You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आत्मनिर्भर भारत: नरेंद्र मोदी यांच्या कोरोनावरील भाषणातील 7 महत्त्वाचे मुद्दे
कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या संकाटवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं.
देशातल्या चौथ्या लॉकडाऊनबाबत मोदींना ठाम घोषणा केली नसली, तरी लॉकडाऊनच्या पुढील स्थितीबाबत 18 मेपूर्वी माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊन-4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू, असं ते म्हणाले.
मोदींच्या भाषणातील 7 महत्त्वाचे मुद्दे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
1) आत्मनिर्भर भारत अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा केली. या अभियानासाठी भारताच्या GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवी गती देईल.
गृहउद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची माहिती देतील.
2) या पाच खांबांवर आत्मनिर्भर भारत उभा राहील
आत्मनिर्भर भारत अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केला. याआधी त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील. ते पाच खांब म्हणजे - अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी.
आपण भारताला आत्मनिर्भर (स्वावलंबी) नक्की बनवू, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला.
3) पुढील लॉकडाऊन आधीपेक्षा वेगळा असेल - मोदी
"कोरोना मोठ्या काळासाठी आपल्या जीवनाचा भाग असेल, असं शास्त्रज्ञ सांगतात. पण याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य फक्त कोरोनाभोवतीच फिरेल. आपण अंतर राखून काम करू," असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पुढील लॉकडाऊनबाबत सूतोवाच केला.
"लॉकडाऊन-4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू आणि पुढेही जाऊ," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
चौथ्या लॉकडाऊनची माहिती 18 मेपूर्वी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
4) 'एकविसावं शतक भारताचं, ही आपली जबाबदारी'
"एकविसावं शकत भारताचं असेल, हे स्वप्नच नाही, तर आपली जबाबदारी आहे. यासाठी एकच मार्ग आहे - स्वावलंबी भारत," असं मोदी म्हणाले.
"आमच्या स्वावलंबीपणाच्या व्याख्येत आत्मकेंद्रीपणा येत नाही. आम्ही 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीवर विश्वास ठेवतो. भारताच्या प्रगतीच्या संकल्पनेत नेहमी विश्वकल्याणाचा विचार असतोच," असंही ते म्हणाले.
5) 'आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय'
मोदी म्हणाले, "आपण राष्ट्र म्हणून महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत. हे संकट आपल्यासाठी संधी घेऊन आलं आहे. आपण रोज 2 लाख पीपीई किट्स बनवत आहोत. आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय."
6) 'स्थानिक उत्पादनच जीवनमंत्र बनवायचा'
"जगात आयुष्य आणि मरणाची लढाई सुरू असताना भारतातली औषधं जीव वाचवत आहेत. भारतीयांना याचा अभिमान आहे," असं मोदी म्हणाले.
भारताच्या सुवर्णयुगाची आठवण करत ते म्हणाले, "एकेकाळी देशात सुवर्णयुग होतं. त्यानंतर पारतंत्र्य ओढावलं. आता भारताकडे सामर्थ्य आहे. आपण उत्तम उत्पादनं निर्माण करू. हे आपण करू शकतो आणि नक्की करू"
"संकटाच्या वेळी स्थानिक उत्पादकांनीच आपल्याला वाचवलं. वेळेने आपल्याला शिकवलं आहे की स्थानिक उत्पादनच आपलं जीवनमंत्र बनवायचं आहे. आजपासून प्रत्येक भारतीयाने लोकलसाठी व्होकल व्हायचंय. स्थानिक उत्पानदं घ्यायची आहेत आणि त्यांचा प्रचार करायचा आहे," असं आवाहन मोदींनी केलं.
7) धाडसी सुधारणा कराव्या लागतील - मोदी
देशात धाडसी सुधारणा कराव्या लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात म्हटलं.
"धाडसी सुधारणा कराव्या लागतील. सुधारणांची व्याप्ती वाढवावी लागेल. शेतीच्या पुरवठा साखळीत सुधारणा होतील. सुधारणा करांमध्ये होतील. या सुधारणा उद्योगांना शक्ती देतील आणि गुंतवणुकीला चालना देईल," असं ते म्हणाले.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओद्वारे चर्चा
सोमवारी पंतप्रधानांनी मॅरेथॉन बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन केलं होतं.
सोमवारी पंतप्रधान मोदी आणि देशभरातील मुख्यमंत्र्यांची पाचवी बैठक झाली. या बैठकीत राज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील रेड, ग्रीन, ऑरेंज झोन ठरवण्याच्या अधिकारापासून ते मजूरांच्या प्रवासाबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांकडे देण्यात यावे, अशी भूमिका विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)