नितीन गडकरींचा दावा - कोरोना व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे : #5मोठ्याबातम्या

आजच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. कोरोना व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आलाय- नितीन गडकरी

कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून लॅबमध्ये तयार करण्यात आला असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे. NDTV शी बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं.

नितीन गडकरी यांनी म्हटलं, "कोरोनासोबत कसं जगायचं हे शिकायलं हवं. हा विषाणू नैसर्गिक नाही, कृत्रिम आहे आणि आता जगातले अनेक देश यावरची लस शोधायचा प्रयत्न करत आहेत. सध्या ही लस उपलब्ध नसली तरी लवकरच लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. मग काही अडचण उरणार नाही."

2. गरीबांच्या हाती पॅकेजमधून दमडीही पडली नाही - पी. चिदंबरम

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केलीय. गरीबांच्या हाती थेट पैसे पडतील अशी कोणतीही तरतूद या पॅकेजमध्ये नसल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय. Zee 24 तासने ही बातमी दिली आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजमध्ये घराच्या दिशेने पायपीट करणाऱ्या गरीब, भुकेल्या आणि उद्ध्वस्त झालेल्या मजूरांसाठी काहीही नाही.

हा कष्टकऱ्यांच्या जखमेवर निर्दयीपणे फुंकर घालण्याचा प्रकार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.

3. कन्टेन्मेंट झोनमधल्या लोकांना गोळ्या देण्याचा विचार

कन्टेन्मेंट झोन आणि रेड झोनमधल्या लोकांना रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी गोळ्या देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. मुंबई मिररमध्ये याविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

"कन्टेन्मेंट आणि रेड झोनमध्ये कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव अधिक होऊ नये यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. या भागांत राहणाऱ्यांना आम्ही Arsenic Album 30 या गोळ्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी द्यायला सुरुवात केली आहे," किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय.

4. पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप

पीएम केअर फंडाकडून आतापर्यंत 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं असून स्थलांतरित मजुरांसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

पीएम केअर फंडातल्या निधीचा वापर व्हेंटिलेटर्स खरेदी आणि लस निर्मितीसाठीही केला जाणार आहे.

2 हजार कोटी रुपये व्हेंटिलेटर खरेदीसाठी, 1हजार कोटी स्थलांतरित मजूरांसाठी आणि उर्वरित शंभर कोटी लस निर्मितीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.

5. परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालयाची मागणी

परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालय असावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचर्या आणि आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समितीने केली आहे. सकाळनं ही बातमी दिलीये.

सध्याच्या घडीला कोरोनाशी लढण्यामध्ये परिचारिका पहिल्या फळीत आहेत, पण या परिचारिकांचे वरिष्ठ त्यांच्या संवर्गातले नसल्याने परिचारिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप या समन्वय समितीने केलाय. यासाठीच परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालय असावं अशी मागणी करण्यात आलेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)