कोरोना लॉकडाऊन : औरैया अपघातात गेलेल्या मजुरांचे मृतदेहही 'मजुरांप्रमाणेच गावी पाठवले गेले'

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, औरैयाहून, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशच्या औरैयाच्या जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या बाहेर सुदामा यादव मुलाचा मृतदेह ताब्यात मिळण्याची वाट पाहत उभा होते.

मूळचे झारखंडमधील पलामू जिल्ह्यातले सुदामा यांचा पोटचा मुलगा औरैयाजवळ शनिवारी झालेल्या अपघातात मरण पावला. आत्ता कुठे हाताशी आलेला 21 वर्षांचा मुलगा असा अपघतात गेल्यानं सुदामा आतून-बाहेरून पार कोसळलेले. त्यांना रडताही येत नाहीय... कसं व्यक्त व्हावं, हेच कळेनासं झालंय.

त्यांना विचारल्यावर अगदी बारीक आवाजत सुदामा म्हणाले, “घरी परतण्याआधी मुलानं फोन करून सांगितलं होतं की घरी येतोय. नंतर टीव्हीवर पाहिलं अपघात झालाय.”

अधून-मधून ते शवविच्छेदनगृहाच्या दाराकडे पाहायचे, तर तिथं त्यांना फक्त बर्फाच्या लाद्या दिसायच्या. बाकी वेळ तिन्ही बाजूला पसरलेल्या उजाड शेताकडं पाहायचे.

“शंकेची पाल चुकचुकली म्हणून घरातून निघालो. कंट्रोल रूमला फोन केला तर तिथून सांगितलं गेलं की, शवविच्छेदनगृहाशी संपर्क करा. माझी माहिती दिल्यानंतर मृतदेहाचा फोटो दाखवून खात्री करून घ्यायला सांगितलं गेलं,” सुदामा यांनी हे सर्व एका दमात सांगितलं.

काही वेळानं सुदामा स्वत:च माझ्या जवळ आले आणि सांगू लागले, “15 मे ला त्याचं लग्न होणार होतं. लॉकडाऊन असल्यानं लग्न डिसेंबरपर्यंत पुढे ढकललं होतं. घरात सांगून आलोय की मुलगा फक्त जखमी झालाय. आता या गाडीनं मुलाचा मृतदेह घरात घेऊन जाईन, तेव्हा घरातल्यांना कसं सामोरं जाऊ?”

अंतहीन वेदना

शवविच्छेदनगृहाबाहेर उभ्या असलेल्या दोन पिकअप गाड्यांकडे सुदामा यांनी इशारा केला. त्यात बर्फाच्या लाद्या ठेवल्या होत्या. त्यातल्याच कुठल्यातरी एका गाडीत त्यांच्या मुलाचा मृतदेह ठेवला जाणार होता.

सुदामा यादव यांच्या दोन मुलांपैकी थोरल्या मुलाचा, म्हणजे नितीश यादवचा या औरैया अपघातात जीव गेला. नितीश मजुरीसाठी राजस्थानला गेला होता. सुदामा झारखंडमध्येच राहून रंगकाम करायचे.

सुदामा यादव यांच्यासोबत झारखंडमधील बोकारो इथले ब्रजेश कुमारही होते. ब्रजेश कुमार यांच्या भावाचा या अपघातात मृत्यू झाला तर त्यांचा आणखी एक भाऊ सैफी हा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय.

रविवारी दुपारपर्यंत 23 जणांचे मृतदेह झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या त्यांच्या गावी पाठवण्यात आले. खरंतर या मजुरांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जिवंत सुखरूप पोहोचायचं होतं, नातेवाईकांना पाहायचं होतं. पण जिवंत पोहोचण्याऐवजी आता त्यांचे मृतदेह पोहोचलेत.

ज्या ट्रकने डीसीएम गाडीला धडक दिली, त्या ट्रकमधील 23 मजुरांचा मृत्यू झाला. डीसीएम गाडीतले 20 जण सुद्धा जखमी झालेत.

