You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस नव्हे तर लॉकडाऊनमुळे आतापर्यंत झालाय 304 स्थलांतरितांचा मृत्यू
- Author, शादाब नाझमी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून ते 28 मेपर्यंत दररोज सरासरी 4 मजुरांचा मृत्यू होतो आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन सुरू होऊन आता दोन महिने उलटले. पण अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे वाहतूक बंद झाली आणि विविध राज्यांमधील मजुरांना आपल्या घरी शेकडो किमीचे अंतर पायी चालत जावं लागलं. पण, यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, या कामागारांना आपापल्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन्स रेल्वेने सोडल्या. मात्र, या ट्रेन्समध्येही 80 जणांचा मृत्यू झालाय.
विशेष ट्रेन्समधून जाताना 80 जण गेले
9 मे ते 27 मे दरम्यान विशेष ट्रेन्सद्वारे आपापल्या गावी जाणाऱ्या 80 कामगारांचा मृत्यू झाला आहे. RPF ने सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या कामगार, मजूर, विद्यार्थी, भाविक यांना आपल्या गावी परतता यावं यासाठी रेल्वेनं श्रमिक स्पेशल ट्रेन्सची घोषणा केली होती. याच ट्रेन्समधून प्रवास करत असताना या 80 जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या विशेष ट्रेन्स मार्ग भरकटल्यामुळे आपल्या इच्छितस्थळी उशिरा पोहचल्या आणि त्याचाही कामागारांना त्रास झाल्याचं बोललं जातंय.
बीबीसीने हा RPF चा अहवाल मिळवला असून यात मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश जण हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधले आहेत. 2001 च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातले 26 लाख, बिहारमधले 17 लाख कामगार इतर राज्यांमध्ये कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. मृतांमधले 32 जण उत्तर प्रदेशचे, 25 जण बिहारचे आणि प्रत्येक 2 हे ओडीसा, नेपाळ आणि झारखंडचे आहेत.
मात्र, या आरोपांचं आणि तथ्याचं खंडन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर ट्वीट करून खंडन केलंय. गोयल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "संपूर्ण देशात एकाही विशेष ट्रेनला इच्छित ठिकाणी पोहोचताना 7-9 दिवस लागलेले नाहीत. तसंच, एकाही प्रवाशाचा भुक आणि तहानेने मृत्यू झालेला नाही. तसंच, 1.19 कोटी जेवणाची पॅकेट्स तर दीड कोटी पाण्याच्या बाटल्या या रेल्वेने या काळात 54 लाख कामगारांना रेल्वे प्रवासादरम्यान दिल्या आहेत. फक्त 1.75 टक्के वेळा विशेष ट्रेन्सच्या मार्गांमध्ये बदल झाला आहे."
24 मार्चपासून आतापर्यंत देशात विविध ठिकाणी रस्ते अपघातात मोठ्या संख्येने मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रस्ते अपघात आणि प्रकृतीच्या कारणाने आतापर्यंत एकूण 304 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली गेली. पंतप्रधान मोदींनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, फिजिकल डिस्टंसिंग पाळा असेही आवाहन केले. पण हा एवढा मोठा निर्णय अचानक जाहीर केल्याने आपापल्या गावी परत जाण्यासाठी मिळेल ते खासगी वाहन घेऊन मजूर घराबाहेर पडले. तर मोठ्या संख्येने मजूर लहान मुलांसह आपलं सामान घेऊन चालत निघाले.
लॉकडाऊन दरम्यान अनेकांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिलेल्या महितीनुसार 29 मार्चपर्यंत कोव्हिड-19 संसर्गामुळे देशभरात 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे 20 जणांचा मृत्यू झाला. 20 मेपर्यंत ही संख्या 200वर पोहचली. हजारो किमी चालल्यामुळे आणि रस्ते अपघातात एकूण 200 मजुरांचा मृत्यू झाला.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 42 रस्ते अपघात, 32 वैद्यकीय इमरजन्सी आणि पाच रेल्वे अपघातात शेकडो मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याचे मीडिया रिपोर्ट्सवर बीबीसीने केलेल्या एका विश्लेषणातून समोर आले आहे.
मृत्यूची कारणे
रस्ते अपघातामध्ये सर्वाधिक मजुरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर थकल्यामुळे लहान मुलांसहीत मोठयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काही ठिकाणी रेल्वे अपघात झाले. त्यातही मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर काही अस्पष्ट कारणेही आहेत.
138 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. 33 जणांचा मृत्यू थकल्यामुळे झाला आहे. 23 मृत्यू रेल्वे अपघातामध्ये तर 14 मृत्यू इतर कारणांमुळे झाले आहेत.
अपघातानंतर रस्त्यांवर हजारो किमीचा पायी प्रवास केल्यानंतर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. चालल्यामुळे प्रचंड थकवा आल्याने मृत्यू झाले असून यामध्ये वयस्कर आणि तरुण दोघांचा समावेश असल्याचं विश्लेषणात पुढे आले आहे.
65 वर्षांच्या रामकृपाल यांनी मुंबईहून उत्तर प्रदेश येथे पायी जाण्याचे ठरवले. जवळपास 1500 किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी आणि लिफ्ट मागून पार केले. पण जेव्हा ते आपल्या गावी पोहचले त्यांचा मृत्यू झाला.
अशा अनेक घटना आहेत. तेलंगाणा येथे राहणारी 12 वर्षांची मुलगी मुलुग जिल्ह्यातून छत्तीसगड येथील बिजापूरला जाण्यासाठी निघाली. सलग तीन दिवस ती पायी चालत होती. घनदाट जंगलातूनही काही रस्ते होते. पण ती एवढी थकली की वाटेतच तिचा मृत्यू झाला. ही लहान मुलगी लॉकडाऊनपूर्वी तिचे काका आणि आणखी 13 प्रवासी मजुरांसोबत मीरचीच्या शेतात कामासाठी गेले होते.
रेल्वे अपघात
मे महिन्याच्या सुरुवातीला औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे मजूर 40 किमी चालल्यानंतर प्रचंड थकले. ते सटाण्याजवळ रेल्वे ट्रॅकवरच झोपले. आता रेल्वे ट्रॅकवरुन गाडी जाणार नाही असं त्यांना वाटलं पण मालगाडीखाली आल्याने 20 पैकी 16 जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदींनी ट्वीटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दु:खदायक घटना असून लोकांना आवश्यक मदत केली जाईल असं आश्वासन दिले.
दुसऱ्या घटनेत पायी चालत जाणारे दोन प्रवासी छत्तीसगढ येथील कोरिया जिल्ह्यात एका मालगाडीखाली येऊन मृत्यूमुखी पडले.
ही एप्रिल महिन्यातील घटना असून त्यापूर्वी मार्चमध्येही गुजरातमधील वापी जिल्ह्यात चालत जाणाऱ्या दोन महिलांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला.25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून ते 20 मेपर्यंत दररोज सरासरी 4 मजुरांचा मृत्यू होतो आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)