कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उद्धव ठाकरेंना 9 सूचना

राज्यातील कोरोना व्हायरसचं संकट हाताळताना प्रशासकीय स्तरावर काय अडचणी येत आहेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

विविध क्षेत्रांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सल्ले दिले आहेत. त्यांनीच काही ट्वीट्स करून याबाबत माहिती दिली.

पवार काय म्हणाले?

1. पुढचं शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या कमी होईल. याचा विपरीत परिणाम शैक्षणिक आणि तांत्रिक संस्थानांच्या उत्पन्नावर होण्याची भीती आहे. काही संस्थानं तर कोलमडण्याची, बंद होण्याची भीती आहे.

एक अभ्यास गट स्थापन करून या शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण संस्थांना काय धोका उद्भवू शकतो, याचं अवलोकन करून शिक्षणात कुठेही अडसर असल्यास तो दूर करावा.

2. सध्या सरकारने राज्यातील उद्योगांना कामं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण मला वाटतं त्यासाठीच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वं पुरेशी स्पष्ट नाहीत.

अनेक फॅक्टरींमध्ये काम करणारे मजूर आता गाव सोडून गेले आहेत, त्यामुळे इथे कामं सुरू करायची असतील तर त्यांना परत आणण्यासाठी नीट व्यवस्थापन करावं लागेल.

यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. त्यांना आपल्या यंत्रणेत कसं सामावून घेता येईल, याचं नीट नियोजन केलं जाईल.

3. पूर्वी काही मागास आणि अविकसीत भागांमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अनेक सरकारी योजना सुरू होत्या. आताही राज्यात नव्याने गुंतवणूक आणायची असेल तर नवीन काही धोरणं आखावी लागतील.

4. राज्यात लॉकडाऊन शिथील करून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हळुहळू पावलं उचलावी लागतील. या शिथिलतेबाबत सर्वांना नियमितपणे माहिती असावी, यासाठी दररोज लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची वेळ आणि आवश्यक त्या गोष्टींचं नियोजन करावं.

5. पूर्ण काळजी घेऊनच राज्यातील दुकानं, कार्यालय आणि इतर आस्थापनांमध्ये कामकाज सुरू करावं. ते टप्प्याटप्प्याने व्हायला हवं.

6. सध्या राज्यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कामकाज मंदगतीने सुरू आहे. आयात-निर्यातीला चालना देण्यासाठी तसंच अंतर्गत सामान वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी सरकारने उद्योजक आणि विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी.

7. राज्य पूर्वपदावर नेण्याच्या दिशेने आवश्यक आहे की सरकारमधले मंत्री आणि कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करताना दिसायला हवेत. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या जाव्यात.

8. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आपल्याला राज्यातील रस्ते वाहतूक तसंच हवाई आणि रेल वाहतूक पूर्ववत करण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागतील.

9. कोरोना कधीच पूर्णपणे संपणार नाही. तो आता आपल्या आयुष्याचा भाग बनून राहणार आहे, हे आता आपण स्वीकारून, त्याच्यापासून बचाव कसा करायचा आणि लोकांमध्ये आरोग्य व्यवस्थेबाबत जागरुकता कशी पसरवायची, याचा विचार करायला हवा.

जपानमध्ये लोक आता वैयक्तिक स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात, मास्क घालतात. माझं जनतेला आवाहन आहे की त्यांनीही आता ही जीवनशैली अंगीकारायला हवी. माहिती विभागाला मी आवाहन करतो की लोकांमध्ये याबाबत आवश्यक ती जनजागृती करावी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)