You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याची शक्यता- डॉ. प्रदीप आवटे : #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्सवर आज छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. महाराष्ट्रातल्या काही भागांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग सुरू झाल्याची शक्यता - डॉ. प्रदीप आवटे
मुंबईसह महाराष्ट्रात काही भागांमध्ये कोरोना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाल्याची शक्यता राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलीय. 'लोकमत'ने याविषयीची बातमी दिली आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या समूह (क्लस्टर) संसर्गाच्या घटना आढळल्या असून मुंबईत गेल्या काही दिवसांत रोज 700 ते 800 नवे रुग्ण आढळत आहेत. काही ठिकाणी सामूहिक संसर्गाचे पुरावेही आढळल्याचं डॉ. आवटेंनी म्हटलंय. पण काही ठिकणी हा सामुदायिक संसर्ग आढळला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे समूह संसर्गाचं चित्र नसल्याचं डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलंय.
सामुदायिक संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रत्येक रुग्णाविषयीची माहिती गोळा करून त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागणार आहे.
शिवाय लोकसंख्येच्या घनतेमुळेच मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं डॉ. आवटे म्हणाले आहेत.
2. कोव्हिड-19 अँटीबॉडीजचा शोध घेणारं पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट पुण्यात तयार
पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)ने पहिलं स्वदेशी अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केलंय. 'लोकसत्ता'ने याविषयीची बातमी दिली आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याविषयीची माहिती दिली आहे. याविषयीचं एक ट्विट त्यांनी केलंय.
त्यात ते म्हणतात, "पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोव्हिड-19 साठीच्या अँटीबॉडीजचा शोधन घेणारं पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट तयार केलंय. Sars Cov 2 चा संसर्ग लोकसंख्येच्या किती पट लोकांना झाला आहे, यावर नजर ठेवण्यासाठी हे किट महत्त्वाचं ठरेल."
अडीच तासाच्या काळात 90 चाचण्या करण्याची या किटची क्षमता असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.
याशिवाय कोरोना व्हायरसासाठीची प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (BBIL) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबवणार आहेत.
3.राज्यातल्या 25,000 कारखान्यांमध्ये काम पुन्हा सुरू
लॉकडाऊन दरम्यानचे निर्बंध काही भागांमध्ये उठवण्यात आल्यानंतर आता राज्यातल्या 25,000 कारखान्यांमध्ये उत्पादन करण्यास पुन्हा सुरुवात झालेली आहे.
या कारखान्यांमध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार कामावर रुजू झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने याविषयीची बातमी छापली आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत 57,745 उद्योगांना परवाने देण्यात आलेले आहेत. रेड झोनमधल्या उद्योगांना परवाने देण्यात आलेले नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रात 9,147 कारखान्यांना परवाने देण्यात आलेले आहेत. यापैकी 5,774 कंपन्यांनी कामकाज सुरू केलं आहे.
राज्यातल्या लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असून त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, यासंबंधी नितीन गडकरी, सदानंद गौडा, पियूष गोयल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सुभाष देसाईंनी सांगितलंय.
पुण्यातल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. स्थिर वीजबिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेतली असून, जेवढा विजेचा वापर होईल तेवढंच बिल आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही सवलती जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
4. सर्वांत श्रीमंत तिरुपती देवस्थानाने कमी केले 1300 कर्मचारी
देशातलं सर्वांत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराने 1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलंय. या कर्मचाऱ्यांचं कंत्राट 30 एप्रिलला संपलं. त्यानंतर ते पुढे वाढवण्यात येणार नसल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आलं. एबीपी माझाने याविषयीची बातमी दिली आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थाकडून चालवण्यात येणाऱ्या विष्णु निवासम्, श्रीनिवासम् आणि माधवम् या 3 गेस्ट हाऊसमध्ये हे 1300 कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते.
मंदीर प्रशासनाने कामावरून काढल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी विश्वस्तांच्या कार्यालयासमोर निदर्शनंही केली.
लॉकडाऊनमुळे सगळी गेस्ट हाऊस बंद असल्याने या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात आले नसल्याचं बालाजी मंदिराचे अध्यक्ष वाय. वी. सुब्बा रेड्डी यांनी म्हटलंय.
5.पंकजा मुंडेंची चित्रकला
लॉकडाऊनच्या काळात पंकजा मुंडेंनी चित्रकलेचा छंद जोपासायला सुरुवात केली आहे. एक पेंटिंग त्यांनी ट्वीट केलं, पण त्यासोबतच्या दोन ओळींवरून विविध अर्थ काढले जात आहेत. 'न्यूज 18 लोकमत'ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
'स्वतःच स्वतःला शिकवते आहे...शून्यापासून सुरू केलं...चित्र चांगलं जमेल थोडे दिवसात' असं पंकजा मुंडेंनी आपली चित्र ट्वीट करताना म्हटलंय. विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार नसल्याचं समजल्यानंतर पंकजा मुंडेंनी एक भावनिक ट्वीट केलं होतं. म्हणूनच पंकजांनी 'शून्यापासून सुरुवात' म्हटल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा काही राजकीय अर्थ आहे का, याविषयीची चर्चा सुरू झाल्याचं न्यूज 18 लोकमतने म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)