औरैयाच्या अपर जिल्हाधिकारी रेखा एस चौहान यांनी बीबीसीला सांगितलं, “दोन्ही वाहनांच्या चालकांविरोधात FIR नोंदवण्यात आलाय. एक चालक आता हॉस्पिटलमध्ये आहे, तर दुसऱ्या चालकाबद्दल अद्याप काहीच माहिती मिळाली नाहीय.”

26 मृतांपैकी 11 जण झारखंड राज्यातील आहेत. या सर्व मृतदेहांना पिकअप गाडीत टाकून घरी पाठवलं गेलं. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ज्या मृतांचे नातेवाईक औरैयामध्ये आले होते, त्यांनाही मृतदेहांच्या गाडीतूनच घरी पाठवण्यात आलं.

सरकारी व्यवस्था

रेखा एस चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एकूण आठ गाड्यांमध्ये मार्गनिहाय या मृतदेहांना पाठवलं गेलंय. दोन गाड्या बोकारोला पाठवण्यात आल्या आहेत, दोन गाड्या पश्चिम बंगाल, तीन गाड्या उत्तर प्रदेशच्या विविध भागात आणि एक गाडी बिहारला पाठवण्यात आली. यात काही रुग्णवाहिकाही होत्या आणि काही पिकअप गाड्याही होत्या.”

त्यानंतर इतर दोन गाड्यांमध्ये राहिलेले मृतदेहही त्यांच्या त्यांच्या घरी पाठवण्यात आले. यातले सर्वाधिक मृतदेह बोकारो (झारखंड) मधील, तर सहा पुरुलिया (पश्चिम बंगाल) मधील होते. त्यामुळे इथे प्रत्येकी दोन गाड्या पाठवण्यात आल्या. जिथं एकच मृतदेह होता, तिथे स्वतंत्र गाडी पाठवण्यात आली.

मृतदेह वाहून नेणाऱ्या प्रत्येक गाडीसोबत एक महसूल अधिकारी आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला पाठवण्यात आलं होतं, अशी माहितीही रेखा यांनी दिली.

औरैया जिल्हा प्रशासनानं आपल्याकडील उपलब्ध साधन-सुविधांच्या मदतीने मृतदेह त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवलं. मात्र ही सर्व व्यवस्था मृतांच्या नातेवाईकांना आणखी वेदनादायी होती.

बोकारोमधील आलेले मृताचे नातेवाईक विरेंद्र महतो सांगत होते, “मजूर होते, त्यामुळे त्यांना जसं वाटलं तसं पाठवून दिलं. ना कुणी जाब विचारणारा आहे, ना कुणी ऐकणारा. ज्या मजुरांची जिवंतपणी कुणी पर्वा केली नाही, त्यांना मेल्यानंतर कोण मान देणार? मजुरांच्या मृत्यूनं कुणाला काय फरक पडतोय?”

अपघात कधी घडला?

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील चिरहूली गावाजवळ शनिवारी दोन ट्रकचा एकमेकांना धडकून अपघात झाला. यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय. काही लोक अजूनही सैफी मेडिकल विद्यापीठात गंभीर अवस्थेत आहेत.

मेडिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजकुमार यांनी बीबीसीला सांगितलं, “एकूण 32 लोकांना औरैयाच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. एका व्यक्तीचा काही वेळातच मृत्यू झाला. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

"शक्य तेवढे उपचार दिले जात आहेत. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया केली जाईल. काही लोकांना हाडांना जखमा झाल्यात. मात्र, अशा अपघातातील छोट्या जखमांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. कारण नंतर त्या जखमा वाढण्याची शक्यता असते.”

रविवारी औरैया जिल्ह्याचे हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सैफी मेडिकल कॉलेज, यातल्या कुठेही एक दिवस आधी मोठा अपघात घडलाय, असं वातावरण नव्हतं. ना माध्यमांची गर्दी, ना रडणारे कुणी, ना सहानुभूती दाखवणारे कुणी.. कुणीच नव्हते.

