You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोराना व्हायरस : मालेगावात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यामध्ये नेमकी कुठे चूक झाली?
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी नाशिकहून
गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये विशेषत: मालेगावमध्ये कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 9 एप्रिल नंतर अचानक मालेगावमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.
14 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत कोव्हिड-19 बाधित रुग्णांची एकूण संख्या 29 तर संशयितांची संख्या 107 होती.
कोव्हिड-19 मुळे एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर मालेगावच्या तरुणीचा धुळे येथे मृत्यू झाला आहे.
मालेगावातील रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि कठोर उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली.
लॉकडाऊनमध्येही पॉवरलूम सुरूच
राज्यात लॉकडाऊन असताना मालेगाव पूर्व भागातील परिसरात नित्य नियमित कामं सुरळीत चालू होती तर 'पॉवरलूम' नगरी म्हणून ओळख असणाऱ्या मालेगावात काही लूम चालू होते. पोलिसांनी यातील 7 लूमवर गुन्हे दाखल करत त्या सील केल्याची माहिती दिली आहे, तर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकणी 350 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत .
पॉवरलूम प्रकरणी मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, की लॉकडाऊन सुरु झाल्यावर आम्ही प्रथमत: नाकेबंदी करून वाहतूक कमी करण्यावर भर दिला.
जेव्हा आम्हाला चालू असलेल्या पॉवरलूम विषयी समजले तेव्हा अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही ते लूम सील केले व 7 लूम विरोधात गुन्हेही दाखल केलेत. लूम कुणाचे होते किंवा का चालू होते, यावर भाष्य करण्याचं त्यांनी टाळलं.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
नेटवर्क 18 उर्दू चे स्थानिक पत्रकार जहूर खान सांगतात, की मालेगाव शहर खूप दाट लोकवस्तीचं आहे. तिथे मजूरी करून पोट भरणारे लोक खूप आहेत , जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं त्यानंतर 5-10% पॉवर लूम चालू होते.
"मालेगाव मध्ये 5 से 10% पॉवरलूम चालू होते हे खरंय, मजूर काम करत होते, यात राजकारण व इतर गोष्टी आहेत. सत्ता असलेला आणि गेलेला असे दोघेही गट आपली ताकद सिद्ध करण्यासाठी याचा वापर करत होते." खान पुढे सांगतात.
या प्रकरणाची दुसरी बाजू गंभीर आहे आणि तिचा राजकीय फायदाही उचलला जातो. लूममध्ये काम करणारे मजूर हे आठवड्याला पैसे कमावतात आणि जगतात. आता लूम बंद झाले तर हे कामगार बेरोजगार होत उपाशी राहणार म्हणून लूम चालू होते असा युक्तिवाद देत या कृतीचे समर्थन करण्यात आलं. राजकीय कनेक्शन असणाऱ्यांनी याच मुद्द्यावर लूम चालू ठेवले. कायदेशीरदृश्ट्या हे चुकीचं आहे असं ते सांगतात.
जहर खान पुढे सांगतात, "यामागे निरक्षरता आणि गरिबीसुद्धा कारणीभूत आहे. एकाच घरात 15-20 माणसं असतात. एक ग्रुप जेव्हा कामाला जातो तेव्हा दुसरा ग्रुप घरी आराम करतो, लोक कोरोनाविषयी जागरूक नव्हते म्हणा किंवा हे किती गंभीर प्रकरण आहे हे समजण्यात सर्वच कमी पडलेत, मग प्रशासकीय यंत्रणा असो वा सामाजिक. मालेगावात कमालपुऱ्या सारख्या वस्त्या एवढ्या दाट आहेत, की कुणीही बाहेरचा तेथे जात नाही आणि पोलीस ढुंकूनही बघत नाही. अशावेळी इथे फक्त भूक असते आणि त्यासाठीचे काम...सोशल डिस्टन्स पाळणे कुठुन येणार."
मालेगावात रुग्णांची संख्या का वाढली?
मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी किशोर डांगे सांगतात, "मालेगावमध्ये टीबी आणि फुफ्फुसे यासबंधी आजार जास्त आहेत. लूमच्या कापडाच्या सूक्ष्म कणांमुळे या आजारांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कामगारांची रोगप्रतिकार शक्ती होते. शिवाय ह्या लूम कामगारांना स्वतःचे आरोग्य कसे सांभाळावे याचे ज्ञान नाही. ते कोरोना विषयी कसे जागरूक असणार? लॉकडाऊन दरम्यान काम करायला ते सहज उपलब्ध होतात."
