You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना औरंगाबाद: पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या इतक्या झपाट्यानं का वाढली?
औरंगाबाद शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. आता शहरातील रुग्णांची संख्या हजाराच्या वर पोहोचली आहे.औरंगाबादमध्ये शनिवारी कोरोनाचे 59, रविवारी 61, तर सोमवारी सकाळीच 59 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,021 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातला लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच औरंगाबाद शहरामध्ये 20 मे (बुधवार) पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीनं शक्य तितके प्रयत्न होत असल्याचं सांगितलं जात आहे पण, शहरातील रुग्णसंख्या वाढतच आहे, यामागची कारणं काय आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न या लेखात केला आहे.
त्यापूर्वी औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रसार नेमका कसा होत आहे, हे पाहूया.
औरंगाबादमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार
औरंगाबादमध्ये 15 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी शहरातील रुग्णसंख्या वेगानं वाढायला लागली. मे महिन्यात कोरोनानं शहरातल्या नवीन भागात शिरकाव सुरू केला.
1 मे पर्यंत शहरातल्या 37 भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले, 16 मे रोजी एकूण 86 भागांत कोरोनाचे रुग्ण आढळले. याचा अर्थ अवघ्या 15 दिवसांत कोरोना व्हायरसनं शहरातल्या 49 नव्या भागांमध्ये प्रवेश केल्याचं दिसून येतं.
सध्या ज्या भागात दहापेक्षा अधिक रुग्ण आहेत, अशा 13 भागांना औरंगाबाद महापालिकेनं कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलं आहे.
यामध्ये नूर कॉलोनी, किलेअर्क, संजयनगर-मुकुंदवाडी, भीमनगर, समतानगर, पुंडलिकनगर, बायजीपुरा, बेगमपुरा, सातारा परिसर, कैलासनगर, रामनगर, सिल्कमिल कॉलनी आणि कैलासनगर भागांचा समावेश आहे.
याशिवाय औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर सात दिवसांवर आला आहे. देशात हा दर 14, तर राज्यात 11 दिवसांपेक्षा जास्त आहे.
शहरातील दाट लोकसंख्येच्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये संजय नगर, पुंडलिक नगर आदी भागांचा समावेश आहे.
दाट लोकवस्तीच्या भवानीनगर वॉर्डात कोरोनाचे 60 रुग्ण आढळले आहेत, तर पुंडलिकनगरमध्ये एकाच घरात 10 रुग्ण आढळले आहेत.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
औरंगाबादेत रुग्ण वाढले, कारण...
औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या नियमांची कठोरपणे अंमलबजाणी न झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं लोकमत औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन सांगतात.
ते म्हणतात, "गेल्या दोन-तीन दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नियंत्रण विभागीय आयुक्तांकडे आलं आहे. यापूर्वी ते जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे होतं. या सगळ्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात म्हणावं तसं यश आलं नाही. सरकारनं जाहीर केलेली संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशांची कठोरपणे अंमलबजावणी झाली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं हे एक कारण आहे."
असंच मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सह-संपादक प्रमोद माने व्यक्त करतात.
त्यांच्या मते, औरंगाबादचे पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली.
कोरोनाचे रुग्ण वाढले कारण टेस्टिंगचं प्रमाण वाढलं आहे, असं महाजन पुढे सांगतात.
ते म्हणतात, "यापूर्वी शहरात स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा नव्हती. त्यासाठी स्वॅबचे नमुने पुण्याला पाठवायला लागायचे. दोन दिवसांनंतर त्याचा निकाल यायचा. आता मात्र शहरात स्वॅबची लॅब आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढलं आहे. पूर्वी 100 जणांचं टेस्टिंग व्हायचं, आता ते प्रमाण 600 ते 800 वर आलं आहे. त्यामुळे मग टेस्टिंग जेवढी जास्त, तेवढे रुग्ण वाढले."
'लोकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत'
कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे लोकांचा निष्काळजीही जबाबदार आहे. कोरोनाला लोकांनी गांभीर्यानं घेतलं नाही, असं प्रमोद माने यांना वाटतं.
ते म्हणतात, "शहरातल्या जाधववाडी परिसरात लॉकडाऊनच्या काळात बाजारात हजारो लोक गर्दी करताना दिसत होतो. त्यामुळे मग सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला.
"याचा परिणाम असा झाला की, एप्रिलच्या सुरुवातीला कोरोनाचा एक रुग्ण असलेल्या औरंगाबादमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराजवळ पोहोचलीय."
'नागरिकांचं सहकार्य मिळाल्यास कठोर अंमलबजावणी'
प्रशासनाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडिले फेटाळून लावतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "लॉकडाऊनची अंमलबजावणी योग्य रीतीनं होण्यासाठी नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येकाला आपापली जबाबदारी समजली पाहिजे. लॉकडाऊनची कठोर अंमलबजाणी करण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
"महापालिका, पोलीस आणि आरोग्य सगळ्या विभागांमध्ये समन्वय आहे. शहरातील रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे, त्यामुळेच कंटेनमेंट झोनमध्ये 100 टक्के लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जमेची बाजू म्हणजे शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. लवकरच परिस्थितीत आणखी सुधारणा होईल."
आतापर्यंत औरंगाबादमधील 255 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
प्रशासन काय करतंय?
औरंगाबादमधील कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये बुधवारपर्यंत (20 मे) लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
20 मे पर्यंत रुग्णवाढीचा वेग कमी न झाल्यास हा लॉकडाऊन रविवार 24 मे पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. 24 मे पर्यंत देखील रुग्णसंख्या वाढतच राहिली, तर 24 मे नंतर दररोज केवळ 7 ते 11 पर्यंतच वाहतुकीत सूट देण्यात येईल.
औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय सांगतात की इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये जास्त चाचण्या होत असल्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. पर मिलियन टेस्टच्या बाबतीत औरंगाबादचा देशात दुसरा क्रमांक आहे असं पांडेय सांगतात.
देशात सर्वाधिक जास्त पर मिलियन टेस्ट मुंबईत होत आहेत त्यानंतर औरंगाबादमध्ये होत असल्याचं पांडेय यांनी बीबीसीला सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)