आरोग्य विभाग आणि प्रशासनही या अपघाताबाबत असं बोलतं की, जसं की एखादी नेहमीसारखी दुर्घटना होती आणि ती घडूनही गेली.

दोन्ही विभागाचे पूर्ण लक्ष कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी जमवणं आणि रुग्णांची देखभाल करण्याकडे होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांची कोरोना व्हायरस चाचणीही घेण्यात आली नाही.

बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील सुशील कुमार सैफी मेडिकल कॉलेजमध्ये भरती आहे. राजस्थानहून परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकमध्ये सुशीलही होता. पटन्यात पोहोचवू, असं त्याला सांगण्यात आलं होतं.

सुशील कुमारच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झालीय. याच अपघातात सुशीलच्या भाच्याचा मत्यू झालाय.

ट्रकने परतण्याचं कारण सांगताना सुशील म्हणतो, “आम्ही 200 किलोमीटरपर्यंत पायीच चालत होतो. भरतपूरजवळ पोलिसांनी या ट्रकमध्ये बसायला सांगितलं. ट्रकमध्ये आम्ही 48 लोक बसलो होतो.”

सुशील कुमार राजस्थानातील ज्या मार्बल कंपनीत काम करायचा, त्याच कंपनीत बोकारोचे रहिवासी असलेले संजय कुमारही काम करायचे.

संजय कुमार सांगतात, “दोन महिन्यांपासून हातात काहीच काम नव्हतं. कंपनीचा मालक काही सांगायलाही तयार नव्हता. ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा म्हणजे खर्च जास्त होणार होता. शिवाय, बस कुठे मिळेल तेही माहीत नव्हतं. आम्ही एकूण 30 लोक सोबत होतो. सर्वजण चालत निघालो. रस्त्यात खाण्यासाठी खूप सारे चणे सोबत घेतले होते.”

सैफी हॉस्पिटलमध्येच सागरची रहिवासी असलेल्या सत्यवती आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगाही भरती करण्यात आलाय. मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झालीय, तर सत्यवती यांच्या चेहऱ्याला मार लागल्यानं सूज चढलीय.

कामाची काळजी

सत्यवती आणि त्यांच्या तीन बहि‍णींचे कुटुंब असे एकूण 16 जण डीसीएम गाडीत होते. अपघातावेळी ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. ही गाडी गाझियाबादहून राजस्थानाला परतत होती. मात्र, राजस्थानातून झारखंडच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीनं या डीसीएम गाडीला धडक दिली.

सत्यवती आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक गाजियाबादच्या इंदिरापुरमध्ये राहतात. सत्यवती घरकाम करतात आणि त्यांचे पती रिक्षा चालवतात. दोन महिन्यांपासून हाताला काहीच काम नव्हतं.

सत्यवती सांगतात, “आमच्याकडचे पैसे संपले होते. राशनही मिळत नव्हता. ट्रेन आणि बसबद्दल ऐकलं होतं. पण त्यासाठीही पैसे नव्हते. डीसीएमवाल्याने 15 हजारात घरात पोहोचवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आम्ही तेवढे पैसे त्याला दिले. माझ्याशिवाय तीन आणखी लोक डीसीएममध्ये बसले होते. ते छतरपूरला जात होते.”

सत्यवती यांच्या तीन बहिणी आणि त्यांचे नातेवाईक सर्व याच हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना त्यांनी या घटनेबाबत कळवलंय. आतापर्यंत कुणीही येऊ शकलं नाहीय. आता पुन्हा घरी कसं जायचं, याची चिंता त्यांना आहे. कारण आता तर पैसेही संपलेत.

उत्तर प्रदेश सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा केलीय. सैफी हॉस्पिटलमध्ये जखमींवरील उपचारांसह त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थाही केली जातेय.

औरैयाच्या अपर जिल्हाधिकारी रेखा एस चौहान म्हणतात, नुकसानभरपाई देण्याची प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. मात्र, सत्यवती यांना याबाबत काही माहिती सुद्धा नाहीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)