ते पुढे म्हणतात, "उमरा यात्रा व जमातचे बरेच लोक बाहेर जाऊन आले परंतु अपवादानेच कुणी कोरोनसंबंधी चाचणीसाठी अथवा माहिती देण्यासाठी समोर आले. आम्हाला स्वतः सर्वेक्षण करावं लागलं. त्यात प्रचंड विरोध सहन करावा लागला, आशा वर्कर किंवा वैद्यकीय पथकांना परतावून लावले गेले. ह्या सर्व लोकांना वाटत होतं, की हे सर्वेक्षण करणारे सर्वांची नावं का विचारत आहेत. आम्ही माहिती नाही देणार, तुम्ही NRC आणि CAA चा सर्वे करत आहात का, असा प्रश्न ते विचारत होते.
महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांना स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं.
"मालेगावातील स्थानिक पोलीस दहशतीमुळे कडक कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. इथे बाहेरील पोलीस यंत्रणेची गरज आहे गुलाब पार्क, मोमीनपुरा, नवापुरा व कमाल पुरा हा विभाग हॉटस्पॉट ठरला आहे," असंही डांगे पुढे म्हणाले.
वैद्यकीय चाचण्या अपुऱ्या
मालेगावसह अनेक ठिकाणी वैद्यकीय चाचण्या पूर्ण करता आल्या नाहीत. आता इथलं प्रशासन तयार आहे, योग्य प्रकारे वैद्यकीय सर्वेक्षण केलं जात आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेत घेतली जात आहे. 100 PPE किट आणि योग्य प्रमाणात मास्क आले आहेत, यापूर्वी मात्र आहे त्या स्थितीत काम केल्याचं डांगे सांगतात.
कोरोनाबाधितांच्या रुग्णात वाढ झाल्यावर प्रशासन जोरदारपणे कामाला लागले. 12 तासात एकूण 17 रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
घटनेचं गांभीर्य ओळखून प्रमुख समन्वयक म्हणून डॉ. पंकज आशिया या सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली.
लोकांमध्ये जागरुकता नव्हती
आशिया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, की लोकांमध्ये जागरूकता नव्हती, किंवा त्यांना ह्या परिस्थितीशी योग्यप्रकारे अवगत करण्यात आलं नव्हतं तसंच कर्फ्यु चे पालन योग्य प्रकारे झालं नाही "आता मात्र आम्ही कठोर भूमिका घ्यायचा निर्णय घेतला असून बाहेरील पोलीस ताफा बंदोबस्त कामी बोलावण्यात आला आहे, एकूण 4 कंपन्या व बेहेरील 300 पोलीस दाखल झालेले आहेत, आशा वर्कर व वैद्यकीय पथकाचे रखडलेले सर्वेक्षण परत सुरू झालंय, काही ठिकाणी 5 पथकांच्या मागे पोलीस अधिकारी ही नेमलेले आहेत." आशिया सांगत होते.
आशिया पुढे सांगतात, "कोरोनविषयक जनजागृतीसाठी आम्ही राजकीय नेते , कार्यकर्ते ,धर्मगुरू तसेच आवाहन करण्यासाठी मशिदींचा वापर करणार आहोत. काही ठिकाणी तसं काम सुरू झालं आहे, आधी लोकांनी कर्फ्यु पाळला नाही पण आता थेट गुन्हे दाखल होत आहेत, कलम 188 प्रमाणे अंदाजे 350 गुन्हे आतापर्यंत दाखल केले आहेत. वैद्यकीय पथकांसाठी 1000 PPE किट, 2000 N95 मास्क व इतर साहित्य आता उपलब्ध होत आहे, लोकांनी सहकार्य करावे ही विनंती आणि आवाहन आम्ही करत आहोत, नाहीतर नागरिकांना कडक कायद्याला सामोरे जावे लागेल."
मालेगावात घरोघरी जाऊन सर्वे केला जातोय, लोकांना विलगीकरण व अलगीकरण करण्यासाठी आम्ही शाळा, कॉलेज व सरकारी इमारती ताब्यात घेऊन तिथे जेवणासह व्यवस्था करत आहोत, जेणेकरून एकाच घरात असणाऱ्या गर्दीचा प्रश्न सुटेल.
प्रशासनाची निष्क्रियता
स्थानिक पत्रकार मनोहर शेवाळे यांच्या मते परिस्थितीची कल्पना आम्ही आधीच दिली होती की लोक सहकार्य करणार नाही कारण जाणीवच नाही, ही परिस्थिती प्रशासनाची निष्क्रियता अधोरेखित करते, काल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेत सूचना दिल्या आहेत. तसंच युद्ध पातळीवर धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्यात, प्रशासन अत्यावश्यक सेवा फक्त त्यांच्या मार्फत व्हाव्यात अशा मानसिकतेत आहे, जेणेकरून अनावश्यक गर्दी टाळली जाईल,
बेशिस्त जनतेला शिस्त लावणे,धार्मिक कट्टरता बाजू ठेवणे आणि स्वतःहून तपासणीसाठी पुढे येणे, गरिबांचे पोट भरणे, जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, राजकीय व धार्मिक नेते आणी प्रशासन त्रिसूत्री किती प्रभावी ठरेल हे मात्र येणारा काळच ठरवेल असं त्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)