You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: ईशान्य भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या का आहे कमी?
- Author, सचिन गोगोई
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत ईशान्येकडच्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या खूपच कमी आहे. त्यामागे कारण काय असावं?
यामागची कारणं आहेत - या राज्यातल्या लोकांची अंगभूत शिस्त, सरकारने उचललेली सक्रिय पावलं आणि मर्यादित आंतरराष्ट्रीय संपर्क.
14 मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार या आठ राज्यांची लोकसंख्या 4.57 कोटींहून थोडी जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार इथल्या 1 लाख 81 हजार 624 व्यक्तींमागे एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे. देशातल्या इतर राज्यांची परिस्थिती याहून खूप वाईट आहे. देशाच्या इतर भागात दर 15 हजार 514 व्यक्तींमागे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे.
नागालँड आणि सिक्कीममध्ये एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. तर अरुणाचल प्रदेश, मणीपूर आणि मिझोरममध्ये दहाहून कमी लोक संसर्गग्रस्त आहेत.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
ईशान्य भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण त्रिपुरामध्ये आहेत. त्रिपुरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 155 पर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आसाम आहे. आसाममध्ये 80 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मेघालयमध्ये 13 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
कठोर लॉकडाऊनमध्ये लोकांनी पाळली शिस्त
मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंन्सिंग आणि कोरोनाला आळा घालण्यासाठीचे जे इतर उपाय आहेत त्यांचं तंतोतंत पालन केल्याबद्दल सरकार आणि प्रसार माध्यमं दोघांनीही ईशान्य भारतातल्या नागरिकांचं कौतुक केलं आहे.
इथल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणं आणि घरीसुद्धा बरीच काळजी घेतली. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन आणि एकत्र येण्याच्या अगदी एक-दोन तुरळक घटना सोडल्या तर लोकांनी सरकारी नियमांचं पूर्णपणे पालन केलं.
ईशान्य भारतविषयक केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करत इथल्या लोकांचं कौतुक केलं. ईशान्येकडच्या लोकांनी चांगलं उदाहरण घालून दिलं आहे. इतर राज्यांसाठी हा आदर्श आहे. साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याबाबत इतर राज्यं या राज्यांकडून नक्कीच धडा घेऊ शकतात.
ईशान्य भारतातले लोक सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचं किती गांभीर्याने पालन करत आहेत, हे दाखवणारे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
असाच एक व्हीडिओ आहे. यात काही लोकांनी गरजूंसाठी जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स एका टेबलावर मांडून ठेवले आहेत. लोक रांगेत येऊन एक एक पॅकेट उचलत होते आणि दान करणारे लोक हात जोडून उभे आहेत.
मणिपूरच्या लोकांनी दाखवलेलं सामाजिक भान, याचंही सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. मणिपूरने देशाच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांसाठी 80 क्वारंटाईन झोपड्या उभारल्या आहेत.
अनेकांनी मिझोरमच्या मोकळ्या गल्ल्यांचे फोटो शेअर केले आहेत. मिझोरममध्ये केवळ एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे.
ईस्टमोजो या एका न्यूज वेबसाईटने म्हटलं आहे की, इथला मिझो समाज समूहप्रिय आहे. मैत्री, गप्पाटप्पा, भेटीगाठी हा मिझो समाजाचा स्वभाव आहे. सोशल डिस्टंन्सिंग यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तरीही कोरोना विषाणूच्या साथीचं गांभीर्य ओळखून हा समाजही सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत आहे.
राज्य सरकारची सक्रीय भूमिका
ईशान्य भारतातल्या राज्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय भूमिका घेतली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ईशान्य भारतातलं आसाम सर्वांत मोठं राज्य आहे. आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सरमा कोरोना विरोधातल्या लढ्यात आघाडीवर आहेत.
खरंतर आसाममध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या खूप कमी होती. तरीही थेट चीनच्या कंपन्यांशी संपर्क साधून आपल्या राज्यासाठी पीपीई किट मागवणारे पहिले मंत्री सरमा हेच होते. याशिवायही त्यांनी अनेक पावलं उचलली आहेत. खेळाच्या मैदानात क्वारंटाईन सेंटर उभं करणारं पहिलं राज्यही आसामच आहे. आसाममध्ये 30 मार्चलाच म्हणजेच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात स्टेडियममध्ये 80 खाटांचं क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आलं होतं.
आरोग्य मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या या कामाचं कौतुक होत असलं तरी कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते संपूर्ण राज्यात हेलिकॉप्टरने फिरून करदात्यांचा पैसा उडवत असल्याची टीकाही होतेय.
इंग्रजी न्यूज वेबसाईट फर्स्टपोस्टने म्हटलं आहे की, सरमा ईशान्य भारतात सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, या जागतिक आरोग्य संकटावेळी ते आपली ही ओळख विसरून राज्याच्या सीईओप्रमाणे काम करताना दिसत आहेत.
ईशान्य भारतातल्या इतर राज्यांनीही आसामप्रमाणेच पावलं उचलली आहेत. उदाहरणार्थ-सिक्कीमने 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला त्याआधीपासूनच परदेशी नागरिकांना आपल्या राज्यात येण्यास बंदी घातली होती. 6 मार्च रोजी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता.
7 मे रोजी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी राज्य सरकारने बंधनकारक केलेल्या व्हायरस स्क्रिनिंगशिवाय राज्यात येणाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं होतं.
ईशान्य भारतात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त त्रिपुरामध्ये आहे. इथे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 155 आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्रिपुराने एप्रिलच्या शेवटीशेवटी राज्य कोरोना फ्री असल्याचं घोषित केलं होतं.
एनडीटीव्हीच्याच वृत्तानुसार त्रिपुरामध्ये कोव्हिड-19 चाचण्यांचा दर प्रति दहा लाख लोकांवर 1051 इतका होता. तर राष्ट्रीय पातळीवर हा दर प्रति 10 लाख व्यक्तींमागे 470 चाचण्या इतका कमी आहे. मात्र, त्रिपुरातल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका शिबिरात अचानक मोठ्या संख्येने जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आणि त्रिपुरातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली.
ईशान्य भारतात पोलीस दलांनी लोकांकडून लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करून घेतलं.
जगाशी फारसा संपर्क नसणं ठरलं फायदेशीर
ईशान्य भारताची हवाई मार्गे थेट कनेक्टिव्हिटी भूतान, थायलँड आणि सिंगापूर अशा मोजक्या देशांशीच आहे.
जाणकारांना वाटतं की ईशान्य भारताचा जगाशी मर्यादित संबंध असल्याने इथे आजाराचा फैलाव फारसा झालेला नाही आणि पुढेही याचा उपयोग होईल.
आसाममधल्या DY-365 या न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार कुमुद दास यांच्या मते, "देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत ईशान्य भारतातल्या राज्यांची कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या चीन, अमेरिका, जर्मनी, इटली, स्पेश या देशांशी थेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे या राज्यांमध्ये कोरोनाने उशीरा प्रवेश केला."
ऑब्जर्वर रिसर्चच्या वेबसाईटनेही अशाच पद्धतीचं विश्लेषण मांडलं आहे. वेबसाईटने प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटलं आहे, "ईशान्य भारतात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ नसणं आणि बाहेरच्या देशांशी यांचा थेट वाहतूक संपर्क नसणे या राज्यांसाठी वरदान ठरलं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)