You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या संसर्गातच लहान मुलांमध्ये फैलावतोय 'हा' गूढ आजार
अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काही मुलांना गंभीर आजाराने ग्रासलं आहे. हा आजार आणि कोरोना यांचा संबंध आहे.
हा आजार मुलांच्या शरीरात गुंतागुंत निर्माण करतो. त्यांना ICU अर्थात अतिदक्षता विभागात भरती करायला लागू शकतं.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत शंभरहून अधिक मुलांना हा आजार झाला आहे. युरोपात अन्य ठिकाणीही मुलांमध्ये या आजाराची लक्षणं पाहायला मिळत आहेत.
असं मानलं जात आहे की, ज्या मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कोरोना विषाणूचा विलंबाने प्रतिकार करत आहे या मुलांना हा आजार अधिकतेने होण्याची शक्यता आहे. हा आजार कावासाकी आजाराशी मिळताजुळता आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
कावासाकी या आजारात लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्तपेशी प्रसरण पावतात आणि संपूर्ण शरीरावर लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. मुलांना खूप ताप येऊ लागतो आणि त्यांचे डोळेही लाल होऊ लागतात.
एप्रिल महिन्यात ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने डॉक्टरांना या आजाराचा शोध घेण्यास सांगितलं होतं. लंडनमध्ये आठ मुलं या आजाराने त्रस्त होती. यापैकी एका 14वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
आजाराची प्रमुख लक्षणं
या सगळ्या मुलांना लंडनमधील एवेलिना चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. सगळ्या मुलांमध्ये साधारण एकसारखीच लक्षणं दिसून आली- खूप ताप, शरीरावर लाल चट्टे, डोळे लाल, शरीराला सूज आणि शरीरदुखी.
मुलांना श्वसनाचा कोणताही आजार नव्हता. मात्र यांच्यापैकी सातजणांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. हा एक नवीन आजार आहे, ज्याची लक्षणं कावासाकी डिसीज शॉक सिंड्रोमशी साधर्म्य असणारी आहेत.
कावासाकी सिंड्रोम साधारणत: पाचपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. शरीराला सूज येणं, गळ्याच्या ग्रंथींना सूज येणं, ओठ सुकणं तसंच ओठ फाटणं ही या आजाराची लक्षणं आहेत.
मात्र नवा आजार 14 ते 16 वयाच्या मुलांना लक्ष्य करतो आहे. हा आजार झाल्यास मुलांच्या शरीरात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
कोरोनाशी संबंध
डॉक्टर लिज विटेकर लंडनमधील इंपीरियल कॉलेजमध्ये पीडियाट्रिक इंफेक्शियस डिसीज अँड इम्युनॉलॉजी विषयात क्लिनिकल लेक्चरर आहेत.
कोरोनाचा संसर्ग होत असतानाच्या काळात हा आजार पसरत आहे याचा अर्थ या दोन्ही आजारांचा एकमेकांशी संबंध आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि चार-पाच आठवड्यात या आजाराने लहान मुलांना ग्रासलं. कोरोना संसर्गानंतर हा आजार होतो आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीशी या नव्या आजाराचा संबंध आहे.
दुर्धर आजार
प्रोफेसर रसेल वाइनर रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थचे प्रमुख आहेत. या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांवरचे उपचार यशस्वी ठरत आहेत. ही मुलं बरी होऊन आपापल्या घरी परतू लागली आहेत.
हा सिंड्रोम अतिशय दुर्धर असल्याचं त्यांनी सांगितलं.
या आजाराचा अभ्यासाचा केल्यानंतर खूपच कमी मुलांना कोरोनाचा संसर्ग का होतो आहे हे लक्षात येईल. बहुतांश मुलांमध्ये कोरोनाचा परिणाम नाही किंवा त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये लहान मुलांचं प्रमाण एक किंवा दोन टक्के आहे.
मायकेल लेव्हिन लंडनमधल्या इंपीरियल कॉलेजात पीडियाट्रिक्स अँड इंटरनॅशनल चाईल्ड हेल्थचे प्राध्यापक आहेत. त्यांनी सांगितलं की, बहुतांश मुलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्यांच्या शरीरात अशा संक्रमणानंतर तयार होणारी अँटिबॉडी होती.
नव्या आजाराशी टक्कर देण्याकरता विषाणूला प्रतिकारासाठी असामान्य रोगप्रतिकारक क्षमता तयार होते.
ही रिअॅक्शन आणि नव्या आजाराविषयी येत्या काळात बरंच काही ऐकायला मिळेल. गेल्या काही आठवड्यातच हा आजार समोर आला आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यानंतर नव्या आजाराची लक्षणं दिसू लागतात. म्हणूनच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणं दिसू लागतात.
बाकी जगात काय स्थिती?
ब्रिटनव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स या देशांमध्ये कावासकी सदृश आजाराची लक्षणं मुलांमध्ये आढळली आहेत.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांच्या मते, कमीत कमी 15 राज्यांमध्ये या दुर्धर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत.
न्यूयॉर्कमध्ये 82 मुलं या आजाराने त्रस्त आहेत. यापैकी 53 जणांच्या शरीरात कोव्हिड-19च्या अँटिबॉडी आढळल्या आहेत.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) संघटनेनं सगळ्या हॉस्पिटलसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यांनी आजारासंदर्भात वेबसाईटवर तपशीलवार माहिती दिली आहे.
दरम्यान, इटलीतही दहा मुलांना या आजाराने ग्रासलं असल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
या सगळ्या मुलांना इटलीतील बेरगमो शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बेरगमो शहरात कोरोनाने थैमान घातलं होतं. तूर्तास या मुलांची प्रकृती स्थिर आहे.
ही मुलं सरासरी सात वर्षांची आहेत. या मुलांमध्ये हृदयाशी निगडीत आजार, टॉक्सिक शॉक सिंड्रोम अशी लक्षणं होती. त्यांना अतिरिक्त स्टेरॉइड्सही द्यावी लागली होती.
दहापैकी आठ मुलांमध्ये कोरोना संसर्गानंतरच्या अँटिबॉडी होत्या. मात्र ही चाचणी शंभर टक्के यशस्वी नव्हती असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण हा आजार संक्रमणानंतर अनेक आठवड्यानंतरही आढळतो.
बेरगमो हॉस्पिटलमधील डॉ.लुसियो वर्डोनी यांनी सांगितलं की, हा दुर्धर आजार आहे. आम्ही या आजाराचा अभ्यास केला आहे, अहवालही सादर केला आहे. कोरोना व्हायरस मुलांवर कसा परिणाम करतो आहे हे यातून स्पष्ट होईल.
हा आजार लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही होऊ शकतो असं ब्रिटनमधील आरोग्यतज्ज्ञांना वाटतं. ब्रिटन, अमेरिका तसंच युरोपातील अन्य देशातील विशेषज्ञ या आजारावर संशोधन करत आहेत. तूर्तास त्यांनी या आजाराला 'पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम' असं नाव दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)