आत्मनिर्भर भारत अभियान: निर्मला सीतारमण यांनी दिला 20 लाख कोटी रुपयांचा हिशेब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (12 मे) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधून कोणत्या क्षेत्राला नेमका किती लाभ होईल, याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सविस्तर माहिती देतील असंही पंतप्रधानांनी सांगितलं होतं.

त्यानुसार 13 मे ते 17 मे दरम्यान सलग पाच पत्रकार परिषदा घेऊन हे 20 लाख कोटी रुपये कोणकोणत्या क्षेत्रासाठी खर्च होतील, याचा हिशोब मांडला.

13 मे रोजी निर्मला सीतारमण यांनी 5.94 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची माहिती दिली होती. यात प्रामुख्याने लघु उद्योगांना कर्ज देण्याबाबत आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था, तसंच वीज वितरक कंपन्यांना मदत केली जाणार असल्याचं सांगण्यात आले होते.

अर्थमंत्र्यांनी 14 मे रोजी 3.10 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजविषयी सांगितलं होतं. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांपर्यंत मोफत धान्य आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली.

तर तिसऱ्या टप्प्यात 15 मे रोजी निर्मला सीतारमण यांनी 1.5 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. यात कृषी आणि कृषी क्षेत्राशीसंबंधित उद्योगांना मदत केली जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 16 आणि 17 मे रोजी काही क्षेत्रांचा उल्लेख करत आर्थिक पॅकेजचीही सविस्तर माहिती दिली. कोळसा, विमान, अंतराळ विज्ञानपासून ते शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे आणि सरकारी क्षेत्रात मदत अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. शिवाय राज्यांना अतिरिक्त मदत देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या सगळ्सांसाठी 48 हजार 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की पंतप्रधानांच्या 12 मे रोजी केलेल्या घोषणेआधीच लॉकडाऊन दरम्यान आम्ही मदत करायला सुरुवात केली होती. या अंतर्गतच पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजसाठी 1 लाख 82 हजार 800 कोटी रुपयांची योजना बनवली गेली.

तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनही 8 लाख 1 हजार 603 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते.

ही सगळी रक्कम एकत्र करत सरकार आत्मनिर्भर भारत पॅकेजसाठी 20 लाख 97 हजार 53 कोटी रुपये खर्च करण्याचे जाहीर करत असल्याचं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)