एकनाथ खडसे: 'माझी मुलगी ढसढसा रडली, तरी तिला जबरदस्ती तिकीट दिलं'

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांना डावलण्यात आलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली. विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

त्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांना पक्षाने खूप काही दिलं. आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावं.

अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना भविष्यात कोणतं पद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं पाटील यांनी यातून स्पष्ट केलं.

तर, एकनाथ खडसे हे कॉंग्रेसमध्ये आले तर आनंद होईल असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण मुद्द्यांवर बीबीसी मराठीने एकनाथ खडसेंशी संवाद साधला.

प्रश्न - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की तुम्ही आता मार्गदर्शकतेच्या भूमिकेत जावं असं म्हटलं आहे. तुमचं मत काय आहे?

उत्तर - मी मार्गदर्शक भूमिकेत होतो आणि यापुढेही कायम राहीन. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा त्यांचा भाजप पक्षाशी संबंध आला. नाही तर गेली 40 वर्षे चंद्रकांत पाटील यांचा भाजपशी काही संबंध नव्हता. संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थी परिषदेचं कामं करत होते. भाजपचे जुने नवे कार्यकर्ते त्यांना माहिती नव्हते. ज्या काळात भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होतं त्या काळात आम्ही निवडून येत होतो.

1980 ला जेव्हा भाजपचा साधा सरपंच नव्हता तेव्हा भाजपतून मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी काम करत होतो. भाजपचा माणूस उभा राहिला की तो हरणार हे निश्चित असायचं अशा कालखंडापासून मी काम केलं आहे. त्यामुळे आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम आहोतच.

चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी परिषदेचं इतकं काम केलंय तर त्यांनी मेधा कुलकर्णीचं आमदारकी तिकीट कापून स्वत: उभं राहायला नको होतं. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मेधा कुलकर्णीचा बळी दिला. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात तर तुम्ही कुठूनही निवडून यायला हवं होतं. कोल्हापूरमधून त्यांनी का नाही निवडणूक लढविली?

मला तिकीट नाकारल्याचं दु:ख नाही, गोपीचंद पडळकरसारख्या माणसाला तिकीट दिलं याचं दु:ख आहे. ज्या माणसाने हार्दिक पटेलांची सभा घेतली आणि ज्याने मोदीजींना शिव्या दिल्या अशा व्यक्तीला तुम्ही तिकीट दिलं याच दु:ख आहे.

प्रश्न - एकनाथ खडसे यांना पक्षाने आतापर्यंत खूप काही दिलं आहे त्यामुळे यापुढे तुम्हाला काहीही मिळणार नाही असं अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं का?

उत्तर - पक्षाने आम्हाला खूप काही दिलं आहे पण आम्हीही पक्षासाठी खूप काही केलं आहे. आमच्या मेहनतीने, आमच्या त्यागाने पक्षासाठी आम्ही खारीचा वाटा दिला. हे आयते आहेत. आतापर्यंत युवा आंदोलन झाली, अयोध्येची आंदोलनं झाली. सामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही शेकडो आंदोलनं केली. तेव्हा हे कुठे होते? एका तरी आंदोलनात, मोर्चात हे होते का?

भाजपची जडणघडण आम्ही केली. आम्ही जेलमध्ये गेलो. अयोध्येच्या आंदोलनात आम्हाला मारलं, जेलमध्ये टाकलं. आम्ही खूप छळ सहन केला आहे. पण ते सर्व पक्षासाठी होतं. म्हणून पक्षावर आमचा हक्क आहे. आम्ही कुणाच्या जीवावर आयते उभे राहिलो नाही. पडळकरांचं काय योगदान आहे? मोहिते पाटीलांचं काय योगदान आहे? त्यांना तुम्ही बाहेरच्या पक्षातून घेतलं. त्यांना सांगा ना मार्गदर्शन करायला... या योगदान नसलेल्या लोकांना तिकीटं दिली त्याचं दु:ख महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे.

प्रश्न - पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट दिलं. विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर परिषदेचं देत नाहीत हा पक्षाचा नियम आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले, याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं आहे का?

उत्तर - मग पडळकरांना का दिलं? ते का अपवाद ठरले? चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी सांगायला ते कारण आहे. पंकजाशी माझं बोलणं झालं पण त्याबद्दल मी बोलणार नाही. हे म्हणतात सुनेला तिकीट दिलं, मुलीला तिकीट दिलं.

आम्ही कुठे मागितलं होतं मुलीसाठी तिकीट? माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं. माझी मुलगी ढसाढसा रडत होती मला तिकीट नको म्हणून तरी तिला जबरदस्ती तिकीट दिलं. का दिलं?

मला जाणूनबुजून तिकीट नाकारलं. नाथा भाऊंसारखा स्पर्धक परत तयार व्हायला त्यांना नको होता. मी सांगितलं होतं इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस्ती तिकीट दिलं.

प्रश्न -तुम्ही स्पर्धकांचा उल्लेख केलात. फडणवीसांच्या स्पर्धेत असणारे म्हणजे तुम्ही, पंकजा मुंडे, विनोद तावडे या सर्वांची तिकीटं कापली गेली?

उत्तर - निश्चितपणे! सर्व सिनिअर लोकांची तिकीटं कापली आणि ज्युनियर लोकांना संधी दिली. त्यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा त्यांच्या मागे हांजीहांजी करणाऱ्या लोकांचा गट तयार केला जातोय. हे षडयंत्र आहे. मेधा कुलकर्णीना विधान परिषद देण्याचा शब्द दिला होता ना.. तो का नाही पाळला?

प्रश्न - बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे की एकनाथ खडसेंसारखे नेते जर कॉंग्रेसमध्ये येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. तुम्ही कॉंग्रेसमध्ये जाण्याचा विचार करताय का?

उत्तर - बाळासाहेब थोरातांनी जे म्हटलं ते मी टीव्हीवर पाहीलं. त्यांचं खरं आहे. आमचे राजकारणात 1990 च्या काळापासून चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतही माझे चांगले संबंध आहेत. कॉंग्रेसने मला विधानपरिषदेची 6 वी जागा लढण्याची ऑफरही दिली होती. भाजपचे 6 आमदार कॉंग्रेसला मतदान करायला तयार होते. पण कोरोनाच्या या संकटात असा विचार योग्य नव्हतं.

प्रश्न -पण भविष्यात या ऑफरचा तुम्ही विचार करणार आहात का?

उत्तर - आता कोरोनाचं संकट आहे. महत्त्वाचे निर्णय हे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घ्यावे लागतील. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ऐनवेळी उमेदवार बदलणं, निवड मंडळाला न सांगणं, पार्लमेंटरी बोर्डाकडे नाव न देता तिकीटं देणं हे असे अनुभव कधी आले नव्हते.

या चार जणांची नावं पार्लमेंटरी बोर्डाकडे नव्हती मग कसं तिकीट दिलं? हे सर्व कोण करतंय हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मी प्रमुख कार्यकर्ते पंकजा मुंडे, विनोद तावडे, बावनकुळे सर्वांशी चर्चा काय केलं पाहिजे हे ठरवेन. वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे का हे बघून निर्णय घेईन.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)