा, चांगलं लेखन या गोष्टी आता महत्त्वाच्या ठरतील.
अडचणी वाढू लागल्या की आपण नवीन मार्गही शोधायला लागतो. आठशे खिडक्या नउशे दारं' हा असाच मार्ग आहे, पण सध्याच्या संकटातून टीव्ही इंडस्ट्रीला बाहेर काढण्यासाठी गरज आहे शूटिंगची थांबलेली चक्रं पुन्हा फिरवण्याची…
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)