कोरोना व्हायरस : घर खरेदी करण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नाचा कोव्हिडच्या संकटाने केला भंग?

नोएडात राहणाऱ्या निम्मी शर्मा सध्या कोरोनाशी संबधित बातम्या सतत पाहात असतात. गेल्या 9 वर्षांपासून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या निम्मी यांनी याच वर्षी मार्च महिन्यात आपल्या आयुष्यातला 'लग्नानंतरचा सगळ्यांत मोठा' निर्णय घेतला होता.

त्यांनी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एक 3 BHK फ्लॅट बुक केला आणि त्यासाठी बँकेकडून 33 लाखाचं कर्जही घेतलं. त्यांचं अजून पूर्ण न झालेला फ्लॅट 44 लाखांचा आहे, त्यामुळे त्यांनी आतापर्यंतची स्वतःची सगळी बचत, 11 लाख रुपये, घर खरेदी करण्यासाठी वापरली. भरीस भर म्हणून त्यांना आता 18 हजार रूपये महिना हफ्ताही भरावा लागतो.

24 मार्च महिन्यात देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित व्हायच्या आधीच त्या आणि त्यांचे पती दोघांच्याही खाजगी कंपन्यांना नवरा-बायकोला घरून काम करायला सांगितलं होतं. आता लॉकडाऊनमुळे दोघं पतीपत्नी चिंतित आहेत.

निम्मी शर्मा म्हणतात, "मी रोज देवाकडे हीच प्रार्थना करते की कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या केसेस कमी व्हाव्यात आणि देशासमोरचं हे संकट लवकरात लवकर टळून गोष्टी पूर्वीसारख्या नॉर्मल व्हाव्यात. आम्हा नवरा-बायकोपैकी एकाचीही नोकरी गेली तर खूप अवघड परिस्थिती होईल. घराचा, गाडीचा हफ्ता, राहात्या घराचं भाडं आणि घरखर्चासाठी पैसे कुठून आणणार आम्ही?"

बांधकाम व्यवसायाची परिस्थिती

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी देशात गेल्या तीन आठवड्यांपासून जीवनावश्यक गोष्टी वगळता सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातल्या प्रचंड मोठ्या रिअल इस्टेट क्षेत्रातही गोष्टी ठप्प पडल्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंगच्या काळात ना बांधकाम सुरू राहू शकतं ना खरेदी-विक्रीची नोंदणी कारण नोंदणी करणारी कार्यालयंसुद्धा बंद आहेत. आधीपासूनच गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोना व्हायरसने अधिक संकटात टाकलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्यवसाय कोरोना व्हायरसच्या आधीपासूनच संकटात होता.

इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात भारतातल्या 9 मोठ्या शहरांमधल्या घरांच्या विक्रीत 30 टक्के घट झालेली आहे. याच एक कारण म्हणजे दीर्घ काळापासून चालू असलेल्या हाउसिंग प्रोजेक्ट्सचं काम ठप्प पडणं आणि शेकडो बिल्डर्सनी दिवाळखोरी घोषित करणं.

बांधकाम व्यवसायात कन्सलटंट म्हणून काम करणारी संस्था नाईट अँड फ्रँकचे गुलाम झिया यांच्या मते "पाच वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला गेल्या काही महिन्यात थोडी गती आली होती.

या काळात हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये काही फ्लॅट्स आणि ऑफिसची विक्री झाली होती. पण कोरोना व्हायरस ओझ्याने वाकलेल्या उंटावरची शेवटची काडी ठरला आहे. मोठमोठे डेव्हलपर्स आपल्या साईट्सवर अडकलेल्या मजूरांना कामावर ठेवू शकत नाहीत. परिणामी घरांच्या किमती वाढतील आणि घर घेणाऱ्यांची संख्या कमी होईल.

हाऊसिंग सेक्टरची गोष्ट करायची झाली तर भारतात पाच लाखाहून जास्त फ्लॅट्स रिकामे पडलेत, त्यांना विकत घेणारं कोणी नाही. यात 20-30 टक्के फ्लॅट्स असेही आहेत ज्यांचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून ठप्प पडलं आहे.

गेल्या दोन वर्षात सरकारने होमलोनचं व्याज कमी केलं होतं आणि घर घरेदी करणाऱ्यांना टॅक्समध्येही सूट दिली होती ज्यायोगे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. याबरोबरच ठप्प पडलेल्या प्रोजेक्ट्ससाठी 25,000 कोटींच्या स्ट्रेस फंडाचीही घोषणा केली होती. होमलोनचे व्याजदर सतत कमी केले जात होते आणि सध्या असणारे 7 - 8.5 चे दर गेल्या दशकातले सगळ्यात कमी दर आहेत असं म्हटलं जातंय.

पण गेल्या काही वर्षांत सरकारने घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांचा ताळमेळ साधायलाही बांधकाम व्यवसायाला बराच वेळ लागला आहे.

