You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : दारू विक्री आता घरपोच, 'या' आहेत अटी पाळून मिळणार दारू
महाराष्ट्र सरकारनं घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे दारू विक्रीही बंद होती.
मात्र, काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.
हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात.
मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी या आदेशाचं पत्रक जारी केलंय.
कुठली दारू घरपोच मिळेल?
- भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरिट्स (IMFL)
- बीअर
- सौम्य मद्य
- वाईन
मात्र, यासाठी राज्य सरकारनं काही अटीसुद्धा घातल्या आहेत. त्या अटी खालीलप्रमाणे-
- दारू पिण्याचा परवाना असलेल्या परवानाधारक व्यक्तीलाच संबंधित विक्रेता घरपोच देऊ शकतो.
- ज्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा काही विशिष्ट ठिकाणी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे, अशाच ठिकाणी घरपोच मद्यसेवा दिली जाईल. Containment zone मध्ये ही सेवा देता येणार नाही.
- विहीत केलेल्या दिवशी आणि वेळेत विदेशी मद्याची विक्री दुकानदार त्याच्या दुकानातून करेल.
- परवानाधारकाने मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली, तरच परवानाधारकास मद्याचे वितरण निवासी पत्यावर करता येईल.
- घरपोच मद्य देणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून ते वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण पात्र ठरले, तरच त्यांना ओळखपत्र देण्यात येईल.
- मद्य घरपोच देणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरावा. वेळोवेळी हाताचं निर्जंतुकिकरण करावं. हे नियम पाळले जातील, याची दक्षता दारू विक्रेत्यानं घ्यायची आहे.
- मद्य घरपोच पोहचविणाऱ्या प्रत्येक दुकानामागे कमाल दहा कामगार असतील.
- मद्यविक्री ही MRP नुसार केली जावी.
- मद्य मागणी करणाऱ्या ग्राहकाकडे आवश्यक मद्यसेवनासाठी परवाना नसल्यास तो www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन मिळू शकतो.
- घरपोच दारू विक्रीचा हा आदेश लॉकडाऊन अस्तित्वात असेपर्यंतच लागू राहील.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
दरम्यान, घरपोच दारू विक्रीच्या या आदेशात राज्य सरकार आवश्यकता भासल्यास सुधारणा करू शकतो किंवा प्रसंगी रद्दही करू शकतो, असं असं आदेशपत्रकात उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)