कोरोना व्हायरस : आरोग्य आणि सफाई कर्मचारीच विषाणू घरात घेऊन आले तर...? कुटुंबीयांना धास्ती

- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"पहिले परिस्थिती वेगळी होती. आपला माणूस व्यवस्थित घरी येईल, हे पक्कं माहिती असायचं. आता मात्र कोरोनामुळे मनात धास्ती बसलीय, की कामाहून घरी येताना आपला माणूस कोरोनाला सोबत घेऊन तर नाही ना येणार?"
कोरोना व्हायरसचा सामना करण्यात देशातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, आशा वर्कर्स सगळ्यात पुढे आहेत. स्थळ, वेळ आणि काळाचं भान विसरून ही मंडळी आज काम करत आहेत.
'आम्ही तुमच्यासाठी 24 तास काम करतोय, तुम्ही आमच्यासाठी घरात थांबा,' अशा आवाहनाचे मेसेजेस यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. आपल्यासाठी कोरोनाची लढाई लढणाऱ्या या मंडळींच्या कुटुंबीयांच्या मनात नेमकं सुरू आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.

मोतीराम शिंदे परभणी जिल्ह्यातल्या पालम नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचारी आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते साफसफाईचं काम करत आहेत.
सकाळी 5 वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. शहरातील नाल्यांची सफाई करणं, सरकारी कार्यालयांमध्ये जंतुनाशकांची फवारणी करणं, स्थलांतरितांच्या कॅम्पची स्वच्छता राखणं इत्यादी कामं त्यांना करावी लागतात.
मोतीराम ही कामं त्यांची 'ड्युटी' समजून करत असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात सध्या भीतीचं वातावरण आहे.
'नवऱ्याला साफसफाई करायला जावं लागतं, भीती वाटते'
"कोरोना परभणीत आला आहे, आमच्याकडे येईल," अशी भीती मोतीराम शिंदेंच्या पत्नी रेखा शिंदे यांच्या मनात आहे. "माझ्या पतीला कोरोनाचे पेशंट थांबलेल्या ठिकाणी सफाईसाठी जावं लागतं. तिथं कसे पेशंट असतील, कसे नाही, असे विचार मनात येत राहतात. तसंच शहरातल्या प्रत्येक गल्लीत फवारणीसाठी जावं लागतं. कोण माणूस कसा असेल काही सांगता येत नाही, त्यामुळे ते घरी वापस येईपर्यंत मला काळजी वाटत राहते," त्या सांगतात.
"पहिले परिस्थिती वेगळी होती. आपला माणूस घरी येईल, हे पक्की माहिती असायचं. आता मात्र कोरोनामुळे मनात धाक बसला आहे की, ते घरी येताना कोरोनाला सोबत घेऊन तर नाही ना येणार?"

पती घरी आल्यानंतर लहान लेकरं खेळण्यासाठी त्यांच्या अंगावर उड्या मारतात, त्यामुळे मग लेकरांनाही कोरोना होईल, अशीही भीती वाटत असल्याचं रेखा पुढे सांगतात.
जी भीती रेखा यांच्या मनात आहे, तशीच भीती विजया शिरसाठ यांच्याही मनात आहे.
'डॉक्टरची आई असल्याचा अभिमान आणि काळजीही'
विजया शिरसाठ यांची मुलगी सुचिता शिरसाठ औरंगाबाद जिल्ह्यातल्या (पैठण तालुका) बालानगरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपासच्या 30 गावांचा समावेश होतो.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

विजया यांना त्यांची लेक करत असलेल्या कामाचा एकीकडे अभिमान वाटतो, तर दुसरीकडे तिची काळजीही वाटते.
त्या सांगतात, "माझ्या लेकीकडे बाहेरगावचे भरपूर पेशंट असतात. या पेशंट्सना तपासायचं म्हटलं, की मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतोच. लांबून तपासू शकत नाही. त्यामुळे मग तिची काळजी वाटते.
"एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात आपली मुलगी इतकं चांगलं काम करत आहे, याचा एकीकडे अभिमान वाटतो, तर दुसरीकडे तिला काही होईल का, अशी भीतीही वाटते."

पण, ही काळजी फक्त विजया यांनाच आहे असं नाही.
सुचितालाही वाटतं की, चुकून एखाद्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यास तिलाही कोरोनाची लागण होईल. आणि ती कोरोनाचा सोर्स झाली, तर त्यामुळे फक्त तिच्या घरच्यांनाच नाही, तर तिच्या संपर्कातील शेकडो रुग्णांना कोरोना होईल.
आशा वर्कर्सना घरच्यांचा काळजीपोटी विरोध
आशा वर्कर्स ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचा सर्व्हे करत आहेत. घरोघरी जाऊन कुटुंबीयांच्या आरोग्याची नोंद ठेवण्याचं काम त्या करत आहेत.
कोरोनाचा सर्व्हे करायला दारोदारी जात असल्यामुळे त्यांच्या घरच्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
यवतमाळमधील आशा वर्कर अंजना वानखेडे यांच्या कुटुंबीयांना वाटतं की, कोरोनाचा सर्व्हे करायला जात असल्यामुळे अंजना यांना कोरोना झाल्यास घरच्यांनाही कोरोना होईल आणि मग गावातल्या अनेकांना होईल. त्यामुळे त्यांच्या घरचे त्यांना घरीच थांबायला सांगत आहेत.

कोरोनाशी थेट दोन हात करणारे हात आरोग्य सेवकांचे असले तरी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांत मोठं शस्त्र म्हणजे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग. गेल्या चार आठवड्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे, आणि याचं काटेकोरपणे पालन होतंय की नाही, याची जबाबदारी आहे देशभरातील पोलीस आणि इतर सुरक्षादलांवर.
त्यामुळे साहजिकच जी चिंता सफाई आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आहे, जवळपास तशीच मनस्थिती पोलिसांच्या घरांमध्येसुद्धा पाहायला मिळतेय.
'पोलिसांमध्ये काही अँटीव्हायरस नाही'
सचिन कदम अकोला जिल्ह्यात पोलीस उप-अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बीबीसीबरोबर बोलताना त्यांच्या पत्नी स्नेहल चौधरी यांनी जनतेला घरी राहण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

फोटो स्रोत, Getty Images
"मलाही वाटतं की माझ्या पोलीस पतीनं घरी थांबावं, काळजी घ्यावी. एक स्त्री म्हणून माझ्याही मनाची घालमेल होते, पण नाईलाज आहे. आपला देश ही आपली पहिली जबाबदारी आहे, असं म्हणून एकमेकांना खंबीर करावं लागतं. पोलिसांमध्ये काही स्पेशल अँटीव्हायरस नाही, की ज्यामुळे त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन होणार नाही."
कोरोना विरुद्धच्या लढाईत जनतेच्या सहकार्याविषयी बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला - "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रस्थानी असलेल्या आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवायला सांगितलं. तेव्हा लोकांनी दिलेला प्रतिसाद बघून माझ्या पोलीस पतीला बरं वाटलं. पण, पुढच्या काही क्षणांत लोक घरातून बाहेर पडत असल्याचे फोन त्यांना यायला लागले, तेव्हा मात्र आम्हाला खूप वाईट वाटलं."
त्यामुळे मग कोरोनाच्या कसोटीच्या काळात सामान्य जनतेची साथ मिळणं खूप आवश्यक आहे, असं त्या म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








