करोना आर्थिक संकट : राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार खरंच वाईन शॉप्स सुरू केले तर...

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महसूल वाढवण्यासाठी 'वाईन शॉप्स' सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

'किमान वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे?' असा प्रश्न त्यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.

पण लॉकडाऊन सुरू असताना 'वाईन शॉप्स' सुरू केले तर काय परिणाम होऊ शकतात, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

राज्याला मद्यविक्रीतून वार्षाला साधारण 12 ते 15 हजार कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होतं. लॉकडाऊनमध्ये गेल्या 35 दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्याने राज्याचं 1200-1500 कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. मुंबई आणि पुणे शहरातून मद्यविक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळतं.

तर मद्यावरील मुल्यवर्धीत कर म्हणजे व्हॅटच्या स्वरुपात 20 हजार कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळतं.

राज्य सरकारकडून आर्थिक संकट दूर करण्याबाबत विविध पर्यायांवर सध्या विचार होत आहे.

याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो."

वाईन शॉप्स सुरू करण्याची मागणी किती रास्त वाटते हे विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले, "ते माहिती नाही, पण आर्थिक गरज आहे हे रास्त आहे."

पण मद्यविक्री सुरू करण्यापेक्षा सरकारनं कायमस्वरुपीचा वेगळा पर्याय शोधावा असं मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात.

अर्थतज्ज्ञ गिरीश जखोटीया यांनी बीबीसी मराठीशी याबाबत बोलताना सांगितलं, "मद्यविक्री सुरू करणं हा खूप सोपा पर्याय आहे. मद्यविक्रीतून भरमसाठ कर येतो. सरकारचं उत्पन्न वाढतं हे सत्य आहे. पण आपल्याला कायमस्वरुपी असलेला एखादा मोठा पर्याय शोधायला हवा."

"या तणावपूर्ण काळात मद्यविक्री सुरू केली तर मोठं सामाजिक संकट निर्माण होऊ शकतं. शिवाय, घरी बसून किती दारू प्यावी यावर नियंत्रण कसं आणणार," असा सवाल जाखोटीया उपस्थित करतात.

यासाठी राज ठाकरे सारखे नेते किंवा सरकारने अर्थतज्ज्ञांशी चर्चा करावी. त्यातून काही ठोस पर्याय समोर येतील, असंही ते पुढे सूचवतात.

'दारू प्यायल्याने रोग प्रतिकार क्षमता कमी होते'

सरकार जर दारूची दुकानं सुरू करण्याचा विचार करणार असेल तर कडक निर्बंध घालावेत. एक ग्राहक एकावेळी मर्यादीत बाटल्याच खरेदी करु शकेल, दुकानं सुरु राहण्यावर वेळेची मर्यादा असेल, अशा काही अटींचा विचार सरकारने करायला हवा. असं वैद्यकिय क्षेत्रातल्या जाणकारांना वाटतं.

पण त्यामुळे दारूमळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होतो त्यामुळे काही डॉक्टरांचा दारूची दुकानं सुरू कारायला काहीअंशी विरोध आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ.अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, " जास्त दारू प्यायल्याने व्यक्तीची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. तसंच ज्यांना यकृताचे आजार आहेत अशांनी या काळात दारू प्यायली तर त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे."

"गेल्या महिनाभरापासून दारू मिळत नसल्याने दारूचं व्यसन लागलेल्या व्यक्तींची दारू सुटली आहे. दारू न मिळल्याने त्यांना जो त्रास होत होता तो ही आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा दुकानं सुरू झाली तर अशा सगळ्यांना दारूचं व्यसन पुन्हा लागू शकतं," अशी शक्यता डॉ. भोंडवे व्यक्त करतात.

"लॉकडाऊनमध्ये दारू उपलब्ध झाली तर ती घरी बसून एकट्याने प्यायली जाईल. यामुऴे दारुचं व्यसन लागण्याची 100 टक्के शक्यता असते कारण एकट्याने दारी पिणं म्हणजे दारुचं व्यसन लागण्याची खात्रीलायक शक्यता समजली जाते," असं डॉ. भोंडवे पुढे सांगतात.

'गरीबाचा उरलासुरला पैसा संपेल'

राज ठाकरेंनी दारू मालकाची वकीली करण्याचं काय कारण आहे, असा सवाल शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी उपस्थित करतात.

"राज ठाकरेंनी सामान्य माणसाच्या बाजूने बोलायला हवं. हातावर पैसे कमवणारा मजूर वर्ग काम नसल्याने आधीच हवालदिल झाला आहे. अशा लाखो कुटुंबांसमोर सध्या मोठं आर्थिक संकट उभं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर दारूचा पुरवठा होऊ लागाला तर मजूर वर्ग उरला सुरला पैसाही दारूमध्येच वाया घालवेल," अशी भीती ते व्यक्त करतात.

"राज्य आर्थिक संकटात असलं तरी अशा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये गरीब माणूस दारूचा आधार घेईल आणि लाखो कुटुंब मोठ्या संकटात सापडतील," अशी शक्यताही कुलकर्णी बोलून दाखवतात.

'कौटुंबिक हिंसाचार वाढेल'

लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरात आहेत. अशा काळात तर दारूची विक्री सुरू केली तर कैटुंबिक हिंसाचाक वाढेल, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील वर्षा देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

" लॉकडाऊनमध्ये हिंसा वाढलीय असा अहवाल असताना अशी मागणी करणं चुकीचं आहे. ज्या महिलां हिंसेच्या बळी ठरतात त्या महिला कधी नव्हे ते सुखाचा श्वास घेत आहेत. दारुची दुकानं बंद असल्याने महिला आनंदात असल्याचे फोनही आम्हाला येतात. लॉकाडाऊनमध्ये घरी बंद असताना दारू प्यायची संधी मिळाली तर महिलांवरील अत्याचारात आणखी वाढ होईल," असं वर्षा देशपांडे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)