उद्धव ठाकरे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरस, वांद्रे, आंबेडकर जयंतीवर काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला उद्देशून भाषण करताना स्थलांतरित मजुरांना आश्वस्त केलं की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. "लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही," असं म्हणत त्यांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनाही पुन्हा एकदा इशारा दिला.

आज मुंबईच्या वांद्रे स्टेशनच्या दुपारी शेकडो लोकांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांची आणि प्रशासनाची धावपळ झाली. यावरून राजकारणही बरंच झालं. त्याविषयी सविस्तर इथे वाचू शकता.

आज आंबेडकर जयंती असल्यामुळे त्यांनी प्रथम बाबासाहेबांना घरातूनच मानवंदना दिल्याबद्दल भीमसैनिकांचे आभार मानले. "बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आज जग विषाणूविरोधात लढतंय," असं ते म्हणाले.

पाहा LIVE इथे -

त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपण राज्यातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी आज तो 3 मेपर्यंत वाढवला आहे. हा लॉकडाऊन वाढवल्याबद्दल मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
  • महाराष्ट्रात काही विचित्र नाही चाललं. महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त चाचण्या. महाराष्ट्र सरकार खंबीर आहे, धैर्याने मुकाबला करतंय. जे शक्य ते सगळं करत आहोत.
  • आपण डॉक्टरांची एक टास्क फोर्स बनवली आहे. ट्रीटमेंट कशी असावी, याबद्दल संपूर्ण आरोग्य सेवेला या टास्क फोर्समधले डॉक्टर मार्गदर्शन करतील.
  • कोव्हिडचं संकट गेल्यावर आर्थिक संकट येईल. त्याचा सामना करण्यासाठी एक मंत्रिगट स्थापन झाला. अजित दादा त्याचं नेतृत्व करतील. तसंच डॉ. माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांसारख्या अर्थतज्ज्ञांची समिती बनवली आहे.
  • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार. 20 तारखेनंतर कोणते उद्योगधंदे सुरू करता येतील का, याचा अंदाज अजित दादा आणि इतर सहकारी घेत आहेत.
  • बळीराजा हा आमचा आत्मा. अन्नदात्याला लॉकडाऊनमध्ये कुणी अडवणार नाही, अशा सूचना दिल्या आहे. शेतीविषयक कामं, शेतीचा माल यांची ये-जा सुरू राहणार.
  • या विषाणूला आपण बऱ्यापैकी थोपवलं आहे. 10 जिल्ह्यांत विषाणू प्रवेश करू शकला नाही. प्लाझ्मा ट्रीटमेंट आणि बीसीजी लस यांच्या प्रयोगासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे.
  • संकट काळात महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. न जाणो महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल. या प्रयोगांत आपण नक्की यशस्वी होऊ.
  • मूळ तुटवडा आहे आहे तो PPE वगैरेंचा. तो पूर्ण जगात आहे. या संकट काळात काही उद्योजक आपल्या राज्याला, देशाला मदत करायला पुढे येताहेत.
  • दीड महिन्यानंतर पाऊस सुरू होईल. त्यावेळी दुर्गम भागांमध्ये आदिवासी बांधवांना मदत पुरवावी लागते. त्याची कामं सुरू झाली आहेत.
  • मी निवृत्त जवान आणि आरोग्य सेवकांना आवाहन केलं होतं. मला अभिमान आहे की आज सकाळपर्यंत 21 हजार लोकांनी इच्छा दाखवली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे.
  • धान्याचा पुरवठा सगळीकडे होतोय. जवळपास सव्वा कोटी कुटुंबीयांनी रेशनचं धान्य नेलंय. आपण तांदळासोबत डाळीचीही मागणी केलीये. शिवभोजन योजनेत रोज 80 हजार ताटं जेवण देत आहोत.
  • मोठ्या संख्येने बाहेरचे लोक येतात. जवळपास साडे 5 ते 6 लाख इतर राज्यांमधले मजूर आहेत. त्यांना जेवण देतोय. त्यांच्यासाठी तिथे डॉक्टर आहेत. या मजुरांना सांगतो की काळजी करू नका. कुणीतरी पिलू सोडलं की ट्रेन सुरू होणार. त्यांना असं वाटलं की 14 तारखेला ट्रेन सुरू होईल, म्हणून ते बाहेर आले. लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही. काळजी करू नका.
  • ही वेळ राजकारणाची नाही. राजकारण करायला आयुष्य पडलंय. आत्ताची वेळ एकजुटीने लढण्याची आहे. याच्यात कुणी राजकारण करू नका. मी पुन्हा एकदा बजावून सांगतो, की गोरगरिबांच्या भावनांशी खेळू नका. इशारा देतो की कुणी तसं केलं तर तो कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. असे अफवा पसरवणारे आगीचे बंब भरपूर आहेत.
  • केंद्र आणि राज्य हातात हात घालून काम करत आहोत. सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते हातात हात घालून लढत आहेत. तुमच्याशी बोलतोय तसा मुल्ला मौलवींशीही बोलतोय. त्यांनी गैरसमजुतीचा शिकार होऊ नये.
  • आपली एकजूट घट्ट पाहिजे. या एकजुटीच्या जोरावरच आपण आरामात जिंकू.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)