सोनू सूद याने 'सामना'तील टीकेनंतर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

लॉकडाऊन काळात सोनू सूद हा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकते, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सामनामधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात मजुरांना केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे, ज्यामुळे तो हजारो मजुरांना घरी पोहचवू शकतो असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

सोनू सूदला पुढे करून काही राजकीय घटक ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे, असं चित्र निर्माण करण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे, की लॉकडाऊनच्या काळात इतक्या बसेसची व्यवस्था झाली कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता आणि त्याला हवं ते मिळत होतं. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधानांच्या एखाद्या 'मन की बात'मध्ये येईल. मग दिल्लीत ते पंतप्रधानांच्या भेटीला निघतील आणि एक दिवस भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील.

सामनातून झालेल्या या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद याने रविवारी (7 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

संजय राऊतांच्या या टीकेवरुन राजकीय कलगीतुराही रंगला आहे.

संजय राऊत यांनी सोनू सूदच्या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं, की सोनू सूदनं स्थलांतरित मजुरांसाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. मोठ्या मनानं त्याचं कौतुक करण्यापेक्षा शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरचं आपलं अपयश लपविण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करुन म्हटलं, की या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया... मनाचा मोठेपणा दाखवूया.

रुपेरी पडद्यावर व्हिलनच्या भूमिका साकारणारा सोनू सूद सध्या खऱ्याखऱ्या आयुष्यातला हिरो म्हणून गाजतोय.

मुंबईत अडकलेल्या हजारो मजुरांसाठी सोनू सूद हा तारणहार बनल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत अडकलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांसाठी सोनू सूदने बसेसची व्यवस्था केली. त्यानंतर त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या प्रयत्नांबद्दल बीबीसीनेही सोनू सूदशी संवाद साधला होता.

"रस्त्यावर आपल्या कुटुंब कबिल्यासोबत जाणाऱ्या मजुरांना पाहून मी बेचैन झालो. ते लोक हजारो किलोमीटर पायी चालत जाऊ लागले होते. यामुळे माझी रात्रीची झोप उडाली होती," सोनू सांगत होता.

24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर झाला त्यामुळे लोक आहे त्या ठिकाणीच अडकून पडले. बस आणि रेल्वे बंद झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक त्रास मजुर वर्गालाच सहन करावा लागला. अनेकांनी पायी जाण्याचाच पर्याय निवडला. रस्त्याने जाताना झालेल्या अपघातामध्ये आणि थकव्यामुळे 100 हून अधिक लोकांचे प्राण गेले.

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दबंग' चित्रपटातील सोनू सूदची भूमिका गाजली होती. त्याला यासाठी पुरस्कारही मिळाला होता. रणवीर सिंह, सलमान खान, हृतिक शाहरूख खान आणि ऐश्वर्या रायसारख्या स्टार कलाकारांसोबत सोनूने स्क्रीन शेअर केली आहे.

सोनू आणि त्याची बालपणीची मैत्रीण निती गोयल गेल्या दोन महिन्यांपासून मजुरांना मदत करत आहेत.

"मार्चमध्ये आम्ही लोकांना जेवण आणि अन्नधान्य पुरवत होतो. सुरुवातीला आम्ही 500 पाकिटं वाटली आता आम्ही 45,000 हून अधिक लोकांना जेवण आणि किराणा सामान पुरवत आहोत. यामध्ये बरेच जण झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत किंवा कुणी रस्त्याने पायी चालणारे आहेत," असं सोनूने फोनवर सांगितलं.

11 मे पासून सोनूने शहरात अडकलेल्या लोकांसाठी बसची व्यवस्था केली.

"9 मे रोजी आम्ही अन्न वाटत होतो तेव्हा काही लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कर्नाटकात जात आहोत. "

"मी त्यांना विचारलं तुमचं गाव किती दूर आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की 500 किलोमीटर," सोनू सांगत होता.

"मी त्यांना म्हटलं, की मला तुम्ही दोन दिवस द्या. मी तुमची घरी जाण्याची व्यवस्था करतो. मी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली आणि त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली."

11 मे रोजी 200 जणांची पहिली बॅच जेव्हा निघाली तेव्हा सोनू आणि त्याची मैत्रीण निती यांनी तेव्हा नारळ फोडून सर्वांचा प्रवास सुखरुप होवो अशी प्रार्थना केली.

जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी होतं, असं सोनूने म्हटलं. तेव्हापासून सोनूने कित्येकांना आपल्या घरी जाण्यास मदत केली आहे. त्यानंतर त्याला मदतीसाठी अनेक ठिकाणावरून विनंती केली जात आहे.

"मला दिवसाचे हजारो मेसेज आणि इमेल्स येत आहेत. ते मदत मागत आहेत. काही जण फेसबुक आणि ट्विटरवर मदत मागत आहेत."

"जेव्हा लोक आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत त्याचवेळी आम्ही दिवसाचे 18 तास काम करत आहोत," असं निती सांगते. आमच्या घरचे आम्हाला सांगत आहेत की, तुम्ही बाहेर जाऊ नका पण हे काम कुणीतरी करणं आवश्यक होतं.

सोनू म्हणतो की, मला इतरांची मदत करण्याची संधी मिळाली ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे. देवच माझ्याकडून हे काम करून घेत आहे असं मला वाटतं.

शनिवारी (23 मे) बीबीसीच्या प्रतिनिधीने संवाद साधला तेव्हा तो 700 मजुरांना उत्तर प्रदेश आणि बिहारला पाठवण्यासाठी घराबाहेर जाऊ लागला होता. 14 बसमध्ये या लोकांची जाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं त्याने सांगितलं.

"मला या लोकांबद्दल खूप काही वाटतं कारण मी मुंबईला स्थलांतरित म्हणूनच आलो आहे. एकेदिवशी मी रेल्वे पकडली आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठलं. माझ्याप्रमाणेच हे लोक देखील आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच या शहरात आले आहेत. सर्वांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. सर्वांना चांगली वागणूक मिळणं आवश्यक आहे," सोनू सांगतो. तू हे काम कधीपर्यंत करणार आहेस असं विचारलं असता त्यानं म्हटलं, की जोपर्यंत शेवटची व्यक्ती आपल्या घरी पोहोचलेली नसेल तोपर्यंत मी हे काम करणार आहे. ज्या काळात भारताच्या गरीब नागरिकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांवर टीका होत आहे त्याच काळात सोनूचं सर्व स्तरातून कौतुक झालं, अजूनही होत आहे.

सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने एक नवीन डिश तयार केली आणि त्याला सोनूच्या जन्म गावाचं नाव दिलं.

अनेकांनी सोनूला सुपरहिरो म्हणून दाखवलं आहे. त्याला 'खराखुरा हिरो' असंही म्हटलं जात आहे.

आपली स्तुती होत आहे म्हणून तो भारावून गेला आहे पण त्याच्या चाहत्यांसाठी त्याने संदेश दिला आहे. "माझ्या आई-वडिलांनी मला जे शिकवलं आहे तेच मी करत आहे. ते सांगतात की, जर इतरांची मदत करण्याची तुमची क्षमता आहे तर तुम्ही जरूर करायला हवी."

"या काळात प्रत्येकाने आपल्या घरात किमान एका व्यक्तीचा जास्तीचा स्वयंपाक करायला हवा. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आणि तसं घडलं तर आपण कोरोनाला नक्कीच हरवू असा मला विश्वास आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)