You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दारूसाठी माणूस काहीही करायला का तयार होतो?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
जेव्हा लॉकडाऊनमध्ये प्रथमच मद्यविक्री देशभरात सुरू झाली आणि अनेक ठिकाणी अक्षरशः झुंबड उडाली होती.
कोव्हिड-19 होण्याचा, जिवाचा धोका पत्करून हजारो लोक उन्हातान्हात तासन् तास रांगेत उभे राहिले. काहींना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या.
तिकडे सोशल मीडियावर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यातले काही जण दारूचे शौकीन असतील, तर काही दारूडे किंवा व्यसनी असतील. यांच्यात काय फरक आहे? गंमत म्हणून पिणारी व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकते?
दारूचं व्यसन कसं लागतं?
लंडनच्या किंग्स कॉलेजमधले दारूच्या व्यसनाचे तज्ज्ञ डॉ. जॉन मार्सडन सांगतात की, 'social drinking' म्हणजे मित्रांसोबत सहज कधीतरी दारू पिणं आणि 'alcohol dependence' म्हणजे दारूवर अवलंबून राहणं, यांच्यात एक स्पष्ट सीमारेषा आहे.
"दारू पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे की, आजपर्यंत कधी कुणी तुमच्या दारू पिण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे का? किंवा तुमच्या पिण्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना कधी त्रास झालाय का? जर तुमच्या पिण्यामुळे इतर कुणाला कधी त्रास झाला असेल तर तुम्ही विचार करण्याची वेळ आली आहे," असं डॉ. मार्सडन सांगतात.
दारू पिणारी व्यक्ती काही एका रात्री व्यसनाधीन होत नाही. ही प्रक्रिया हळूहळू होते आणि त्यामुळे ती ओळखायलाही जड जाते.
ब्रिटनमधल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, तुम्हाला मदतीची गरज आहे जर:
1. सतत तुमच्या मनात दारू पिण्याचे विचार येत असतील
2. दारू प्यायल्यामुळे तुम्ही अडचणीत सापडले असाल
3. इतरांनी तुम्हाला दारू पिण्याविषयी चिंता व्यक्त केली असेल किंवा
4. तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या दारूमुळे त्रास होत असेल
व्यसन कुणाला लागू शकतं?
व्यसनाचा अभ्यास करणारे लेखक गेबर मेट असं म्हणतात की, व्यसन का लागतं, यापेक्षा ते कोणत्या वेदनांमुळे लागतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वैयक्तिक आयुष्यातलं एकटेपण, तणाव आणि आपुलकीचं कुणी नसणं या कारणांमुळे लोक व्यसन करतात. तसंच ज्या लोकांचं बालपण खडतर होतं, असंही लोक व्यसनाकडे वळत असल्याचं मेट सांगतात.
पण अल्कोहोलिझम हा अनुवंशिक पद्धतीनेही पुढे जाऊ शकतो. ज्या लोकांच्या कुटुंबात दारू पिण्याचा इतिहास असेल, त्यांना हे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते असं मॅक्लेन हॉस्पिटल मॅसेच्युसेट्समधल्या अल्कोहोल अॅडिक्शन स्पेशलिस्ट हिलरी कॉनरी म्हणतात.
न्यूयॉर्कमधल्या बफेलो विद्यापीठात व्यसनांवर संशोधन करणारे प्राध्यापक केन लेनर्ड सांगतात, "जर तुमचे दोन्ही पालक अल्कोहोलिक असतील तर तुमचे जनुकीय तसंच कौटुंबिक घटक तुमची दारूच्या आहारी जाण्याची शक्यता 25 ते 30 टक्क्यांनी वाढते."
पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी. फक्त कुटुंबात दारू पिण्याचा इतिहास आहे म्हणून लोक दारुडे किंवा व्यसनी होतात असं नाही. तुमच्या आयुष्यात जर सकारात्मक, समाधानकारक गोष्टी घडत असतील तर तुम्ही दारूच्या आहारी जाण्याची शक्यता कमी होते. याउलट जर तुमच्या आयुष्यात काहीच फलदायी घडत नाहीये, असं तुम्हाला वाटत असेल आणि त्यात हे अनुवंशिक जनुकीय घटकही तुमच्यात असतील तर दारूकडे ओढा लागण्याची शक्यता वाढते.
दारूची उपलब्धता, तणाव हाताळण्याच्या इतर पद्धती, तुमची ज्या लोकांबरोबर ऊठबस आहे, त्या वर्तुळात दारूकडे कसं पाहिलं जातं, तुमचा समाज दारूकडे कसं पाहतो इत्यादी घटकही व्यसन लागायला कारणीभूत ठरू शकतात.
