You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस नागपूर : औषधांच्या दुकानातून दारू विक्री, अजब प्रकार उघडकीस
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून
लॉकडाऊनच्या काळात औषधांच्या दुकानातून औषधांऐवजी दारु विकण्याचा प्रकार नागपुरात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मिनरल वॉटरच्या बॉक्समध्ये बियरच्या बॉटल्स भरुन दिवसाढवळ्या हा प्रकार सुरु होता.
धक्कादायक म्हणजे हा प्रकार नागपूरच्या प्रसिद्ध अशा मेयो हॉस्पिटलसमोरील कांचन मेडिकल आणि जनरल स्टोअर्समधून सुरु होता.
राज्यात 18 मार्चपासून लॉकडाऊन लागू झालं. तेव्हापासून शहरातील दारुची दुकाने आणि बार बंद असताना एका मद्यव्यावसायिकाने आपल्या फार्मिसिस्ट नातेवाईकाच्या मदतीने हा पराक्रम केलाय.
नीरज गुप्ता नावाचा मद्यव्यावसायिक आणि औषधांच्या दुकानाचा मालक असलेला निशांत उर्फ बंटी गुप्ता यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
नीरज गुप्ता आणि निशांत उर्फ बंटी गुप्ता यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गणेशपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवराम कुंभरे यांनी बीबीसी मराठीला दिली.
शिवाय, या प्रकरणातील आरोपी नीरज गुप्ता यानं आतापर्यंत किती मद्यसाठा विकला, सील कसे तोडले याची माहिती घेत कारवाईची सूचनाही पोलिसांनी केलीय.
नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलच्या चौकात आरोपी नीरज गुप्ता याचे 'मदिरा भवन' हे बार आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 18 मार्च पासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून आरोपी नीरज गुप्ता याचा 'मदिरा भवन' या बारलाही उत्पादन शुल्क विभागाने सील केले होते. पण आरोपीने शहरातील सर्व मद्याची दुकाने बंद असल्याने स्वत:च्या दारुच्या बारमध्ये पडून असलेल्या दारुच्या साठ्याची काळाबाजारी करण्यासाठी क्लृप्ती लढवली.
दुप्पट-तिप्पट किंमतीत दारुची विक्री
आरोपी नीरज यानं त्याच्या मदिरा भवन बारवरील सील स्वत:च काढलं. बारमधील मद्याचा साठा मिनरल वाटरच्या बाक्समध्ये भरून तो आपल्या फार्मसिस्ट नातेवाईक असणाऱ्या निशांत गुप्ता याच्या कांचन मेडिकल आणि जनरल स्टोअर्स मध्ये घेऊन गेला.
नीरजच्या बारमध्ये नेहमी येणाऱ्या ग्राहकांना फोनवरून मद्याचा साठा हा कांचन मेडिकल स्टोअर्समधून घेऊन जाण्यासाठी सांगण्यात यायचे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नीरजच्या सांगण्यावरून कांचन मेडीकलमधून दुप्पट तिप्पट पैसै देऊन मद्य खरेदी करणं सुरु केलं.
हा प्रकार आजूबाजूच्या लोकांना कळल्यावर त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कांचन मेडिकलवर छापा टाकला आणि त्यात बियरच्या 90 बाटल्या जप्त केल्या.
आता औषधांच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
नीरज गुप्ता यांच्या मदिरा भवन या बारवर याआधीही अनेकदा अवैध दारुसंदर्भात कारवाई करण्यात आलीय.
'उत्पादन शुक्ल विभागाच्या कारवाईचा पोलिसांना पत्ता नसतो'
या संदर्भात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने एकत्रित काम करणे आवश्यक असल्याचे राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
"महाराष्ट्र पोलिसांना उत्पादन शुल्क विभाग कुठे कारवाई करतंय हे माहिती नसते आणि महाराष्ट्र पोलिसांची माहिती आणि त्यांची कारवाई ही उत्पादन शुल्क विभागाला माहित नसते. त्यामुळे आठवड्यातून एकदा दोन्ही यंत्रणांची आम्ही बैठक घ्यायचो आणि कारवाई करायचो," असे बावनकुळे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी एकत्रित येत कारवाई केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
"उत्पादन शुल्क मंत्री असताना राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार आणि परमिट रुम यांच्या दारावर सीसीटीव्ही आपण बंधनकारक केले आहे. त्यामुळे सीसीटीव्हीतून असे प्रकार उघड होतील," असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळं दारुची दुकाने बंद असल्यामुळे मद्यप्रेमीची मोठी गैरसोय झाल्याने अनेक गैरप्रकारही वाढले आहेत. संचारबंदीचा फायदा घेत काही मद्यशौकिनांनी दारुच्या दुकानंच लुटण्याचे प्रकार केलेत.
नागपूर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली दारुही पळवण्याची घटना घडली. तर नागपुरच्या शांतीनगर भागात दारुची नशा करण्यासाठी दारु मिळत नसल्यामुळे सॅनिटायझरचा वापर करण्याची शक्कल लढवली आहे. अशी नशा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, कुठलेही गैरवर्तन लॉकडाऊन दरम्यान खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी बीबीसी मराठीला दिली.
अवैध दारु तयार करणारे आणि चोरुन दारु विकणाऱ्यांवर नागपूर पोलीस कारवाई करत असल्याचही राऊत यांनी सांगितलं.
तसंच, अवैध दारुविक्रीसारखे प्रकार कुठे आढळल्यास पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्याचं आवाहनही नितीन राऊत यांनी केलंय.