सगळ्यांत पहिला निर्णय होता 2017 मध्ये रेरा ( रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अॅक्ट) लागू करणं. या कायद्यामुळे बिल्डरला नव्या प्रोजेक्टचा 70 टक्के निधी एका वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवणं अनिवार्य होतं. एका प्रोजेक्टचा निधी बिल्डर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकत नाही ही यातली मेख होती. नव्या प्रोजेक्टसाठी त्यांना अनेक परवानग्या घेणं बंधनकारक बनलं.

बांधकाम व्यवसायासमोर दुसरं आव्हान होतं जीएसटी, म्हणजे 'एक देश - एक कर' ही व्यवस्था. यामुळे 'देशाला एक मोठा बाजार बनण्यात मदत मिळाली तसंच भ्रष्टाचार आणि टॅक्स चोरीला आळा बसला', असा दावा सरकारने केला होता.

तिसरा मोठा निर्णय होता नोटबंदीचा. या निर्णयाने खरंच काही फायदा झाला का यावर अजूनही वाद सुरु आहेत. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, "नोटबंदीचा परिणाम बांधकाम व्यवसायात काळ्या पैशांची जी बेसुमार उलाढाल होत होती त्यावर झाला."

गोवा विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणारे राहुल त्रिपाठी सांगतात की, "जो काळा पैसा अदृश्य आहे असं म्हटलं जातं होतं त्याबद्दल सांगणं कठीण आहे, पण बांधकाम व्यवसायात याचा कमी परिणाम जाणवतो आजकाल."

कोरोनामुळे काय बदलेल?

आधीपासून अडचणीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोना व्हायरसने अधिक संकटात टाकलं आहे. याचा परिणाम फक्त घर खरेदी करणाऱ्यांवर नाही तर विकणाऱ्यांवरही झाला आहे. या व्यवसायातले जाणकार म्हणतात की कोरोनासारखं संकट त्यांनी आधी कधीही पाहिलेलं नाही.

विवेक कौल या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, ते म्हणतात "आता हे स्पष्ट आहे की लॉकडाऊन 40 दिवस चालेल. याकाळात अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील आणि ज्यांच्या राहातील त्यांचेही पगार कापले जातील. मध्यमवर्गीय लोकांचं घर घेण्याचं स्वप्न भंगेल. लोकांकडे पैसैच नसतील तर ते या क्षेत्रात खर्च कसे करणार? कोव्हिड 19 एक अशी कुदळ आहे जी हे क्षेत्र जमीनदोस्त करेल."

सरकारने परिस्थिती गंभीरपणे घेऊन बँकांना लोकांचे हप्ते पुढे ढकलण्याचे तसंच क्रेडिट कार्डचं पेमेंट पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. पण हे हप्ते माफ केलेले नाहीत. ते व्याजासकट पुढे का होईना भरावेच लागतील.

लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी भाडेकऱ्यांकडून भाडं न घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बांधकाम व्यवसायात पसरलेल्या मंदीचं असं चित्र पूर्वी कधी दिसलं होतं का हा खरा प्रश्न आहे.

गुलाम झिया सांगतात, "गेल्या 100 वर्षांत अशी परिस्थिती कधी बघायला मिळाली नाही. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बांधकाम व्यवसाय अभेद्य वाटत होता. या व्यवसायाचं नवं रूप कोरोनाचं संकट संपल्यावरच पाहायला मिळेल.

आर्थिक तंगी आणि लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायाशी संबंधित संस्थांनी सरकारला अनेक विनंत्या केल्या आहेत.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे महानिदेशक राजीव सिंह यांच्यामते, "कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जवळपास 65 टक्के लोक आपल्या कर्जाचा हप्ता भरू शकणार नाहीत असा अंदाज आहे. या लोकांच्या हप्त्यावर पुढचं बांधकाम होतं. याला कन्स्ट्रक्शन लिंक्ड प्लॅन असही म्हणतात. पण तरीही सद्य परिस्थितीत कोरोनाच्या संकटाला तोंड देणं ही सगळ्या देशाची प्राथमिकता असेल."

कोरोनाच्या जागतिक संकटानंतर काय परिस्थिती असेल, कोणत्या उद्योगांना सगळ्यांत जास्त झळ बसेल हे आताच सांगणं थोड अवघड आहे. पण बांधकाम व्यवसायावर याचे दुरगामी परिणाम होणार हे नक्की.

बँकिग आणि पर्सनल फायनान्स एक्सपर्ट आदिल शेट्टी यांच्यामते "बांधकाम व्यवसाय या संकटातून बाहेर पडेल तेव्हा सगळ्यांत मोठी भूमिका स्वस्त बजेट घरांची असेल. महागडे, प्रीमियम फ्लॅटच्या मागणीत घट होणं निश्चित आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)