महाराष्ट्राचा लॉकडाऊन प्लान - तीन झोन्स, पूल सँपलिंग, धारावीमध्ये HCQ

महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण यापुढे महाराष्ट्राची वाटचाल कशी होईल, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

यावेळी त्यांनी पूल टेस्टिंग, जिल्ह्यांचं तीन झोन्समध्ये वर्गीकरण आणि राज्यात कसं आणि कुठे लॉकडाऊन शिथिल केलं जाऊ शकतं, याबद्दल ते बोलले.

1. लक्षणं दिसण्याचं प्रमाण

कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांना लक्षणे नसून 25 टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर 5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणं असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे.

2. मुंबईत सर्वाधिक रुग्ण

कोरोनाचे मुंबईत 61 टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात 10 टक्के तर पुणे येथे 20 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 5.5 टक्के आहे. उर्वरित 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत.

3. राज्याचं तीन झोन्समध्ये वर्गीकरण

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्याविषयीची गाईडलाईन केंद्र सरकार दोन दिवसांत जाहीर करेल. त्यानुसार पावलं टाकण्यात येईल.

  • रेड झोन्स - 15 रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण
  • ऑरेंज झोन्स - 15 पर्यंत
  • ग्रीन झोन्स - एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही

4. Locked-in नावाची संकल्पना

Locked-in नावाची संकल्पना मोदींनी सांगितली आहे. त्यानुसार जर कामगारांना एकत्रित ठेवण्याची जबाबदारी ग्रीन झोनमधल्या कंपन्या घेणार असतील तर लॉकडाऊन तिथे शिथिल करून कामकाज सुरू करू शकतो.

5. पूल टेस्टिंग

राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1,574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत.

हे चाचण्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता एकाच कुटुंबाचे एकत्र सँपल घेतले जातील, आणि ते पॉझिटिव्ह आढळल्यास, मग एक एक करून प्रत्येक सदस्याचे घेतले जाईल. याला पूल टेस्टिंग म्हणतात.

यामुळे वेळ कमी लागेल आणि किटही कमी लागतील, असंही टोपेंनी सांगितलं.

6. HCQ धारावीमध्ये कर्मचाऱ्यांना देणार

हायडॅ क्सीक्लोरोक्वन हे औषध केंद्र सरकारने कोविड रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्याना देण्याच्या निर्णय घेतलाय. अँटी-मलेरियाच हे औषध आहे.

या औषधांमुळे शरीरातील विषाणूंची संख्या कमी होते. विषाणूंचा गुणाकार कमी करणारे हे औषध घारावीसारख्या भागात वापरणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली.

मुख्य सचिवांचे टेक्निकल अॅडव्हायजर डॉ. सुभाष साळुंखे यांच्या माहितीनुसीर, हे औषध सर्वांना देता येणार नाही. हृदयरोग आणि किडनी विकार, गर्भवती महिलांना देता येणार नाही. त्यामुळे लोकांचं वय आणि शारीरिक परिस्थिती पाहून आम्ही बनवत आहोत.2 ते 3 दिवसात यावर निर्णय होवून मुंबईतील दाटिवाटीच्या भागात लोकांना हे औषध देण्यात येईल.

7. SARI

SARI विषयी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, "औरंगाबादमध्ये SARIचे पेशंट सापडले आहेत. याची लक्षणं कोरोनासारखी असतात. त्यावर तातडीनं उपाय शोधणं गरजेचं आहे."

8. PPEs - राज्यात मुबलक आहेत

राज्यात पुरेसे व्हेंटिलेटर्स आणि N-95 मास्क, पीपीई किट्स उपलब्ध आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलं. केंद्र सरकारने जी काही संसाधनं पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे, ते तातडीने आम्हाला देण्यात यावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधानांकडे केल्याचंही टोपेंनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)