गेबर मेट म्हणतात की एखादा अल्कोहोलिक माणूस जर दारू पिऊन आपल्या लहान मुलांवर ओरडत असेल, त्यांना मारहाण करत असेल तर ती मुलं मोठेपणी ते दुःख विसरण्यासाठी दारूच्या आहारी जाण्याची शक्यता असते.
भारतात वाढतंय दारूचं सेवन
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर म्हटलंय की, भारतात दारू पिण्याचं प्रमाण वेगाने वाढतंय. 2010 साली भारतात दरडोई 4.3 लीटर इतकं शुद्ध अल्कोहोल प्यायलं जात होतं. 2016 साली हेच प्रमाण 5.7 लीटर इतकं वाढलं होतं, म्हणजे जवळपास 30 टक्क्यांची वाढ. यामध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि महिला मोजण्यात आले आहेत.
भारतात जर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत असेल तर त्यातले काही जण व्यसनाधीन होण्याची शक्यताही वाढते. त्यासाठी हे पाहावं लागेल की कोण किती दारू पितंय?
भारतातला सरासरी पुरुष दरवर्षी 18.3 लीटर शुद्ध अल्कोहोल रिचवतो, तर भारतातली महिला सरासरी 6.6 लीटर दारू पिते. तुम्हाला माहिती असेल की, बाजारात उपलब्ध असलेल्या बिअर, वाईन, व्हिस्की वगैरे प्रकारांमध्ये 4-5 टक्क्यांपासून 40-50 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असतं. या आकडेवारीत त्यातलं फक्त अल्कोहोल पकडण्यात आलंय.
महिलांमध्ये वाढतं प्रमाण
पारंपरिकरित्या बहुतांश समाजांमध्ये दारू पिणं हे मुख्यत्वे पुरुषांपुरतं मर्यादित होतं. पण आता महिलाही दारू पिऊ लागल्या आहेत.
अनेक उत्पादक हे महिला ग्राहकांना डोळ्यांपुढे ठेऊन जाहिरात करताना आपण पाहतो. दिल्लीसारख्या शहरांमध्ये खास महिलांसाठी दारूची दुकानं आहेत.
इंपिरिअल कॉलेज लंडन मधले अल्कोहोल अॅडिक्शन स्पेशलिस्ट, प्रा. डेव्हिड नट म्हणतात, "अल्कोहोल हे पन्नाशीच्या आतल्या पुरुषांमध्ये मृत्यूचं महत्त्वाचं कारण आहे. येत्या काही वर्षांत पन्नाशीच्या आतल्या महिलांमध्येही अल्कोहोलमुळे मृत्यूचं प्रमाण वाढताना दिसेल."
WHOची यासंदर्भातली आकडेवारीसुद्धा हे अधोरेखित करते - अल्कोहोलमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण पुरुषांमध्ये 7.7 टक्के आहे तर महिलांमध्ये 2.6 टक्के.
व्यसन लागलं... पुढे काय?
दारूचं व्यसन सोडवण्यासाठी, त्या लोकांना धीर देण्यासाठी अनेक प्रयत्न जगभरात झालेले आहेत.
अमेरिकेतच 20 व्या शतकात 'Temperance Movement' नावाची चळवळ उभी राहिली होती. जिच्यातूनच पुढे दारूबंदीचेही प्रयत्न झाले होते. 1935 मध्ये 'अल्कोहॉलिक्स अनॉनिमस' या गटाची स्थापना झाली. दारूच्या व्यसनातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणारे दोन लोक एकत्र आले आणि त्यानंतर 'अल्कोहॉलिक्स अनॉनिमस'चं जाळं जगभर पसरलं.
दारूचं व्यसन सोडवण्यासाठी एकमेकांबरोबर आपले अनुभव शेअर करून हे लोक एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात.
आज भारतात आणि महाराष्ट्रातही गेल्या अनेक दशकांपासून कुठलाही गाजावाजा न करता AAचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात AAच्या अनेक शाखा आहेत. तुम्ही aa.org या वेबसाईटवर जाऊन तुमच्या घराजवळची शाखा शोधू शकता.
तसंच राज्यभरात अनेक ठिकाणी दारू सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊनही त्याबद्दल मार्गदर्शन मिळवू शकता.
कोव्हिड-19च्या काळात अनेकांनी दारूची उपलब्धता नसल्याने दारू सोडण्याचा निर्णय घेतलाय. अनेकांना withdrawal symptoms दिसायला लागलेत. दारूडा म्हणून किंवा व्यसनी म्हणून दारू पिणाऱ्यांना हिणवणं सोपं असतं, पण त्यामागे काय कारणं असतात, हे व्यसन सोडवण्यासाठी काय काय करावं लागतं, यावर मोठा शास्त्रीय अभ्यास आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)