कोरोना लॉकडाऊनमुळे 'पद्मनाभस्वामी' या सर्वांत श्रीमंत देवस्थानाची आर्थिक परिस्थितीही बिघडली

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कोरोना विषाणूचा फटका जसा उद्योगधंद्यांना बसला आहे तसाच तो देशातल्या कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या मंदिरांनाही बसला आहे. केरळचं प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरही त्याला अपवाद नाही.

पद्मनाभस्वामी मंदिराचे भाविक उत्तर भारतात मोठ्या संख्येने आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे या मंदिराची आर्थिक परिस्थिती 'बिघडल्याचं' मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.

लॉकडाऊनपूर्वी दररोज 2 ते 3 लाख रुपयांचं दान किंवा भेट या मंदिरात दिलं जायचं. लॉकडाऊननंतर मंदिराने ऑनलाईन दान देण्याची व्यवस्था सुरू केली. मात्र, त्यातून दररोज केवळ 10 ते 20 हजार रुपयेच येत असल्याचं पुजारी सांगतात.

तिरुअनंतपूरमधल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी व्ही. रसीथन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आमच्याकडे 307 कर्मचारी आहेत. बँकेतल्या ठेवी आणि इतर जमा यांच्यावर मिळणाऱ्या व्याजातून आम्ही या कर्मचाऱ्यांना पगार देतो. मंदिराचा खर्च बघता मी स्वतः माझ्या पगारात 30 टक्क्यांची कपात केली आहे."

ते म्हणतात, "हे भारतातलं सर्वात श्रीमंत मंदिर आहे. उत्तर भारतातून इथे लाखो भाविक येत असतात. इथे दररोज 5 ते 10 हजार भाविक यायचे. मात्र, कोरोना विषाणूमुळे आता कुणीच येत नाही."

लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात मंदिराचं किती आर्थिक नुकसान झालं, याचा मंदिर व्यवस्थापनाने अंदाज काढला आहे. त्यांच्या मते 4 ते 6 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिराच्या या परिस्थितीवरून इतर मंदिरांच्या अवस्थेची कल्पना येते. केरळमधल्याच स्वामी अय्यप्पा यांच्या सबरीमला मंदिराची परिस्थिती तर श्री पद्मनाभस्वामी मंदिराहून वाईट आहे.

शबरीमलामधून 100 कोटी रुपये

त्रावणकोर देवासोम बोर्डाचे (टीडीबी) चेअरमन एन. वासू यांनी बीबीसीला सांगितलं, "कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत. या महिन्यात जवळपास 25% पगार कपात केली आहे."

टीडीबी केरळमधल्या जवळपास 125 मंदिरांचं व्यवस्थापन सांभाळतं. यात सबरीमलाचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या मंदिरांची दान स्वरुपात होणारी कमाई पूर्णपणे बंद झाली आहे.

टीडीबीच्या देखरेखीखालच्या सर्व मंदिरांपैकी एकट्या सबरीमला मंदिरातून जवळपास 100 कोटी रुपये येतात. इतर सर्व मंदिरं मिळून 100 कोटी रुपये येतात.

केरळचंच गुरूवायूर हेदेखील एक श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिराची परिस्थिती इतरांच्या तुलनेत बरी आहे. एका मंदिर कर्मचाऱ्याने सांगितलं, "आम्ही परिस्थिती बऱ्यापैकी हाताळत आहोत."

कर्नाटकातल्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या कोल्लूर मुकांम्बिका मंदिर आणि कुक्के सुब्रमण्या मंदिर या मंदिरांमध्ये केवळ दक्षिण भारतातूनच नाही तर परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.

मंदिराचे विश्वस्त डॉ. अभिलाष पी. व्ही. यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहूनही अधिकचा काळ लागू शकतो. मंदिराचं वार्षिक उत्पन्न 40 कोटींहून जास्त आहे. तर महिन्याला जवळपास 90 लाख रुपये खर्च येतो. लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आम्ही आमच्या कायमस्वरुपी कर्मचारी आणि आउटसोर्स स्टाफला पगार दिला आहे. याव्यतिरिक्त काही माणसं रोज जो चढावा यायचा त्यावर अवलंबून होती. त्यांचीही आम्ही काळजी घेतोय."

मुकांम्बिका मंदिरात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश यासोबतच श्रीलंका आणि जपानमधूनही भाविक येतात.

श्रीलंकेचे पंतप्रधान रनिला विक्रमसिंघे आणि त्यांच्या पत्नी मैत्री जेव्हा पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा सर्वात आधी त्यांनी मुकांम्बिका मंदिराला भेट दिली होती.

कुक्के सुब्रमण्या मंदिराचं तीन महिन्यात जवळपास 22.79 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

मंदिराच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं, "आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देतोय. पण नुकसान खूप जास्त आहे."

कुक्के सुब्रमण्या मंदिरात दक्षिण भारतासोबतच महाराष्ट्रातून सेलिब्रिटीजसह अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. यात ऐश्वर्या राय-बच्चन, सचिन तेंडुलकर अशा दिग्गज सेलिब्रेटींचा समावेश आहे.

कर्नाटकातल्या मुजराई भागाचे कमिश्नर रोहिणी सिंदुरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "कर्नाटकात जवळपास 34562 मंदिरं बंद आहेत. यापैकी 202 मंदिरं ग्रुप ए मध्ये तर 139 मंदिरं ग्रुप बी मध्ये आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या पुजाऱ्यांचं वेतन आम्ही देतोय. ग्रुप सी मध्ये पुजाऱ्यांना 48,000 रुपये वार्षिक वेतन मिळतं. आम्ही सर्व गरजू पुजाऱ्यांना एक हजार रुपयांची रेशन किट देतोय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)